भाष्य : हितसंबंधांच्या मैदानावर...

क्रिस्तियानो रोनाल्डो या जगप्रसिद्ध फुटबॉलपटूने पत्रकार परिषदेत शीतपेयाची बाटली दूर सारून पाण्याची बाटली जवळ केल्याच्या घटनेचे पडसाद बराच काळ उमटत राहतील, असे दिसते.
Social Commitment
Social CommitmentSakal

प्रायोजकत्वाची भूमिका कालसुसंगत हवी. लेखक, कवी, चित्रकार ही मंडळीही प्रसिद्धीपेक्षा विवेकाची कास धरतात, एखादा पुरस्कार नाकारतात, विशिष्ट व्यासपीठावर जाण्याचे टाळतात. त्याकडे स्टंटबाजी म्हणून पाहू नये. सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.

क्रिस्तियानो रोनाल्डो या जगप्रसिद्ध फुटबॉलपटूने पत्रकार परिषदेत शीतपेयाची बाटली दूर सारून पाण्याची बाटली जवळ केल्याच्या घटनेचे पडसाद बराच काळ उमटत राहतील, असे दिसते. कारण यानंतर फ्रान्स आणि इटलीच्याही दोन मोठ्या खेळाडूंनी त्याची री ओढली. यावरून रोनाल्डोची ही कृतीही अनेकांना अनुकरणीय वाटते हे मानण्यास वाव आहे. स्वरा भास्कर, अनुष्का शर्मा, रणबीर कपूर यांनी गोरी कांती करणाऱ्या मलमाची शिफारस करण्याचे नाकारुन समाजात निर्माण होणाऱ्या वर्णभेदाला थोडा तरी अटकावाचा केलेला प्रयत्न आशादायी आहे. दक्षिण आफ्रिकेचा हाशीम अमला तर प्रायोजकाची विशिष्ट उत्पादनाची जर्सी, ते उत्पादन आरोग्याला उपकारक नाही हे पटल्यामुळे, ती घालण्याचे नाकारतो आणि त्यामुळे नियमाप्रमाणे होणारा दंडही भरतो. याला वेगळे धाडस लागते. स्वत्वाची जाणीव असावी लागते.

प्रायोजकत्व आणि त्यातून वस्तू, सेवेची शिफारस या जागतिक स्तरावर मान्य विपणन विश्वाला आपल्या कार्यपद्धतीची पुनर्रचना आणि पुनर्मूल्यांकन करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या घटना मानता येतील. आपली वस्तू आणि सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठमोठे कलावंत, खेळाडू यांना ‘सदिच्छादूत’ नेमण्याची अहमहमिका आपण नेहेमीच पाहतो. आपल्याकडे व्यक्तिमाहात्म्य जास्तच असल्यामुळे शिफारशी करणारे ५०% विपणन संदेश हे प्रसिद्ध व्यक्तींचे असतात, ते प्रमाण अमेरिकेत केवळ २०% आहे. अर्थात यात गैर काहीच नाही. जगभरातले हे दृश्‍य आहे. सवाई गंधर्वपासून ते ऑस्करपर्यंत आणि विम्बल्डनपासून ते अगदी महाविद्यालयाच्या युवक महोत्सवापर्यंत प्रायोजकांची लागलेली रांग हे वास्तव सर्वांनीच मान्य केले आहे. ही एक व्यवस्था आहे. तिचा प्रवास अव्याहत सुरू असताना रोनाल्डोची कृती किंवा जपानच्या ओसाकाने पारंपरिक पत्रकार परिषदेचा उपचार असह्य वाटल्याने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय हे एकप्रकारे व्यवस्थेला विचारलेले प्रश्न आहेत.

निरोगी जीवनशैलीचा आग्रह, खेळाडू म्हणून तंदुरुस्त राहण्यासाठी नैसर्गिक पेयाची निवड हे त्याच्या या कृतीमागचे कारण असण्याची शक्‍यता अधिक दिसते. फुटबॉलच्या मैदानावर थिरकणारी पाऊले, नेहमीची वहिवाट न अनुसरता सकारात्मक मार्ग निवडतात ही बाब महत्वाची आहे. व्यवसायातून मिळणाऱ्या पैशाच्या खणखणाटापेक्षा अंतर्नाद अधिक मोलाचा आहे, हा साक्षात्कार होणे ही केव्हाही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. या पूर्वीही काही मोजक्‍या खेळाडू, कलावंतांनी हा आपला नकाराधिकार वापरला आहे. काहींनी आधी प्रवाह पतित होऊन नंतर त्याविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतल्याचीही उदाहरणे आहेत. शेवटी प्रायोजकत्व काय किंवा सदिच्छादूत ही जबाबदारी काय या व्यावसायिक अपरिहार्यतेच्या पलीकडे जाऊन खेळाडू, कलावंत निर्णय घेतात तेंव्हा त्यांनी सद्‌सदविवेकला प्राधान्य दिलेले असते. फ्रेंच खुल्या स्पर्धेतून फेडररची माघार किंवा राफेल नदालचा विम्बल्डन आणि जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये न खेळण्याचा निर्णय, हे शहाणे निर्णय क्रीडाजगतात दीर्घकाळ लक्षात राहतील. आपल्या तंदुरुस्तीला प्राधान्य हा त्या मागचा हेतू असला तरी त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळणाऱ्या कोट्यवधी रकमेच्या मानधनावर इतक्‍या सहजासहजी पाणी सोडणे ही सोपी गोष्ट नाही. प्रायोजकत्वाच्या या सुळसुळाटात डोळे दिपवणाऱ्या व्यावसायिक मोहिमेतील आत्मशोधाचे किरण असेच या घटनेचे विश्‍लेषण करता येईल.

गळेकापू स्पर्धा

‘प्रायोजकत्व’ ही संकल्पना गेल्या काही वर्षांमध्ये जोर धरलेली असली तरी तिची सुरवात इसवीसन पूर्व काळापासूनची दिसते. रोम साम्राज्यातील गाजलेल्या ग्लॅडीएटरच्या लढतीसुद्धा प्रायोजित असत. त्याचा खर्च उचलणाऱ्या धनिकांची नावे भिंतींवर लिहिली जात. समाजात आपल प्रभाव वाढवा आणि सत्ताकेंद्राकडे सहज वाटचाल करता यावी, हा हेतू त्यामागे दिसतो. त्याला दोन-अडीच हजार वर्षांचा काळ उलटला. नवे शोध लागले, तंत्रज्ञान बदलले. संगणकामुळे, समाज माध्यमांमुळे जग जवळ आलेत्या समाजाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. जुन्या बाळबोध पारंपरिक संप्रेक्षणाच्या व्याख्या बदलल्या. पण प्रायोजकत्व असो वा शिफारस करणाऱ्या सदिच्छादूतांच्या कृतीतून वस्तू सेवा वापराबद्दलचा आग्रह करण्याचा प्रयत्न असो, त्याचे एक ठोकळेबाज स्वरुप कायम राहिले. या प्रायोजकत्व मोहिमाही अनौपाचारिकतेच्या पलीकडे जाताना दिसत नाहीत.एखादी वस्तू वारंवार दाखवणे, वस्तूचे वेष्टन एक सारखे ग्राहकांसमोर नाचवणे, शब्दांतून, चित्रांतून, रचनांमधून, संगीतातून त्यांच्या बोध चिन्हांचा, घोषवाक्‍याचा सततचा भडिमार करणे म्हणजे यशस्वी मोहीम आखणी या मानसिकतेतून या मंडळीनी लवकरात लवकर बाहेर यावे. कारण समाज आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगापर्यंत पोहोचला आहे. हे करताना आपल्या गरजा आणि त्या भागवणाऱ्या वस्तूंकडे, सेवांकडे वस्तुनिष्ठपणे आणि तटस्थपणे पाहू लागला आहे. त्याच्या आवडीनिवडी या काही तात्कालिक संदेशांच्या, दृकश्राव्य साधनांच्या प्रभावाखाली सहजासहजी येण्यासारख्या राहिल्या नाहीत. गळेकापू स्पर्धेमुळे भयगंड निर्माण होतो, भयातून आक्रमकता जन्म घेते. तिचा परिणाम मग अशा मोहिमांवर होतो. मग त्या बटबटीत होतात, त्यातून फायद्यापेक्षा नुकसानच होऊ शकते. आपल्याकडील आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर काहीही शक्‍य आहे ही अंधश्रद्धा रोनाल्डोसारख्या घटनांमुळे हळूहळू कमी व्हावी.

एकीकडे बाजारीकरण, चंगळवाद वाढताना आपण पाहतो. हजारो वस्तू, सेवा यांच्या उपलब्धतेचा आणि उपयुक्ततेचा मारा सतत आपल्यावर होत असताना; ज्यांच्या शब्दाला, कृतीला, एका साध्या कटाक्षाला अमाप मोल आहे त्या व्यक्ती पर्यावरणाचा, सामाजिक सौहार्दाचा, स्त्री पुरुष समानतेचा देशाच्या एकात्मतेचा विचार करतात तेव्हा एकार्थाने त्या कळत नकळतपणे सामाजिक संस्कृतीची विस्कटलेली घडी नीट करण्याचाच प्रयत्न करत असतात. या प्रसिद्ध व्यक्तींची सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक सकारात्मकपणे यातून पुढे येते. अनेक सामाजिक संस्थांचे उपक्रम, कॅन्सर, एड्‌स सारख्या जीवघेण्या रोगांच्या लढाई विरुद्धची मोहीम यात हिरीरीने कलावंत, खेळाडू उतरत आहेत. कोरोनाच्या संकटातही या मंडळीनी आपले उत्तरदायित्व दाखवून सेलिब्रिटीज हा समाजाचाच एक हिस्सा आहेत यावर शिक्कामोर्तब केले. प्रायोजकत्व आणि शिफारसकेंद्रित संदेश म्हणजे केवळ व्यावसायिक हेतू; याला छेद देणाऱ्या या घटना आहेत. उसना आवाज न घेता आपला आवाज वापरण्याची ऊर्मी याच्या मुळाशी आहे. या संवेदनशीलतेचा सन्मान व्हावा. हे केवळ खेळाडू, सिने-नाट्य कलावंत यापुरतेच मर्यादित नाही, तर सर्वच क्षेत्रांना लागू आहे. लेखक, कवी, चित्रकार ही मंडळीही प्रसिद्धीपेक्षा विवेकाची कास धरतात, एखादा पुरस्कार नाकारतात, विशिष्ट व्यासपीठावर जाण्याचे टाळतात. त्याकडे स्टंटबाजी म्हणून पाहू नये. त्याच्या प्रवाहपतित न होण्याच्या कृतीचा आदर केला पाहिजे. शीतपेयाला जसे प्रायोजकत्व लागते तसे शुद्धोदकाला लागत नाही. हाच या कृतीचा पाण्यासारखा स्वच्छ आणि नितळ अर्थ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com