महाराष्ट्राचे लाडके डॉक्‍टर

डॉ. श्री बालाजी तांबे
गुरुवार, 19 मार्च 2020

ज्यांच्या नुसत्या शब्दाने भीती आणि रोग दोन्ही बऱ्याच अंशी नष्ट होतात, अशी ख्याती मिळविलेले डॉक्‍टर ह. वि. सरदेसाई यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना वाहिलेली श्रद्धांजली.

डॉ.  ह. वि. सरदेसाई हे आता आपल्यात नाहीत, हे ऐकूनच धक्का बसला. जंतुसंसर्ग होऊन संपूर्ण जग भीतीच्या खाईत ओढले जात असताना, असे एक डॉक्‍टर की ज्यांच्या शब्दाने भीती व रोग बऱ्याच अंशी नष्ट होत असे, ते हे डॉ. ह. वि. सरदेसाई. त्यांच्या जाण्याने अपरंपार दुःख झाले आहे व महाराष्ट्राचे मोठे नुकसान झालेले आहे. डॉक्‍टर सरदेसाई व माझा परिचय साधारण सन ७५-७६च्या सुमारास झाला. ‘ॐ स्वरूपा’ या आमच्या संस्थेतर्फे डॉक्‍टरसाहेबांची एक-दोन व्याख्याने आयोजित केली होती. १९८० मध्ये जेव्हा मी चाळिशीकडे झुकू लागलो तेव्हा एकदा तपासणी करून घ्यावी, अशा मित्रमंडळींच्या सल्ल्यावरून मी डॉक्‍टरसाहेबांकडे गेलो. त्यांनी मला पाहताच,‘तुम्हाला काही झालेले नाही, तुमची प्रकृती ठणठणीत आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी तुमची तपासणी करतो, ईसीजी काढतो, पण काळजीचे काही कारण नाही’ असे सांगितले. त्यांचा ज्ञानाचा झरा हा साधी शारीरिक तहान भागवण्यापुरता नव्हता, तर त्यांचे व्याख्यान ऐकणे हे खरोखर संपूर्ण समाधान देणारे होते.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘फॅमिली डॉक्‍टर’ संकल्पनेला माझ्याबरोबर डॉक्‍टरसाहेबांनीही मार्गदर्शन करावे, म्हणजे आयुर्वेद व आधुनिक आरोग्यशास्त्र यांचा उत्तम संगम होऊन सर्व महाराष्ट्रातील जनतेला फायदा होईल, ही माझी कल्पना डॉक्‍टरांनी उचलून धरली. गेली सतरा वर्षे ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीवर सर्व जनतेने खूप प्रेम केले. ‘फॅमिली डॉक्‍टर’चे सर्वच्या सर्व अंक संग्रही ठेवणारे अनेक आहेत. डॉ. सरदेसाई यांचे ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’ पुस्तक प्रसिद्ध झालेले होते. चांगल्या व गुणसंपन्न अपत्याचा जन्म व्हावा, यासाठी ‘गर्भसंस्कार’ हा विषय घेऊन पुस्तक लिहावे, अशी प्रेरणा डॉक्‍टरसाहेबांच्या या पुस्तकामुळे माझ्या मनात दृढ झाली. डॉक्‍टरसाहेबांनी ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये अनेक लेख लिहिले आहेत. या लेखांमुळे ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीची उपयोगिता अधिकच वाढली. लांबी, रुंदी, खोली....जगण्याची, वक्‍तशीरपणाचे महत्त्व, संभाषण ‘सम भाषण हवे’ वगैरे त्यांनी फॅमिली डॉक्‍टरमध्ये लिहिलेले लेख अप्रतिम आहेत. त्यांचे लिखाण वैज्ञानिक व वैद्यकशास्त्रावर आधारित असूनही ‘फॅमिली डॉक्‍टर’च्या सोपेपणाने समजावण्याच्या पद्धतीशी मिळतेजुळते असायचे. ‘फॅमिली डॉक्‍टर’च्या वाचकांना डॉक्‍टरसाहेबांची अनुपस्थिती नक्कीच अस्वस्थ करणारी ठरणार आहे.

आमच्या घरातील वा आत्मसंतुलन केंद्रातील कोणालाही आरोग्य मार्गदर्शन हवे असले की सर्वप्रथम डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्याकडे जात असू. त्यांच्या जाण्याने आरोग्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. डॉक्‍टरसाहेबांनी अनेकांच्या प्राणशक्‍तीत वाढ केलेली आहे. असे पुण्य गाठी बांधल्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास स्वर्गीय वातावरणात होईल हे निश्‍चित. त्यांना माझा, आमच्या कुटुंबातील सर्वांचा, ‘आत्मसंतुलन केंद्रा’तील सदस्यांचा आणि ‘सकाळ फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीच्या वाचकांचा नमस्कार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr H V Sardesai article