भाष्य : सर्जनशील क्षेत्रातील ‘अगतिकीकरण’

आशयनिर्मिती या माध्यमउद्योगातील एका महत्त्वाच्या पैलूची चर्चा जगभर ऐरणीवर आली आहे. यानिमित्ताने आपणही आपल्या संहिता, आशयनिर्मिती याकडे अंतर्मुख होऊन पाहायला हवे.
भाष्य : सर्जनशील क्षेत्रातील ‘अगतिकीकरण’

आशयनिर्मिती या माध्यमउद्योगातील एका महत्त्वाच्या पैलूची चर्चा जगभर ऐरणीवर आली आहे. यानिमित्ताने आपणही आपल्या संहिता, आशयनिर्मिती याकडे अंतर्मुख होऊन पाहायला हवे. चॅट जीपीटीसारख्या यंत्रणेचा धसका न घेता सर्जनशील लेखन क्षेत्रात नवोन्मेषशाली संकल्पना, विषय आणि त्यांची हाताळणी हे आव्हान प्रतिभावान लेखकांना आता पेलावे लागणार आहे.

करमणूकप्रधान कार्यक्रम तयार करणाऱ्या वाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या मालिका, रिॲलिटी शो यांची लोकप्रियता हळूहळू कमी होऊ लागल्याचे अनेक संशोधन अहवालातून स्पष्ट होऊ लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉट स्टार, झी फाईव्हसारख्या ओटीटी व्यासपीठावरुन उपलब्ध होणारे भन्नाट चित्रपट आणि चित्तथरारक वेबमालिका. ब्लॅक लिस्ट, प्रिझन ब्रेक, होमलँड, द व्हाईट कॉलर, ब्लॅक मिरर, फ्रेंड्स, द लिंकन लॉयर यासारख्या थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘द डिप्लोमॅट’सारखी आंतरराष्ट्रीय राजकारणावर बेतलेली वेब सिरिज पाहताना एखादी कथा कशी फुलवत येते,पटकथा हा या संपूर्ण निर्मितीचा केंद्रबिंदू कसा असतो, याची जाणीव क्षणोक्षणी होते.

चांगला आशय देता आला की मालिकेत पाणी टाकावे लागत नाही. कथानकात हूक कोठे आहे हे शोधावे लागत नाही; पण यासाठी विषय संशोधनात स्वतःला पूर्णपणे बुडवून घ्यावे लागते, याचा रोकडा प्रत्यय या मालिका देत आहेत. या सगळ्या दर्शनानंद देणाऱ्या विश्वाला ब्रेक बसतो की काय, असे वाटणारी एक बातमी मे महिन्याच्या सुरवातीला जगभरात खळबळ उडवून गेली. ती म्हणजे हॉलिवूडच्या पटकथा लेखकांचा संप. सुरवातीला असे वाटले, की हा संप काही काळ चालू राहील आणि पुन्हा कामकाज पूर्ववत सुरू होईल. परंतु तो अद्यापही चालूच आहे.

२००७ नंतर म्हणजे १६ वर्षांनी हा संप अमेरिकेतील मनोरंजन उद्योगात झाला आहे. २००७ चा संप १०० दिवस सुरु होता. त्यामुळे या उद्योगातील अनेक घटकांना मोठी झळ बसली होती. २०० कोटी डॉलरचे नुकसान अमेरिकी अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले होते. ३८ हजार जणांना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या होत्या. सध्याच्या संपात ११ हजार ५०० लेखक सहभागी आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी या क्षेत्रातील इतर ही सर्जनशील मंडळी आपापल्या परीने याचे समर्थन करत आहेत.

वाढत्या महागाईचा विचार करता यांना मिळणारा मेहनताना पूर्वीपेक्षा तुलनेने २३ टक्क्यांनी कमी झालेला दिसतो. तर दुसरीकडे स्टुडिओच्या नफ्यात मात्र ३९ टक्के वाढ झालेली दिसते. ही विसंगती हे या संपाचे प्रमुख कारण मानले जाते. या वर्षी येऊ घातलेले चित्रपट, मलिका, वेब सिरीज यांच्या निर्मितीला यामुळे मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. मानधनात वाढ ही यातली प्रमुख मागणी असून मनोरंजन उद्योगातील कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेच्या वापराबद्दलही लेखक संघटनेने प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रासंगिक करारावर घेतलेल्या लेखक मंडळींकडून संहिता घेण्यासही या लेखकांचा विरोध आहे.

या संपाचे भारतातही मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओटीटी व्यासपीठावरील वेबसिरिज आणि चित्रपट यांची मोठी आर्थिक उलाढाल आपल्या देशात होताना आपण पाहतो आहोत. आजघडीला हा व्यवसाय १६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. येत्या तीन-चार वर्षांत तो ५० हजार कोटी रुपयांची मजल मारेल, अशी चिन्हे आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे टीव्हीवरील मराठी आणि हिंदी मालिका क्षेत्रात आज आपल्याकडे परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही.

त्याचत्याच कथा, त्यांची पारंपरिक हाताळणी, निर्मितिमूल्यांशी तडजोड यामुळे चोखंदळ प्रेक्षकांच्या पसंतीक्रमावरचे त्यांचे स्थान डळमळीत झाले आहे. अगदी मोजक्या हिंदी व मराठी मालिका उत्तम ‘टीआरपी’मुळे तग धरुन असल्या तरी जागतिक दर्जाच्या वेब मालिकांपुढे त्याही निष्प्रभ ठरत आहेत. दुसरीकडे ओटीटीमुळे जागतिक बाजारपेठ आपल्याकडच्या सर्जनशील मंडळींसाठी खुली झाली आहे. अनेक हिंदी वेब कार्यक्रमांचे जगभरातील प्रेक्षकांकडून स्वागत होत आहे. पण तरीही अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे.

या आंदोलनाच्या निमित्ताने आशयनिर्मिती या माध्यम उद्योगातील एका महत्त्वाच्या पैलूची चर्चा जगभर ऐरणीवर आली आहे. हॉलिवूड स्टुडिओसाठी लिहिणाऱ्या भारतीय लेखकांनाही इथल्या संघटनेने या संपाला पाठिंबा देण्याचे सूचित केले आहे. लेखन हा मनोरंजनविश्वाचा महत्त्वाचा घटक असूनही त्याकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नाही, हे वास्तव हा संप अधोरेखित करतो.

चॅट जीपीटी सारखे तंत्रज्ञान लेखकांचा रोजगार काढून घेणार का, हा प्रश्नही हॉलिवूडमधील पटकथा लेखकांना सतावत आहे. एक नक्की की नव्या संकल्पना, कार्यक्रमाच्या घाटानुसार विषय सुचविण्याची प्रक्रिया, एखाद्या विषयाचे विविध पैलू या सुविधेमुळे सहज मिळू शकणार आहेत. त्यामुळे लेखकांचे काम सोपे होईल. पण उत्तम लेखन करणारे, प्रतिभावंत लेखक यांना कृत्रिम बुद्धिमत्ता हा पर्याय कधीच ठरू शकणार नाही. लेखनाच्या प्राथमिक टप्प्यासाठीचा वेळ वाचल्यामुळे मूळ कथाकल्पनेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अधिक सकस लिहिण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या उपयोग नक्कीच होणार आहे.

उपलब्ध माहिती आणि त्या संबंधात विचारले जाणारे नेमके प्रश्न यांच्या संयोगाशिवाय हे तंत्रज्ञान समाधानकारक कामगिरी करू शकत नाही. त्यामुळे लेखक मंडळींनी याच्याबद्दल कोणतीही अवास्तव भीती न बाळगता याचा सकारात्मक उपयोग करुन घेत संहिता अधिक रंगतदार, सर्वव्यापी आणि सशक्त कशी करता येईल हे पाहायला हवे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखकाला असलेले वलय (ग्लॅमर) आपल्या देशात नाही. मनोरंजन माध्यमात काही सन्माननीय अपवाद वगळता लेखक हा कायमच शेवटच्या बाकावर बसलेला असतो. मुळात लेखन ही सर्जनशील अभिव्यक्ती आहे, याचा थांगपत्ता नसलेली अनेक मंडळी या क्षेत्रात आहेत . लेखकांबद्दलची ही परिस्थिती मुद्रित माध्यमातही आपल्याला पाहायला मिळते.

लेखकाला मानधन द्यायचे असते, ही संकल्पना फिजूल वाटणारे संपादक किंवा प्रकाशकही मराठी साहित्यविश्वात आढळतात. जाहिरात क्षेत्रात तर एकदा इंग्रजी कॉपी, मथळा झाला की प्रादेशिक भाषेत ते आणताना भाषेचे काय धिंडवडे उडवले जातात, हे आपण नेहेमी पाहतो. या सर्व निराशजनक पार्श्वभूमीवर पूर्णवेळ लेखन ही आपल्याकडे तरी दंतकथा मानली जाते. त्यामुळे लेखकांचा संप ही घटना आपल्याकडे‘ अहो आश्चर्यम्’ असे वाटणारीच आहे.

जागतिकीकरण ही आता अपरिहार्य गोष्ट झाली आहे. अमेरितील एखादी बँक बुडाली की भारतीय शेअर बाजाराला कापरे भरते. रशियाने युक्रेनवर हल्ला केला की आपल्याही संरक्षणसिद्धतेचा गांभीर्याने आढावा घ्यावा लागतो. आता हे वादळ प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातही दाखल झाले आहे. त्यामुळे हॉलिवूडमधील हा संपही आपण तेवढ्याच गांभीर्याने घेतला पाहिजे.

यानिमित्ताने आपण आपल्या संहिता,आशयनिर्मिती याकडेही अंतर्मुख होऊन पाहायला हवे. कारकुनी काम करणाऱ्या, उपलब्ध माहितीचेच विश्लेषण करुन कल्पना सुचवू पाहणाऱ्या चॅट जीपीटीसारख्या यंत्रणेचा धसका न घेता सर्जनशील लेखन क्षेत्रात नवोन्मेषशाली संकल्पना, विषय आणि त्यांची हाताळणी हे आव्हान प्रतिभावान लेखकांना आता पेलावे लागणार आहे. पटकथा लेखक संपावर जाणे ही घटना आपल्याकडे होता कामा नये, असे जेव्हा आपल्या माध्यमक्षेत्राला वाटेल आणि आपण संपावर गेलो तर रसिक प्रेक्षकांना खरंच हळहळ वाटेल, असे लेखकांना प्रामाणिकपणे वाटेल, तेव्हाच या घटनेपासून आपण काही धडा घेतला असे होईल.

keshavsathaye@gmail.com

(लेखक प्रसारमाध्यमे आणि मनोरंजनविश्वातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com