जागृती मोहिमेचे उठवा मोहोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागृती मोहिमेचे उठवा मोहोळ

सखोल संशोधन अव्याहत सुरू असलेला कीटक म्हणजे मधमाशी. मधमाश्यांचा कीटकनाशके व इतर कारणांमुळे ऱ्हास होत आहे. आजच्या ‘जागतिक मधमाशा दिना’निमित्त.

जागृती मोहिमेचे उठवा मोहोळ

सखोल संशोधन अव्याहत सुरू असलेला कीटक म्हणजे मधमाशी. मधमाश्यांचा कीटकनाशके व इतर कारणांमुळे ऱ्हास होत आहे. आजच्या ‘जागतिक मधमाशा दिना’निमित्त.

मधमाशा जगल्या तर आपण जगू. आपल्या आहारात येणाऱ्या अन्नपदार्थांपैकी सुमारे ६० ते ७० टक्के पदार्थ मधमाशांमुळे मिळू शकतात. कृषी उत्पादनवाढ, फलोत्पादन, वनसमृद्धी, जैवविविधता आणि पर्यावरण संतुलन यामधील मधमाशांची अत्यावश्‍यक भूमिका लक्षात घेऊन आधुनिक मधमाशापालन तंत्र विकसित झालं. त्यासाठी, मधमाशांचा जीवनक्रम, स्वभाववर्तन, मोहोळांची अंतर्गत रचना, सहकारी तत्त्वाने जगणारे त्यांचे कुटुंब, अशा अनेक पैलूंवर जगभरचे सातत्याने संशोधन सुरू आहे. सखोल संशोधन झालेला आणि होत असलेला जगातील एकमेव कीटक म्हणजे मधमाशीच असू शकेल. शेतीपूरक ग्रामोद्योग असलेला मधमाशापालन हा व्यवसाय एक आदर्श उद्योग असू शकेल. महात्मा गांधींनी हे ओळखून या व्यवसायाच्या वाढीसाठी पुढाकार घेतला होता.

भारतात आधुनिक तंत्राने मधमाशापालन व्यवसाय विकसित करण्यासाठी १९ वं शतक उजाडावं लागलं. आता तो उत्तम रीतीने स्थिरावला आहे. आपण भारताची शेती उत्पादनवाढ आणि मध, मेण, राजान्न (रॉयल जेली), औषधी बीजोत्पादन यामध्ये खूप प्रगती केली आहे. मधमाशा उत्पादित मध व मेण यांची निर्यातसुद्धा करू शकतो आहोत. तरीही या व्यवसायाच्या वाढीला अजून खूप वाव आहे. म्हणून शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात मधमाशी पालन विषयाचा समावेश करणं, ग्रामीण शेतकरी व अन्य उद्योजक यांची जनजागृती याची नितांत गरज आहे. भारतातही पंतप्रधानांच्या प्रोत्साहनामुळे हा व्यवसाय वेगाने विस्तारत आहे. देशात राष्ट्रपतीभवन, राजभवन, कृषी विद्यापीठे, महाविद्यालये व कृषी, वन आणि पर्यावरण संशोधन संस्था या ठिकाणी जागतिक मधमाशादिन साजरा होत आहे. यंदाच्या दिवसाचा मध्यवर्ती विषय आहे, मधमाशांद्वारा परागीकरण व कृषी उत्पादनवाढ आणि पर्यावरण संतुलन. हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व सामाजिक घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

Be engaged, build back better for bees, हे यंदाच्या मधमाशी दिनाचे बोधवाक्य आहे. त्या दिशेने सामूहिक प्रयत्न व्हायला हवेत.

व्यवसायाची पायाभरणी

‘२० मे’ या दिवसाचं महत्त्व म्हणजे त्या दिवशी १७३४ मध्ये अँटन जान्सा या स्लोव्हेनियामधील प्रगतीशील मधपाळाचा जन्म झाला. ब्रेझेनिका आणि कॅरोलीन यांचा हा मुलगा. वडील शेतकरी होते. त्यांनी त्याकाळी मधमाशांची शंभर मोहोळं आपल्या व शेजाऱ्यांच्या शेतात पाळली होती. अँटन याने चित्रकलेचं शिक्षण पूर्ण केलं; परंतु तो मधमाशापालन व्यवसायातच रमला. १७६९मध्ये त्याची मधमाशाव्यवसाय प्रशिक्षक म्हणून अधिकृत नियुक्ती तत्कालीन राजघराण्याने केली. ऑस्ट्रियात त्याचं कार्यक्षेत्र विस्तारलं. ‘इंपेरियल गार्डन’मध्ये त्याने स्वतःचं मधुबन प्रस्थापित केलं. या विषयावर त्याची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याच्या जन्म घरी त्याच्या स्मरणार्थ एक संग्रहालय १८८४ मध्ये निर्माण केलं गेलं, त्यामध्ये तो वापरत असलेल्या मोहोळांच्या लाकडी पेट्या आदी साहित्य संग्रहित केलं आहे. त्याच्या चिकाटीमुळे मधमाशा पालन व्यवसायाची पायाभरणी झाली.

(लेखक केंद्रीय मधमाशा संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील निवृत्त संशोधक आहेत.)