अमेरिकेतील लवाद प्रक्रिया; घेण्याजोगे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

American Arbitration Association

अमेरिकेत ‘द अमेरिकन आर्बिट्रेशन असोसिएशन’ या मान्यताप्राप्त अग्रगण्य संस्थेच्या माध्यमातून लवादाचे काम चालते.

अमेरिकेतील लवाद प्रक्रिया; घेण्याजोगे काही

- डॉ. कृष्णभूषण ए. महाशब्दे

अमेरिकेतील वास्तव्यात तेथील `व्यावसायिक लवादां’ची पद्धत अभ्यासताना जाणवलेल्या काही बाबी. भारतातील लवाद पद्धतही चांगलीच आहे. तरीही अमेरिकेतील पद्धतीकडून काही गोष्टी घेता येतील.

अमेरिकेत ‘द अमेरिकन आर्बिट्रेशन असोसिएशन’ या मान्यताप्राप्त अग्रगण्य संस्थेच्या माध्यमातून लवादाचे काम चालते. American Arbitration Association-AAAk कडे इच्छुक पक्षाला लवादासाठी विनंतीअर्ज करावा लागतो. या संस्थेचे नियम मान्य असल्याचे अर्जदारांना लेखी कळवावे लागते. मान्य केलेल्या लवादांची नावे सदर संस्थेला कळवून तिच्यामार्फत पुढील कार्यवाही केली जाते. ‘एएए’ने सर्व मान्यताप्राप्त लवादांची सूची तयार केलेली आहे. त्यांतील नांवे निवडता येतात. करारात लवादाची तरतूद असेल, तर अर्जदार, ज्याला आपण ‘वादी’ म्हणून संबोधतो, तो विरुद्ध बाजूला म्हणजेच ‘प्रतिवादी’ला तशी सूचना देतो. मात्र भारतात ती प्रतिवादीला वादी स्वत: पाठवतो; तर अमेरिकेत ‘एएए’च्या त्या विभागाच्या कार्यालयात सदर लेखी नोटीस व कराराच्या प्रत्येकी तीन प्रती योग्य शुल्क भरून वादीला दाखल कराव्या लागतात.

त्यानंतर वादीच्या वतीने ‘एएए’ प्रतिवादीला किंवा प्रतिवादींना तशी नोटीस पाठवते. ही नोटीस मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत संबंधित प्रतिवादी ‘एएए’ला दोन प्रतींमध्ये उत्तर पाठवतो व त्या उत्तराची एक प्रत वादीसही नियमानुसार पाठवतो. या उत्तरात जर प्रतिवादीला किंवा प्रतिवादींना ‘उलट मागणी’ (counter claim) करावयाची असेल तर त्याची संपूर्ण माहिती, प्रतिदावा आणि उलट मागणीची रक्कम सविस्तर नमूद करावी लागते. या मागणीनुसार ‘एएए’ची आवश्यक फी देखील भरावी लागते. नोटिशीला प्रतिवादीने विहीत मुदतीत उत्तर दिले नाही, तर याचा अर्थ वादीचा दावा प्रतिवादीला मान्य नाही, असा घेतला जातो. पण यामुळे पुढील प्रक्रियेत दिरंगाई होत नाही. भारतात हे काम लवादालाच करावे लागत असल्याने दिरंगाई होते. भारतातही अमेरिकी पद्धतीचे अनुकरण केल्यास दिरंगाई टळू शकते.

वेळापत्रकाबाबत काटेकोर

अमेरिकेत लवादाची संपूर्ण कार्यवाही जलद गतीने आणि विनाअडथळा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व प्रथम वादी, प्रतिवादींना एकत्र बोलावून त्यांची ‘एएए’सह प्राथमिक सुनावणी होते. त्यात लवाद ‘एएए’सह दोन्ही पक्षांना प्रक्रियेची रूपरेषा समजावून सांगतात. साक्षी, पुरावे, कागदपत्रे आणि कार्यवाहीचे वेळापत्रक यांची नोंद केली जाते. या बाबतीत काटेकोर वेळापत्रक पाळतात, भारतात ते होत नाही. ती बाब आपण आत्मसात करायला हवी.

लवादाच्या कार्यवाहीचे ठिकाण, पात्रता इ. नियम भारतासारखेच आहेत. मात्र नेमणुकीत वेगळेपण आहे. वादीने दाव्यासंबंधी ‘एएए’कडे लेखी अर्ज दिला परंतु लवादाचे नांव सुचवले नसेल; तर ‘एएए’ त्या प्रकारच्या दाव्यासाठी योग्य असणाऱ्या, सूचीतील सर्व अनुभवी लवादांची नांवे वादी व प्रतिवादींना त्वरित कळवते. ज्या नावांना वादी, प्रतिवादींचा आक्षेप असेल, ती वगळून उर्वरित सर्व नांवे प्राधान्यक्रमाने दहा दिवसांच्या आत ‘एएए’ला कळवावी लागतात. जर एका पक्षाने तशी यादी परत ‘एएए’ला पाठवली नाही, तर याचा अर्थ ‘एएए’ने पाठवलेली यादी त्या पक्षाला मान्य आहे, असा घेतला जातो. दोन्ही पक्षांनी सूचीतील त्यांच्या पसंतीची लवादांची नांवे आपला प्राधान्यक्रम देऊन ‘एएए’ला कळवली की ‘एएए’ त्यातील दोन्हीकडील समान नांवे बाजूला काढून प्राधान्यक्रमानुसार त्यांची यादी तयार करते आणि अग्रक्रमाप्रमाणे त्या लवादांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे काम करण्यासाठी निमंत्रण देते. प्रथम प्राधान्य असलेल्या लवादाने असमर्थता दर्शवली, तरच पुढील प्राधान्यक्रम असलेल्या लवादाशी ‘एएए’ संपर्क साधते. नांवावर एकमत झाले नाही; तर ‘एएए’ आपला अधिकार वापरून योग्य नेमणूक करते व पुढील कार्यवाही लगेच सुरू करते. हे भारतात घेण्याजोगे आहे.

पदाची शपथ

अमेरिकेत लवाद सुनावणीचे काम सुरू करण्यापूर्वी पदाची शपथ घेतात. भारतात ती प्रथा नाही. लवादांचा आणि वादी, प्रतिवादींचा अमेरिकेत भारताप्रमाणे सुनावणीव्यतिरिक्त थेट किंवा प्रत्यक्ष संबंध येत नाही. सर्व पत्रव्यवहार व संपर्क ‘एएए’मार्फतच केला जातो. साक्ष, पुरावा घेण्यासाठी आवश्यक वाटल्यास लवाद समन्स काढते. सुनावणी संपल्यानंतर महिन्यात निकाल देणे अनिवार्य असते. लवाद ‘एएए’ची फी देखील इतर मंजूर खर्चांसह व रकमेसह निकालपत्रात नमूद करतो. जर सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी आपसात समझोता केला; तर त्या समझोत्याच्या सर्व मान्य अटी, शर्ती लवाद निकालपत्रात नमूद करतो. अशा प्रकारच्या निकालाला अमेरिकेत consent award म्हणतात. आपणही ही पद्धत अवलंबितो.

‘एएए’ आणि लवाद यांना लवादप्रक्रियेत आपल्या व्यवस्थेसारखेच न्यायालयीन संरक्षण असते. लवाद सुनावणीचे नियम प्रचलित कायद्याच्या आधीन राहून ‘एएए’ बनवते. अमेरिकेत ‘एएए’ सर्व पक्षांना फोनवर सूचना (नोटीस) देतात. त्यानंतर ती लेखी स्वरूपात विनाविलंब पाठवणे ही ‘एएए’ची जबाबदारी असते. अमेरिकेत जर फक्त आवश्यक ती कागदपत्रे, लेखी पुरावे दाखल करून वाद मिटवता येत असेल; तर सुनावणी टाळली जाते. अन्यथा साधारणतः एका दिवसातच सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो. भारतात तसे होत नाही. पुरेसे कारण असेल तरच अतिरिक्त सुनावणींची संख्या सात दिवसांच्या आत ठरवून त्याप्रमाणे सुनावणी घेऊन पूर्ण केली जाते. संपूर्ण सुनावणी पार पाडल्यानंतर चौदा दिवसांच्या आत निकाल (award) लवाद जाहीर करतो. विशिष्ट कारण असेल तरच सर्वपक्षीय संमतीने निकाल उशीरा जाहीर करण्याची मुभा असते. हा भाग वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. त्याचे भारतात आपण अनुकरण करू शकतो. आपणही आपली लवाद व्यवस्था प्रभावीपणे राबवत आहोत. पण प्रत्येक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यास वाव असतोच, तसा तो आपल्यालाही आहे.

(लेखक सल्लागार वास्तुविशारद व लवाद आहेत.)

टॅग्स :americaEditorial Article