Nagpanchami 2023: ‘आयत्या बिळात नागोबा’ या म्हणीमागचे शास्त्र माहितीये का?

जैवविविधतेला वाचविण्याची ‘नागपंचमी’ नक्कीच साजरी झाली पाहिजे. वारुळे, मुंग्या, सापांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने पूर्वजांनी हा सण सुरू केला.
Nagpanchami 2023
Nagpanchami 2023sakal

जैवविविधतेला वाचविण्याची ‘नागपंचमी’ नक्कीच साजरी झाली पाहिजे. वारुळे, मुंग्या, सापांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने पूर्वजांनी हा सण सुरू केला. तो साजरा करताना पर्यावरणाचा विचार व्हायला हवा.

श्रावणातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवतेची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून आणि मातीचा नागोबा काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पुजतात.

गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.  लग्न झालेल्या मुलींची पहिली पंचमी म्हणजे माहेरला जाऊन झोके बांधून छानप्रकारे खेळ व गाणी म्हणणे.

वारूळाच्या कथेनुसार महिला नागोबाला भाऊ मानतात म्हणून बहिणीने भावाच्या नावे उपवास करायचा अशी प्रथा आहे. वारुळातील काही रिकामी बिळे असतात, त्यांत दूध ओतायचं आणि पूजा करायची अशीही प्रथा आहे. हे दूध मुंग्यांना उपयोगी पडतं हे यातलं शास्त्रीय कारण. दिंड निविद (म्हणजे पुरण घालून पोळी करणे) नागोबाला ठेवतात.

हाच दिंड मुंग्या आवडीने खातात. शरीर निरोगी राहण्यासाठी पंचमीत हातावर मेहंदी काढतात. मेहंदी शरीरातील उष्णता शोषून घेते. शिवाय त्वचा स्वच्छ करते. मेहंदी आपल्या घरासमोरील झाडाची असली पाहिजे, कोणतेही रसायन घातलेली नसावी.

वारुळे, मुंग्या, सापांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने पूर्वजांनी नागपंचमी सुरू केली. नागपंचमीशी जोडलेल्या रूढींमागे महत्त्वाचा विचार आहे. पण माणूस त्यातून योग्य बोध घेत नाही आणि खऱ्या नागाची पूजा करतो. पूर्वी लोक मातीचे नाग करून त्याची पूजा करत व तो वारुळापुढे ठेवत. मुंग्या व वाळवी खूप वेगवेगळ्या प्रकारची वारुळे बांधतात.

अगदी किल्लेच तयार करतात. हे किल्ले अर्थात वारुळे तयार करताना आपल्या तोंडातील आम्लयुक्त लाळेचा उपयोग करून जमिनीखालील मातीचा प्रत्येक कण आणि कण उकरून वरील बाजूस आपल्याला दिसणारे वारूळ तयार करतात. मात्र वारूळ हे जमिनीच्या खोलवर असते तेवढेच जमिनीच्या वर असते.

पावसाळ्यात चुकून वारुळाची माती वाहिल्यास मातीच्या नागाची माती वापरून मुंग्या डागडुजी करतात, म्हणून मातीचा नाग लोक करायचे. या वारुळात साप कधीतरी राहतो आणि मग शेतकरी किवा एखादा वाटसरू अशी घटना पाहतो आणि मग हे वारूळ नागाचे किवा सापाचे आहे, असे जाहीर केले जाते.

‘आयत्या बिळात नागोबा’ अशी जुनी म्हण आहे. या म्हणीत सर्व शास्त्र लपलेले आहे. वारूळ आहे मुंग्यांचे, मात्र राहतो नागोबा, याचाच फायदा घेत पूर्वजांनी हा सण सुरू केला व एकाचवेळी दोन जिवांना जीवदान दिले.

नेमके पावसाळ्यात शेताच्या बांधावर किंवा शेतीच्या तालीवर अनेक साप आढळतात, कारण खोलगट शेतात पाणी साचते, मग साप शेताच्या वरच्या भागात आसरा घेतात. कधी अधूनमधून वारुळात शिरलेल्या उंदरांवर ताव मारायला नाग आणि धामण शिरतात आणि मग नागोबा प्रत्यक्ष वारुळातून बाहेर पडताना आपल्याला दिसतात.

शिवाय इतरही साप बसण्याच्या जागेत पावसाचे पाणी जाते आणि मग बहुतांश वेळा साप रत्यावर किंवा घराच्या कडेला आसरा घेतात, यात साप मारले जाऊ नयेत म्हणून पूर्वजांनी नागपंचमी सण साजरा करण्याचे मोठे शास्त्र जगापुढे निर्माण करून ठेवले असावे. साप दूध पीत नाही हेही आपल्या पूर्वजांना माहीत होते.

मात्र तरीही त्यांनी वारुळापुढे लाह्या, साखर, बत्ताशे, शेगदाणे, तांदूळ, असे नानविध पदार्थ ठेवले जातात. हे तर सर्व अन्न फक्त मुग्यांचे आहे. म्हणजे पावसाळ्यात मुग्यांना खाद्य मिळावे म्हणून ही व्यवस्था केल्याचे दिसून येते. मात्र सध्या समाजात चुकीच्या समजुती फोफावत असल्याने परिणामी सण बाजूला राहत आहे.

त्यामुळे यापुढे फक्त वारूळांची पूजा करून त्याठिकाणी शाकाहारी निवद ठेवल्यास निसर्गसंवर्धन साधेल. लाखो मुग्यांचे वारूळ नष्ट करू नये ही पवित्र भावना. अनेक गावात मोठ मोठे मातीचे नाग करून त्याची सार्वजनिक पूजा सुद्धा केली जाते. ही बाब पर्यावरणास पूरक आहे.

दरवर्षी लाखो उंदरांकडून आपल्या शेतीचे ३० टक्के उत्पादन नष्ट केले जाते. उंदरांच्या नियंत्रणाचे काम सापांकडून होते. मुंग्या पृथ्वीवर जिथं माती तिथं दरवर्षी एक चौरस किलोमीटरमध्ये ५० टन खतनिर्मिती करतात.

मुंग्या आणि मधमाशी आणि साप यांचा एकत्रितपणे विचार केल्यास यांच्याशिवाय आपण शेती करूच शकत नाही. अर्थात सापांना व मुंग्यांना वाचविणे हे महत्त्वाचे कार्य पूर्वजांनी खूप कल्पकतेतून केले आहे, आपणही पुढे हा वसा सुरू ठेवूयात. मातीच्या नागाची पूजा करावी.

(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com