रेषांना बोलते करणारा भाष्यकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SD Phadnis

चित्रकला या प्रकारात ‘शब्देविण संवाद’ हा प्रयोग एका चित्रकाराने ७० वर्षांहून ही अधिक काळ यशस्वीपणे केला आणि आजही ते तेवढ्याच उत्साहाने कार्यरत आहेत.

रेषांना बोलते करणारा भाष्यकार

चित्रकला या प्रकारात ‘शब्देविण संवाद’ हा प्रयोग एका चित्रकाराने ७० वर्षांहून ही अधिक काळ  यशस्वीपणे केला आणि आजही ते तेवढ्याच उत्साहाने कार्यरत आहेत. ते म्हणजे शिवराम दत्तात्रेय ऊर्फ शि. द. फडणीस. आज त्यांचा ९७ वा वाढदिवस. त्यानिमित्त.

शि. द. फडणीस यांचा जन्म २९ जुलै १९२५ रोजी झाला अन् त्यांचा जीवनप्रवास सुरु झाला तो बेळगाव जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातून. भोज या खेड्यातला हा मुलगा शिक्षणासाठी कोल्हापूरला आला. रंकाळ्यावर स्केचिंग करतानाच आपल्याकडे रंगरेषांची अफलातून जादू आहे, हे त्याच्या लक्षात आलं. आता शिकायला जाईन तर मुंबईला; जे जे स्कूल ऑफ आर्ट्सलाच, या निर्धारामुळे त्याची पावले जे.जे. मध्ये पडून चित्रकला आकार घेऊ लागली.

शि. द. यांचं पाहिलं चित्र प्रसिद्ध झालं ते पुण्याच्या ‘मनोहर’या साप्ताहिकात १९४६ मध्ये. ‘हंस प्रकाशन’च्या अनंत अंतरकरांनी आपल्याला मासिकासाठी चांगले चित्रकार, व्यंगचित्रकार मिळावेत म्हणून एक स्पर्धा जाहीर केली होती. २१-२२ वर्षाच्या या तरुणाने सहज एक चित्र पाठवून दिले. याच चित्राने या मुलाचा हास्यचित्रकार, हास्य भाष्यकार होण्याचा मार्ग खुला करून दिला. या कलाकाराच्या चित्रांनी, मुखपृष्ठांनी हंस, नवल आणि मोहिनी या मासिकांचे नुसते चेहेरेच नव्हे तर अंतरंगही सहा-सात दशके रंगीबेरंगी केले. ‘मोहिनी’ दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ ६७ वर्ष सलग सजवण्याचा दुर्मिळ विक्रम यांच्या नावावर आहे. रसिक मनावर प्रसन्न अशा रंगरेषा उधळण्याचा हा सर्जनशील उत्सव ७०-७५ वर्षांपासून मराठी वाचक साजरा करीत आहेत. त्यांची चित्रे अगदी साध्या सरळरेषांनी आणि प्रसन्न रंगसंगतीने नटलेली असतातच, शिवाय नीट चित्र पाहिल्याशिवाय त्यातील गंमतही लक्षात येत नाही. एखाद्या लेखकाच्या साहित्यिक स्वभावधर्माला, मांडणीला तेवढ्याच तोलामोलाची दृश्य साथ मिळणे हा दुर्मिळ योग असतो. पु. ल. देशपांडे आणि चिं. वि. जोशी यांच्यात हा योग अतिशय छान जमून आला.

आपल्या दैनंदिन आयुष्यात सहज घडणारे प्रसंग या कलावंताच्या कल्पना भरारीमुळे एकदम स्पेशल होऊन जातात. यातील माणसे तुमच्या आमच्या शेजारी राहणारी असतात. यात कारकून असतो, त्याची बायको असते. कॉलेजमधला नुकताच मिसरुड फुटलेला मुलगा असतो. सायकल-स्कूटर वरून फिरणारा तरुण असतो. सहज पाहिलं तर चित्रातली गंमत चटकन लक्षात येईलच, असे नाही. पण नीट बघितलं तर विनोदाची जागा सापडते आणि एक हलकेसे हास्य आपल्या चेहऱ्यावर उमटते.

‘हसरी गॅलरी’ हे चित्रांचे प्रदर्शन त्यांनी ५-६ दशके जगभरात भरवत रसिकांना चित्रसंस्कृतीची जवळून ओळख करून दिली. समाजाला चित्रसाक्षर बनवण्यात या उपक्रमाचा मोठा वाटा आहे. ही प्रदर्शने भरवण्यात सर्वांत मोठे योगदान शि. द. यांच्या दिवंगत पत्नी आणि लेखिका शकुंतला फडणीस यांचेही होते. चित्र प्रदर्शनांवर सेवाकर लावला जाऊ नये यासाठी सरकार दरबारी ते सहा वर्षे (१९६६ ते १७२) लढले आणि जिंकलेही. ‘बालभारती’च्या पुस्तकातील हसऱ्या नाचऱ्या चित्रांमुळे मुलांची गणिताशी चक्क दोस्ती झाली. गणितातील अमूर्त संकल्पना यांच्या चित्रमयशैलीने एकदम सोप्या वाटायला लागल्या.

चित्रकार, व्यंगचित्रकार, चित्र व्यवसायातील चुकीच्या परंपरांना नाकारणारा, त्यासाठी वर्षानुवर्षे लढा देणारा, शालेय शिक्षणात संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपल्या कलेचा नेमका उपयोग करणारा एक कल्पक कलावंत आणि जगभर फिरून हास्यचित्रांचा जागर मांडणारा सदिच्छा दूत अशा अनेक भूमिका उत्कृष्टपणे पार पाडणारे असे हे सदाहरित चित्रकार शि. द. यांचा हा ९७ वा वाढदिवस. उत्तम आयुरारोग्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा!

Web Title: Dr Keshav Sathye Writes Drawing Sd Phadnis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial ArticleDrawing
go to top