जीवनदायी शिक्षणाकडे...

डॉ. मिलिंद नाईक
गुरुवार, 18 एप्रिल 2019

शालेय अभ्यासक्रमामध्ये दहावीपर्यंत कला शिक्षण अनिवार्य करावे, असे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हटले होते. यंदाच्या वर्षी केंद्रीय परीक्षा मंडळाने त्याची अंमलबजावणी केली, ही आनंदाची बाब आहे.

शालेय अभ्यासक्रमामध्ये दहावीपर्यंत कला शिक्षण अनिवार्य करावे, असे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हटले होते. यंदाच्या वर्षी केंद्रीय परीक्षा मंडळाने त्याची अंमलबजावणी केली, ही आनंदाची बाब आहे.

इं ग्रजांनी घालून दिलेली शिक्षणपद्धती आपण आजही तशीच चालवतो. इंग्रजांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीचे उद्दिष्टच मुळी केवळ त्यांनी चालवलेल्या उद्योगधंद्यांना कर्मचारी मिळवणे होते. त्या काळात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होत होते आणि त्या औद्योगिकरणाच्या झपाट्यात उद्योगांना लागणारे कर्मचारी तयार करणे हे शिक्षणाचे एकमेव उद्दिष्ट झाले होते. त्या काळात भारतात गरिबीही पुष्कळ होती आणि त्यामुळे भारतातील लोकांनी इंग्रजांनी घालून दिलेली ‘जेवणदायी’ शिक्षणपद्धती स्वीकारणे भाग होते. नोकरी करणे, पैसा मिळवणे, घरदार करणे याच्यापलीकडे जाऊन आयुष्याला काही वेगळे उद्दिष्ट असते, याचा त्या काळात संपूर्ण विसर पडला होता आणि ते स्वाभाविकही होते. पोट भरलेले नसताना अन्य काही उद्दिष्ट ठेवणे हे शक्‍यही नव्हते. परंतु, आता भारतातील परिस्थिती वेगळी आहे. मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या आहेत. लोकसंख्येचा एक मोठा भाग आता केवळ पोटासाठी शिक्षण घेत नाही आणि म्हणून आता जीवनदायी शिक्षणाचाही विचार केला पाहिजे.

माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या किमान गरजा भागल्यानंतर शारीरिक व मानसिक आरोग्य आणि मनोरंजन या गरजा पुढे येतात. अब्राहम मॅस्लो या मानसतज्ज्ञाने माणसाच्या गरजा व प्रेरणांचा मूलभूत अभ्यास केला. मॅस्लोच्या गरजांच्या पदसोपानाप्रमाणे प्रथम शारीरिक गरजा पूर्ण झाल्यानंतर, गरजांचे सुरक्षाविषयक गरजा, प्रेम व आपुलकीविषयक गरजा, आत्मसन्मान आणि स्वतःमधील अंतःशक्तीचा संपूर्ण आविष्कार असे पुढचे टप्पे आहेत. स्वामी विवेकानंदांनीही शिक्षणाचे हेच उद्दिष्ट सांगितले आहे. शिक्षण म्हणजे माणसाच्या अंत:स्थ क्षमतांचे प्रकटीकरण अथवा अंतःशक्तीचा संपूर्ण आविष्कार होय. सध्याचे शिक्षण शिक्षणाच्या या मूलभूत संकल्पनेपासून खूप दूर आहे, असे जाणवते. एकुणात शिक्षणाच्या ‘जेवणदायी’ अंगाकडे भर दिला गेल्याने जीवनदायी शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले.

 शिक्षणाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण म्हणजेच शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकास व्हायला हवा, हे आता सर्वमान्य झाले आहे. मग ते शास्त्रज्ञ असोत, मेंदूतज्ज्ञ असोत अथवा शिक्षणतज्ज्ञ वा मानसतज्ज्ञ ! म्हणजेच कला शिक्षण, शिक्षणाचा अविभाज्य भाग असला पाहिजे यावर आता एकमत आहे. कला शिक्षण, शिक्षणाचा अत्यावश्‍यक व गाभ्याचा विषय आहे की चंगळ यावर आतापर्यंत वाद होत राहिल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. एका बाजूला कला शिक्षणाच्या पारंपरिक व्यवस्था कमी झाल्या, पण दुसऱ्या बाजूला नवीन मुख्य व्यवस्थेने त्याची दखल घेतली नाही. असे झाल्याने समाजाचा मोठा भाग कला शिक्षणापासून वंचित राहिला. याशिवाय शालेय शिक्षणाच्या मुख्य व्यवस्थेने कलेची दखल न घेतल्यामुळे उच्च शिक्षणातही कला शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल राहिला नाही. एकूणातच कलेला दुय्यम स्थान मिळत राहिले. याची दखल घेत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मधेच, शालेय अभ्यासक्रमामध्ये दहावीपर्यंत कला शिक्षण अनिवार्य करावे असे म्हटले होते. यंदा केंद्रीय परीक्षा मंडळाने त्याची अंमलबजावणी केली ही आनंदाची बाब आहे. त्याचे स्वागतच करुया.

कलेचा पहिला उपयोग म्हणजे कलांचा वापर करून गणित, इंग्रजी, भूगोल यांसारखे शालेय विषय शिकवणे. यामुळे शिक्षण आनंददायी होईल. हसत-खेळत, तालासुरात गाणी म्हणत, नाटके करत अथवा एखादी प्रतिकृती करत शिक्षण घेणे हे कोणाला आवडणार नाही? शालेय विषय अध्यापनाची ही प्रभावी माध्यमे आहेत. प्राथमिक शाळेमध्ये तर ती अत्यंत प्रभावी ठरतात. मात्र यासाठी अध्यापकांचे विशेष प्रशिक्षण करायला हवे. स्वतःच्या भावना, कल्पना व विचार मांडण्याचे माध्यम म्हणजे कला. मग ते शब्द असोत अथवा रंग-रेषा. स्वर असोत अथवा ताल. या अभिव्यक्तीची गरज तर सर्वच व्यक्तींना असते. अन्यथा मनात उमटणाऱ्या भावना, कल्पना व विचार, आतच राहून घुसमट होते. म्हणूनच कला हा फक्त शालेय विषय म्हणून शिकवला न जाता अभिव्यक्तीचे साधन म्हणून सर्वांनाच शिकवला जावा. पाठ्यपुस्तकी अभ्यासातून होणार नाही असे बुद्धीचे अनेक पैलू विकसित करण्यात कला हातभार लावते. कलेतून कल्पकता आणि प्रतिभेला मोठ्या प्रमाणावर वाव मिळतो. प्रचलित अथवा पठडीतील विचारांपेक्षा वेगळे काही करण्याची संधी यातून निर्माण होते. नवनिर्मिती नेहमीच विकासाला पूरक असते.

भारतीय संस्कृती अतिशय समृद्ध आहे. भारतीय संस्कृती व परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अभिसृत होण्याचे कला हे उत्तम माध्यम आहे आणि म्हणूनच कलेला शिक्षणात स्थान हवे. कलेतून निर्माण होणारी सौंदर्यदृष्टी, सहानुभूती, सहनशीलता, एकात्मता, रसिकता आदी गोष्टी एक चांगली व्यक्ती व देशाचा चांगला नागरिक होण्यासाठी आवश्‍यक आहेत. कला शिक्षण अधिक उपयुक्त व आनंददायी होण्यासाठी त्यांचे मूल्यमापन ठोकताळा पद्धतीने करून चालणार नाही. त्यांच्या लेखी परीक्षा घेणे हास्यास्पदच ठरेल. म्हणून त्यांचे मूल्यमापन सातत्यपूर्ण निरीक्षणांमधून व सादरीकरणांमधून करावे लागेल.

ही योजना कितीही चांगली असली तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यातील पहिला अडथळा म्हणजे सर्वांचाच कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. कला शिक्षणाकडे निरुपयोगी गोष्ट म्हणून बघणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यांना कला शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. यातील दुसरा अडथळा म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना शिकवू शकणाऱ्या कला अध्यापकांची अनुपलब्धता. कला विषयात उच्च शिक्षण झालेले विद्यार्थी उपलब्ध असले, तरी शालेय विद्यार्थ्यांना तो विषय कसा शिकवावा, याचे प्रशिक्षण झालेले शिक्षक सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे असलेल्यांच्या अध्यापन प्रशिक्षणाची व्यवस्था करावी लागेल. तिसरा अडथळा म्हणजे साधनांची उपलब्धता. यातील काही प्रकार हे साधनांवर अवलंबून असणारे आहेत. शिक्षणावर आधीच अपेक्षेपेक्षा कमी पैसे उपलब्ध होत असताना यासाठीचा खर्च कुठून आणायचा याचा विचार करावा लागेल. खासगी शाळा शुल्कवाढ करून पालकांवर भार टाकून हा प्रश्न सोडवतील, मात्र अनुदानित शाळांचे अनुदान सरकारला वाढवावे लागेल. हा दुष्काळात तेरावा महिना होऊ शकेल. तासिकांचे नियोजन करतानाही काही प्रश्न येतील. प्रत्येक कलाप्रकारासाठी स्वतंत्र तज्ज्ञ शिक्षक नेमावे लागतील. परंतु अध्यापनाचा अपेक्षित भार पूर्ण होऊ न शकल्याने त्यांना अर्धवेळ घ्यावे लागेल. अशा अर्धवेळ अध्यापकांचा आर्थिक उत्पन्नाचा शाळा हा मुख्य स्रोत न राहिल्याने अर्थार्जनासाठी कार्यक्रम मिळविण्यासाठी अथवा व्यवसाय मिळविण्यासाठी समाजातील स्वत:चे स्थान वाढविण्याकडे कल राहून शालेय अध्यापनाला दुय्यम स्थान मिळण्याची शक्‍यता असते.

थोडक्‍यात कल्पकता व एकात्मिक शिक्षण हे सर्व जगात शिक्षणाचे सूत्रशब्द असताना, केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाने काळानुसार हा योग्य बदल अपेक्षिला असला तरी व्यावहारिक प्रश्न सोडविण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील हे निश्‍चित. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr milind naik write school education article in editorial