आकाशवाणीला नवा अवकाश

डॉ. केशव साठये
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

आकाशवाणीच्या बातम्यांचा खासगी रेडिओ वाहिन्यांवरील प्रवेश ही आपला वारसा लखलखीत करण्याची आकाशवाणीला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. मात्र त्यासाठी आकाशवाणीला आधुनिक युगाच्या गरजांशी, अभिरुचीशी आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल.

आकाशवाणीच्या बातम्यांचा खासगी रेडिओ वाहिन्यांवरील प्रवेश ही आपला वारसा लखलखीत करण्याची आकाशवाणीला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. मात्र त्यासाठी आकाशवाणीला आधुनिक युगाच्या गरजांशी, अभिरुचीशी आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल.

‘ब हुजन हिताय बहुजन सुखाय’ या घोषवाक्‍याला शब्दशः जागणारी माध्यम संस्था म्हणून पुन्हा एकदा आकाशवाणीचे नाव चर्चेत आले आहे. माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने आकाशवाणी केंद्रावरच्या हिंदी आणि इंग्रजी बातम्यांची काही वार्तापत्रे आता खासगी रेडिओ वाहिन्यांना विनामोबदला प्रसारित करण्याची परवानगी दिली आहे. अर्थात यासाठी या वाहिन्यांना नोंदणी करावी लागणार असून, काही अटींच्या अधीन राहून ते हा लाभ घेऊ शकतील. या योजनेअंतर्गत आकाशवाणीच्या प्रमुख केंद्रांवरच्या बातम्या प्रसारित करता येणार असून, त्या आहेत तशा, कोणताही बदल न करता आणि त्याच वेळी (लाइव्ह ) प्रसारित कराव्या लागणार आहेत. अर्थात त्या वेळेनंतर तीस मिनिटांपर्यंत उशिराने त्या प्रसारित करण्याची परवानगी या योजनेत असून, तशा त्या (डिफर्ड) सादर करत आहोत, असे स्पष्टपणे त्यात नमूद करावे लागणार आहे. या बातमीपत्रासोबतच्या जाहिरातीही प्रसारित करण्याचे बंधन या नियमावलीत आहे. आतापर्यंत सुमारे शंभर वाहिन्यांनी अशी नोंदणी केली असून, प्रायोगिक तत्त्वावरची ही योजना कार्यान्वित झाली आहे. येत्या ३१ मेपर्यंत ती सुरू राहणार आहे. स्वातंत्र्य आणि नवता ही वैशिष्ट्ये असललेल्या खासगी रेडिओ वाहिन्या या प्रस्तावाला किती आणि कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.
एक वाचक म्हणून ही बातमी आपल्या मनात नक्कीच सकारात्मक भाव निर्माण करते. आकाशवाणी वाढते आहे, पसरते आहे, नव्या श्रोत्यांच्या घरात जाते आहे ही आनंदाची बाब आहे. पण या बातमीचे सामाजिक, राजकीय पदर पाहिले तर मात्र अनेक नवे प्रश्न मनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाहीत. आता ही प्रायोगिक स्वरूपात सुरू केलेली योजना मे २०१९ पर्यंतच का? याचे उत्तर ज्यांना येत्या मे महिन्यात काय आहे हे माहीत आहे, त्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही. अर्थात हा योगायोगही असू शकतो. पण आपल्या आयुष्यात इतके नाट्यपूर्ण योगायोग येत नाहीत. त्यामुळे या प्रसारणाला राजकीय पदर आहेत, असा कुणी दावा केला तर तो सहजासहजी खोडून काढता येणार नाही. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय झाला असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पण यावर चर्चा करण्यापेक्षा आकाशवाणीला, श्रोत्यांना याचा नेमका फायदा होणार काय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आकाशवाणीचे मुख्य (प्रायमरी) केंद्राचे कार्यक्रम; विशेषतः त्याची तांत्रिक गुणवत्ता हा अजूनही अनुत्तरीत प्रश्न आहे. आकाशवाणी केंद्र ज्या शहरात आहे अशा ठिकाणीसुद्धा अनेक ठिकाणी या केंद्राचे कार्यक्रम सुस्पष्ट ऐकायला मिळणे हा दुग्धशर्करा योग मानला जातो. त्यामुळे या केंद्रावरच्या बातम्या आता स्पष्ट ऐकायला मिळणार ही या योजनेची जमेची बाजू नक्कीच आहे. अर्थात हा फायदा प्रादेशिक बातम्यांनाही सध्याच्या आकाशवाणीच्या स्वतःच्या ‘एफएम’ केंद्रामार्फत देता आला असता.पण तसे सरसकट होताना दिसत नाही. मुंबई केंद्राच्या प्रादेशिक बातम्या ‘एफएम’वर लागतात, पण पुणे केंद्राने मात्र ही सोय उपलब्ध करून दिलेली नाही. म्हणजे आकाशवाणी या विषयाकडे फार गांभीर्याने पाहात नाही. स्थानिक पातळीवर असे निर्णय घेतले जातात; त्यात एकवाक्‍यता नाही. आकाशवाणीने हे धोरण म्हणून स्वीकारले असते, तर ‘एफएम’वर आपल्या प्रादेशिक बातम्यांना प्रतिसाद कसा मिळतो याची एक चाचणी झाली असती. एखादी गोष्ट अधिक स्पष्टपणे मोठ्या आणि बहुविध पार्श्वभूमी असलेल्या मोठ्या जनसमुदायासमोर, श्रोत्यांसमोर येते, तेव्हा त्यातील दोषही तेवढेच सुस्पष्ट होतात. आता या नव्या योजनेतून ते होणार आणि मग बातम्यांचे तपशील त्यांची संरचना, त्यातील यथायोग्यता, नेमकेपणा याचेही परीक्षण होणार. अर्थात याकडे विधायक दृष्टीने आकाशवाणीने पाहावे, अशी अपेक्षा आहे.

या संदर्भातील योग्य सूचनांचा विचार करावा आणि त्याचवेळी बातम्यांमधील उपयुक्तता वाढवून श्रोत्यांचेही प्रबोधन करावे. आम्ही बातम्या देणार, तुम्ही त्या ऐकायच्या, या पलीकडे जाऊन श्रोत्यांची ‘मन की बात’ समजून घेण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात व्हायला हवा, तरच बातम्यांमधली लोकाभिमुखता वाढू शकेल. बातम्यांत काय काय सुधारणा करायला हव्यात ते समजू शकेल. आणखी एक गोष्ट म्हणजे ‘फेकसदृश’ बातम्यांच्या गदारोळात आकाशवाणीची सत्यवाणी ऐकता येणार ही मोठीच समाधानाची बाब आहे. पण या सत्यवाणीत सरकारी बातम्यांवर भर अधिक दिसतो. उद्‌घाटन, भूमिपूजन, मंत्र्यांच्या सभा, घोषणा, लोकसभेचे कामकाज किती वेळा तहकूब झाले या बातम्या ऐकण्यात श्रोत्यांना रस नसतो. किती किलोमीटरचा रस्ता झाला यापेक्षा तो खड्डेविरहित कसा आहे हे ऐकायला मिळणार असेल तर तरुण पिढी या बातम्यांना प्रतिसाद देईल. सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या ज्या नव्या योजना असतील, ज्या बातम्यांत प्रगतिशील कार्यक्रमांची चाहूल असेल, काही विकासात्मक संकेत असतील, तर श्रोते नक्कीच त्याचे स्वागत करतात, असा अनुभव आहे. पण काहीच बदल न घडवणाऱ्या घटना किती वेळही ऐकवल्या तरी त्यातून काय साध्य होणार? त्यामुळे आकाशवाणीच्या बातम्या सरकारी पारंपरिक जोखडातून मुक्त होत नाहीत, तेच तेच मुद्दे, तोच तोच तपशील यातून त्या बाहेर येत नाहीत, ‘प्रसारभारती’चे घटक म्हणून आपण स्वायत्त आहोत हे भान येत नाही, तोपर्यंत या बातम्या कुठूनही प्रसारित केल्या तरी समाजमन त्याकडे आकर्षित होईल अशी शक्‍यता धूसर दिसते. शिवाय एकूणच सध्याचे दृकश्राव्य माध्यमातले बातम्यांचे वास्तव फारसे उत्साहवर्धक नाही. खासगी वाहिन्यांत बातमी कमी आणि गोष्टच अधिक असते, तर सरकारी बातम्यांत शुष्क बातमीची एक पटणारी, लक्षवेधी गोष्ट करायला हवी हे भान अभावानेच आढळते. श्रोत्यांना केंद्रस्थानी ठेवून बातम्यांचे मूल्य पातळ न करता त्या दिल्या पाहिजेत, यावर आता अधिक भर देणे अपेक्षित आहे. ‘एफएम’ वाहिनीवर गेल्यानंतर आकाशवाणीला आपली ही कमतरता अधिक प्रकर्षाने जाणवू लागेल.

बातम्यांमधील विश्‍वासार्हता हा मुद्दा समोर आला की संदर्भांसाठी आकाशवाणीच्या बातम्या हेच नाव समोर येते. हे कमावलेले संचित अजूनही वृद्धिंगत होऊ शकते. हा वारसा केवळ स्मरणरंजनाने जतन होणार नाही. परंपरा आहे म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा बातमी निवड, सादरीकरण, त्याचे मानवीकरण यातील नवे आयाम शोधावे लागतील. आधुनिक युगाच्या गरजांशी, अभिरुचीशी आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल. आकाशवाणीच्या बातम्यांचा हा खासगी वाहिन्यांवरील प्रवेश ही आकाशवाणीसाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपला वारसा लखलखीत करण्याची एक सर्वोत्तम संधी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr keshav sathye write radio akashvani article in editorial