स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विशेष लेख : "कमला' महाकाव्याची महती

डॉ. नलिनी गुजराथी 
गुरुवार, 28 मे 2020

सौंदर्य, प्रेम शृंगार, वीर या रसांनी रंगलेल्या या खंडकाव्याची अखेर मात्र नाट्यमय वळण घेत शोकांतिकेकडे झुकते. म्हणूनच हे खंडकाव्य "महाकाव्य' ठरतं! आणि ज्या कोठडीत या महाकाव्यानं जन्म घेतला त्यामुळे ते "अद्‌भुत महाकाव्य' ठरतं.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त, त्यांनी लिहिलेल्या "कमला" या महाकाव्याचे वेगळेपण सांगणारा लेख.

काही वर्षांपूर्वी अंदमानला जाण्याचा योग आला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ज्या सेल्युलर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी ठेवलं होतं, तो जेल आणि कोठडी पाहिली. तिथे भिंतीवर स्वातंत्र्यवीरांचा बंदिवानाच्या पोषाखातील फोटो लावला होता व फोटोच्या एका कोपऱ्यात "कमला'च्या चार ओळी छापलेल्या होत्या. अंदमानच्या कोठडीत कागदाचा चिटोराही जवळ बाळगण्यास बंदी होती. त्यावेळी सावरकरांना युक्ती सुचली की "अरे कागद? हा काय कागद! ही या कोठड्यांची चुन्याने रंगविलेली लांब, उंच भिंतच कागद आणि घायपाताचा काटाच लेखणी!' तुरुंगातला असह्य छळ सहन करीत असताना हृद्य, सुंदर कविता रचणाऱ्या सावरकरांच्या प्रतिभाशक्तीला शतवार वंदन! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

882 ओळी असलेलं, अनुष्टुभ्‌ छंदात रचलेलं हे खंडकाव्य. "कमला' या एका नवविवाहित 14 - 15 वर्षाच्या युवतीची कहाणी या कवितेत येते. भाऊसाहेब पेशवे यांच्या सैन्यातील दोन शूरवीर मुकुंद आणि मुकुल हे जिवलग मित्र. मुकुंदाचं नुकतंच लग्न झालेलं असतं. "कमला' ही मुकुंदाची नवपरिणीत पत्नी. मुकुल मात्र अविवाहित असतो. मुकुंदाचे वडील लहानपणीच वारलेले असतात व कमला ही तिच्या सज्जन, मातेसमान सासूजवळ रहात असते. तिच्या घरापुढे सुंदर बाग असते. सुरुवातीला या बागेचं वर्णन येतं. त्यावेळी सावरकर हे जणु बालकवींसारखे निसर्गकवीच झाल्यासारखे वाटतात. कमला नुकतीच ऋतुमती झाली आहे. म्हणून शास्त्रानुसार तिच्या गर्भाधानाचा सोहळा योजला आहे. त्यासाठी मुकुंदा व मुकुल घरी आलेत. कमलेची बहीण प्रेमला तिच्या आईबरोबर आलेली. मखरातील आसनावर दांपत्याला बसवून यज्ञ, पूजन इ. विधी व भोजन समारंभ पार पडतात. दांपत्याचा मधुचंद्रही रंगतो. याच दिवशी मुकुल कमलेची बहीण प्रेमला हिच्या प्रेमात पडतो. मधुचंद्राची रात सरत आली असतानाच मुकुल घरी निरोप घेऊन येतो, की दत्ताजी शिंदे रणात पडले. शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी ताबडतोब हजर होण्याची राजाज्ञा झाली आहे. हे ऐकताच देशभक्त वीर मुकुंद लढाईला जाण्यासाठी सज्ज होतो. मुकुंद आणि मुकुल दोघेही जण गाढ झोपलेल्या कमलेचं आणि प्रेमलेचं दुरुनच दर्शन घेतात. "ईश्वर त्यांचं रक्षण करो' म्हणत घोड्यावर स्वार होतात. इकडे त्याच वेळी कमलेला दुःस्वप्न पडतं, की शय्यामंदिरातील दिवा भडकून वणवा पेटला आहे, बागेनं पेट घेतला. तिचा लाडका बकुल वृक्ष तिला भेटेना. तिचं हे स्वप्न मात्र सत्यवत्‌ असतं. इथंच "कमला' या काव्याची कथा संपते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या काव्यात सावरकरांची वर्णन शैली, निसर्गाचं, प्रेमाचं वर्णन करताना संस्कृतप्रचुर शब्दांचा आश्रय घेत अलंकारिक बनते, तर पात्रांमधील संवाद रंगविताना प्रासादिक बनते. 

फुलबाग किती शोभे लहान, नटवी, करी 
नटुनी थटुनी नाना नखरे वरचेवरी 
या ओळीमधील "नखरे करणारी फुलबाग' ही कल्पना किती गोड आहे! बागेतील सोनचाफ्याचं वर्णन करताना ते म्हणतात, 
आणि हे सोनचाप्या, तू शिकलासि तरी कुठे 
ही दिव्य किमया? आम्हा स्वयंमन्य नरा जिथे 
रुप्याचेही करायासी जड स्वर्ण न साधते 
ओल्या मातीत सूर्याची किरणे पिळुनी तिथे 
मृदचेतन सोन्याची, स्वर्णचंपक ही फुले 
सुगंधी तुज पाहुनी निर्मिता मन हे भुले! 

सूर्याचे किरण ओल्या मातीत पिळल्याने तयार झालेली सोनचाफ्याची सुगंधी फुले ही प्रतिमा म्हणजे सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा अप्रतिम आविष्कारच आहे! कमलेचं वर्णन करतानाही त्यांची प्रतिभा अशीच खुलते. 
"प्रतिपत्‌ चांदण्या येता व्योमी चंद्रकला जशी 
चंद्रिकेच्या प्रभाताच्या मिश्रणात उषा जशी' 

(रात्रीचं चांदणं आणि प्रभातीचा प्रकाश यांच्या मिश्रणात शोभणाऱ्या उषेप्रमाणे बालपण आणि यौवन यांच्या उंबरठ्यावर असलेली कमला शोभून दिसत होती.) 

कमलेच्या गर्भाधान विधींचं, उमलणाऱ्या प्रेमाचं, रसाळ वर्णन ते तरलतेनं करतात. पण केवळ शृंगाराचं वर्णन करून ते थांबत नाहीत, तर कमलेसारख्या वीरपत्नीच्या पोटी राम-कृष्णांसारखा, शिवाजी महाराज, गुरु गोविंदांसारखा पराक्रमी वीर किंवा बुद्ध, शंकराचार्य, तुकाराम यांसारखा जीवन्मुक्त योगी जन्माला यावा यासाठी हा मंगल असा मधुचंद्र आहे, याची जाणीव करून देतात आणि मग शृंगाराला भव्यतेचा, उदात्ततेचा आणि पावित्र्याचा स्पर्श होतो. सावरकरांमधील तत्त्वचिंतक येथे दिसतो. 

मधुचंद्राची रात सरते न सरते, तोच पहाटे मुकुंदाला स्वारीवर निघावं लागतं आणि कमला झोपेत असतानाच त्याला निरोप घ्यावा लागतो. त्याचवेळी कमलेला भीषण दुःस्वप्न पडतं. ते शेवटच्या दोन कडव्यात सावरकरांनी मालिनी वृत्तात रंगवलं आहे. संपूर्ण खंडकाव्य अनुष्टुभ्‌ छंदात असताना सुखमय, प्रेममय वातावरणातून दुःखद, भीषण वातावरणाकडे नेण्यासाठीच वृत्त बदललं आहे. ते स्वप्न असं होतं, 

"धडड्‌ धडड्‌ आगी बंदुका ओकती तो! 
तळपति तलवारी एकची गर्ज होतो! 
सुटुनि न घरि होते प्रेमशय्या जयाते 
क्षण रण गमले त्या सत्यही स्वप्नसे ते! 
अणि भडकुनि शय्यादीप, दावाग्नि माते, 
वमति रुधिर-रंग प्रीतीचे, बाग पेटे 
दयित! बकुल! या रे क्रंदता तो न भेटे, 
शयनि भिववि होते-स्वप्नही सत्यसे ते!!' 

"मुकुंदाला सत्य स्वप्नासारखे भासत होते, तर कमलेला स्वप्न सत्यासारखे'. सावरकरांना सुचलेली ही कल्पनाच किती सुंदर आणि विरोधाभास दाखविणारी आहे. सौंदर्य, प्रेम शृंगार, वीर या रसांनी रंगलेल्या या खंडकाव्याची अखेर मात्र नाट्यमय वळण घेत शोकांतिकेकडे झुकते. म्हणूनच हे खंडकाव्य "महाकाव्य' ठरतं! आणि ज्या कोठडीत या महाकाव्यानं जन्म घेतला त्यामुळे ते "अद्‌भुत महाकाव्य' ठरतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Nalini Gujrathi writes about Swatantryaveer Savarkar Jayanti