काजळी कार्बनच्या पाऊलखुणांची

काजळी कार्बनच्या पाऊलखुणांची

प्रत्येक वर्षी येणारा २१मार्चचा विषुवदिन (दिवस व रात्र सारखेच असण्याचा दिवस) थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव करून देत असतो. परंतु गेल्या काही वर्षांप्रमाणेच याही वर्षी भारतीय हवामान विभागाने असा अंदाज वर्तविला आहे, की २१ मार्चपासून रोज दिवसाच्या तापमानात एका अंशाची वाढ होऊन साधारणपणे २७ मार्चला हे तापमान ४० अंशांच्याही वर जाईल. याचा स्पष्ट संदर्भ हा जागतिक तापमानातील वाढ अधोरेखित करतो. याच दृष्टीने जागतिक तापमानवाढीचा एक मुख्य घटक असलेल्या कार्बनच्या पाऊलखुणा किवा पदचिन्हे यांची चर्चा होणे गरजेचे ठरते.

कार्बनच्या पाऊलखुणा ही आजच्या शतकातील मोठी समस्या असून, ती मुख्यतः मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे निर्माण झालेली आहे. कार्बनच्या पाऊलखुणा याची थोडक्‍यात अशी व्याख्या करता येईल, की मानवीय क्रिया-प्रक्रियांसाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जे हरितगृह वायू वातावरणात सोडले जातात त्याचे एक टन कार्बन उत्सर्जनाशी असलेले नाते होय. हे प्रमाण साधारणपणे एका वर्षाच्या कालावधीसाठी विचारात घेतले जाते. या पाऊलखुणांचा दृश्‍य परिणाम हा जागतिक तापमानवाढीच्या स्वरूपात आज जगासमोर आला आहे. हरितगृह वायूंच्या वाढत्या उत्सर्जनामुळे पृथ्वीवर सूर्याकडून येणाऱ्या किरणांची उष्णता गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वातावरणात शोषून घेतली जाते. या हरितगृह वायूंपैकी कार्बनडाय ऑक्‍साइड या वायूचे हे परिणाम सर्वप्रथम जगासमोर आले. गेल्या दोन शतकांपासून पृथ्वीवरील कार्बनच्या चक्रात खूप बदल घडून आले आहेत, असे प्रतिपादन ‘नासा’ या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने कार्बनच्या पाऊलखुणांच्या संदर्भात २०१५ मध्ये केले. मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या वातावरणातील कार्बनच्या प्रमाणात सतत वाढ होत असून, गेली काही दशके व वर्षांमधील वाढीचे हे प्रमाण गेल्या शंभर वर्षांच्या वाढीच्या तुलनेत खूपच जास्त आहे. यामुळे पृथ्वीवरील कार्बनच्या चक्राचा समतोल बिघडून त्याचा जागतिक तापमानावर विपरीत परिणाम होत आहे. या संदर्भाने ‘कार्बन चक्र’ म्हणजे काय हे बघावे लागेल.

कार्बन चक्र हे जैव-भू- रासायनिक चक्र असून, त्याच्या माध्यमातून पृथ्वीवरील कार्बनची नैसर्गिक साखळी पूर्ण होते. ही एक अशी एकत्रित प्रक्रिया आहे, ज्यात वनस्पतींचे प्रकाश-संश्‍लेषण, सजीवांचे कुजणे व सर्व सजीवांचे श्वसन या क्रियांच्या माध्यमातून कार्बनच्या वेगवेगळ्या घटकांचे त्याच्या नैसर्गिक साठ्यांमध्ये चक्रिय पद्धतीने पुनर्भरण होते. यात कोणताही एखादा घटक कमी-जास्त झाल्यास ही साखळी विस्कळित होऊन वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी किंवा जास्त होते. कार्बनच्या पाऊलखुणांचा संदर्भ हा वातावरणातील कार्बनचे प्रमाण गरजेपेक्षा वाढण्याशी आहे. गेल्या दोन शतकांपासून वाढत असलेल्या कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाण हे मुख्यत्वे औद्योगिक क्रांती व त्यानंतर उदयाला आलेल्या भांडवलशाही पद्धतीतील वाढत्या उत्पादनामुळे घडून आले आहे. कोणत्याही वस्तू व सेवांच्या उत्पादनात कोळसा, खनिज तेल इ. जीवाश्‍म इंधनाच्या ज्वलनामुळे कार्बनचे अतिरिक्त उत्सर्जन होते व नैसर्गिक कार्बन चक्राचा समतोल बिघडतो व यातूनच जागतिक तापमानवाढीची समस्या निर्माण होते. यात मिथेनसारखे इतरही वायू आहेत, ज्यांना हरितगृह वायू असे म्हटले जाते. परंतु या सर्वांमध्ये कार्बनच्या पाऊलखुणा विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण इतर हरितगृह वायूंच्या तुलनेत कार्बन वातावरणात जास्त प्रमाणात सोडला जातो. याचे कारण म्हणजे कार्बन उत्सर्जनाचे प्रमुख स्रोत हे शेती व जीवाश्‍म इंधनांचे अर्धवट किंवा अपुरे ज्वलन हे आहेत. यातील जीवाश्‍म इंधनांचे अर्धवट किंवा अपुरे ज्वलन हा घटक सर्वच देशांमधील (विकसित व विकसनशील) कार्बनच्या उत्सर्जनातील प्रमुख घटक आहे. भारतासारख्या विकसनशील देशात आजही पारंपरिक ऊर्जास्रोत आणि शेती हे आर्थिक वृद्धी व विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. याचबरोबर विकसित देशांची व्यक्तिस्वातंत्र्यावर व उपभोक्ता-केंद्रित चंगळवादावर आधारित अशी आजची जीवनशैली हीसुद्धा कार्बनच्या उत्सर्जनात व त्याच्या पाऊलखुणात महत्त्वाची ठरते. 

महत्त्वाची बाब ही आहे, की कार्बनचे उत्सर्जन हे जगाच्या किंवा देशाच्या कोणत्याही भागांतून / प्रांतांतून झालेले असले तरीही ते जागतिक वातावरणावर सारख्याच प्रमाणात विपरीत परिणाम करते. म्हणजेच कार्बनचे उत्सर्जन हे स्थळसापेक्ष नाही व म्हणूनच जागतिक पातळीवर कार्बनच्या पाऊलखुणांचा विचार केल्यास, प्रत्येक देशाचे या उत्सर्जनातील प्रमाण सारखे नाही. मात्र या उत्सर्जनामुळे होणाऱ्या हवामान बदल व जागतिक तापमानवाढ या दुष्परिणामांचा सर्वांत जास्त आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय परिणाम हा भारतासारख्या विकसनशील देशांवर जास्त मोठ्या प्रमाणात होणार आहे. याचे कारण म्हणजे या देशांच्या विकासप्रक्रियेत हवामानसंवेदनशील क्षेत्रांचे (शेती, आरोग्य, मनुष्यबळ इ.) योगदान आजही मोठे आहे. येथील वाढती लोकसंख्या, त्यांच्या गरजा, बदलत्या उपभोग प्रवृत्ती, उपभोग्य वस्तूंचे वाढते प्रमाण आदी गोष्टींच्या संदर्भाने या देशांतील जनता ही जागतिक हवामानबदल व कार्बनच्या पाऊलखुणा याबाबत अधिक असुरक्षित व बरीच संवेदनशील आहे. म्हणूनच आज विकसनशील देशांच्या विकासाच्या मार्गात अडथळा न आणता, त्यांच्या विकासाचा नैसर्गिक अधिकार अबाधित राखून व दुसरीकडे विकसित देशांच्या निसर्गावरील अमर्याद अतिक्रमणाला रोखून सर्वसमावेशक असे जागतिक धोरण निर्माण कारणे हे फार मोठे आव्हान आहे. असे जागतिक धोरण निर्माण केले गेले तरीही या कार्बनच्या सर्व पाऊलखुणा पूर्णतः मिटविणे शक्‍य नाही. पण निदान भविष्यात त्या वाढणार नाहीत, यासाठीच्या उपाययोजना आवश्‍यक आहेत. किंबहुना, येणाऱ्या पुढील पिढ्यांना प्रदूषणमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे, हे सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. ‘कार्बनच्या पाऊलखुणा’ ही संकल्पना या आंतर-पिढीय (Inter-generational) संदर्भाने जाणून घेणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com