भाष्य : कुणाच्या मेंदूवर कुणाचा ताबा?

नुकतीच एलॉन मस्क यांनी ‘न्युरालिंक’ या मानवी मेंदूत बसवायच्या चिपबद्दलची घोषणा केली.
neuralink chip
neuralink chipsakal

नुकतीच एलॉन मस्क यांनी ‘न्युरालिंक’ या मानवी मेंदूत बसवायच्या चिपबद्दलची घोषणा केली. ‘न्युरालिंक’च्या दाव्यानुसार, या ब्रेनचिपचा उपयोग पार्किन्सन रोग, फेफरे, नैराश्य, मेंदूच्या दुखापती, तीव्र वेदना, अंधत्व आणि बहिरेपणा यासारखे आजार असणाऱ्या रुग्णांसाठी होईल. तथापि, याचे भविष्यात वेगळेच परिणामसुद्धा दिसतील, धोकेही असतील.

कल्पना करा, तुम्ही टीव्हीवर बातम्या पाहात बसलाय आणि तुम्हाला चॅनेल बदलायचा आहे. रिमोट तुमच्याजवळ नाही. तुम्ही विचार करताय न करताय तोपर्यंत तुम्हाला पाहिजे तो चॅनेल समोर दिसायला लागला, रिमोटशिवाय. असे शक्य आहे का? एका बैठकीमध्ये किंवा हजारो लोकांसमोर तुम्ही पॉवरपॉईंटवर सादरीकरण करताय. प्रत्येकवेळी स्लाईड पॉईंटरने बदलावी लागते. बोलण्याची लय तुटते. समोरचे लोक चुळबुळ करताहेत.

पण आता तसे होणार नाही, तुम्ही विचार करताय तोपर्यंत पॉवरपॉईंटची स्लाईड बदललेली असेल. एवढेच काय तुम्ही विचार करताय तोपर्यंत तुमची मोटार सुरू झालेली असेल. घराचा दरवाजा उघडलेला असेल. हे झाले वस्तूंचे; पण याहीपेक्षा भयानक म्हणजे तुम्ही समोरच्याला न सांगता त्याच्याकडून काम करून घेणार आहात. म्हणजेच दुसऱ्याच्या मानवी मेंदूवरपण तुम्ही नियंत्रण मिळवू शकाल. कदाचित तुमच्या- माझ्या मेंदूवर दुसरा कोणीतरी.

हे धोके शास्त्रज्ञ, इतर क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत. मागच्या आठवड्यात अमेरिकी उद्योजक एलॉन मस्क यांनी केलेली घोषणा. न्यूरालिंक, ज्या कंपनीद्वारे मस्कने मेंदू-संगणक इंटरफेसमध्ये (BCIs) व्यक्तीमध्ये ‘मेंदू-वाचन’ उपकरण स्थापित केले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हे उपकरण गंभीर अर्धांगवायू असलेल्या व्यक्तीला संगणक, रोबोटिक आर्म, व्हिलचेअर किंवा इतर उपकरणांवर केवळ विचार करून नियंत्रण ठेवता यावे, या उद्देशाने तयार केले आहे. त्याच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. मानवी चाचण्यांची माहिती गुप्त आहे.

२०२०-२१मध्ये जग ज्यावेळी कोरोना महासाथीने ठाणबंद होते, तेव्हा शास्त्रज्ञ, विद्यापीठे आणि कंपन्या कोरोना लसीच्या शोधात गुंतले होते. त्यावेळी ‘न्युरालिंक’ मात्र मानवी मेंदूत बसवायची चिप बनवत होती. प्राण्यांवर चाचण्या करत होती. त्यावेळीच त्यांनी याबद्दल घोषणा केली होती. पण जगातील कोट्यवधी लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

२९ जानेवारी रोजी ज्यावेळी मस्क यांनी स्वतः घोषणा केली तेव्हा जागतिक माध्यमे, शास्त्रज्ञ आणि इतरांचे लक्ष गेले. न्युरालिंक चिपमध्ये ६४ लवचिक पॉलिमर इलेक्ट्रोड्स आहेत, जे मेंदूमधील एक हजार६४ ठिकाणांहून मेंदूच्या वेगवेगळ्या क्रियांचे रेकॉर्डिंग करणार आहे. ती माहिती त्याच चिपमध्ये साठवली जाईल, तिथेच त्यावर प्रक्रियापण केली जाणार आहे.

याच माहितीच्या आधारावर एखादी व्यक्ती तिच्यासमोरची वस्तू नियंत्रित करणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर गंभीर अर्धांगवायू झालेला रुग्ण रुग्णशय्येवर असतो, त्याला समोर जे काही चालू आहे ते दिसते, समजतही असते. पण हालचाल करता येत नाही, स्पष्ट बोलता येत नाही.

न्युरालिंक चिप बसवल्यानंतर तो व्यक्ती फक्त विचार करणार की, समोरच्या टीव्हीचा चॅनेल बदलला पाहिजे, लगेच तो बदलला जाईल; अपंग व्यक्ती विचार करेल की, माझी व्हिलचेअर माझ्याजवळ आली पाहिजे, लगेचच ती येईल. आता आपल्याला वाटेल यात घाबरण्यासारखे काय आहे, हे तंत्रज्ञान उपयोगीच आहे. मलासुद्धा यामध्ये गैर काहीच वाटत नाही. गेल्या दशकात अनेक शास्त्रज्ञांनी अशी उपकरणे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमका धोका काय?

जुलै २०२३मध्ये स्वित्झर्लंडमधील विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी असे उपकरण बनवले की, ज्याने अर्धांगवायू झालेल्या माणसाला फक्त विचार करून चालण्यास सक्षम केले आहे. पण न्युरालिंक चिपचा खरा धोका पुढे आहे. हे उपकरण ब्लूटूथ, किंवा घरातील इंटरनेट वायफायलासुद्धा कनेक्ट करता येणार आहे. भविष्यात ते आपल्या मोबाईल नेटवर्कला पण कनेक्ट करता येईल आणि भीती तीच आहे.

कदाचित भविष्यात रुग्णाच्या मेंदूमध्ये बसवलेल्या चिपवर ब्लूटूथ किंवा वायफायवरून दुसरेच कोणीतरी नियंत्रण मिळवेल आणि तोच त्या रुग्णाला इतर गोष्टी करण्यासाठी आज्ञा देईल. शास्त्रज्ञांना भीती वाटते की, ही चिप इतर लोकांच्या हातात सापडली की, मग ते उद्योजक, राजकारणी किंवा दहशतवादी असो; ते सामान्य लोकांच्या मेंदूतही अशी चिप बसवून त्यांच्याकडून पाहिजे ती कामे करवून घेतील.

असे काही होणार नाही असे गृहीतही धरू. पण आजच्या घडीलासुद्धा न्युरालिंकचा हा कारनामा वैज्ञानिक नैतिकतेला धरून नाही, असा सरळ सरळ आरोप जगातील हजारो शास्त्रज्ञांनीच नव्हे तर राजकारणी आणि तत्त्वज्ञांनीही केला आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये काही अहवाल समोर आले ज्यामध्ये कंपनीच्या क्लिनिकल चाचणीमध्ये वापरलेल्या माकडांवर आणि इतर प्राण्यांवर दुर्बल प्रभाव पडला.

ज्यात त्याच्या संशोधनाचा एक भाग म्हणून तब्बल बारा माकडांना अधू केल्याचा किंवा मारल्याचा आरोप आहे. कंपनीवर प्राण्यांशी गैरवर्तनाचा आणि दूषित हार्डवेअरद्वारे संसर्गजन्य रोगजनकांच्या मानवी संपर्कास धोका निर्माण केल्याचा आरोप आहे. अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या तक्रारींमध्ये असे आरोप आहेत की, प्राण्यांच्या चाचणीत घाई केली गेली. परिणामी प्राण्यांचा मृत्यू झाला.

‘रॉयटर्स’च्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रकाराची अमेरिकन कृषी विभागाकडून तपासणी करण्यात आली. २०२२मध्ये ‘रॉयटर्स’ने पुनरावलोकन केलेल्या नोंदी दर्शवतात की, कंपनीने २०१८पासून २८० मेंढ्या, डुक्कर आणि माकडांसह दीड हजार प्राणी मारले. एवढेच काय तर शास्त्रज्ञांनी अमेरिकी अन्न व औषध प्रशासन यंत्रणेलासुद्धा (एफडीआय) घाईघाईत मानवी चाचणीस मुभा दिल्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

‘युनेस्को’च्या अहवालानुसार, न्युरोटेक्नॉलॉजी म्हणजेच मानवी मेंदूवर संशोधन करणारी विज्ञानाची शाखा आणि त्यावर आधारित उद्योगधंदे यांची वार्षिक उलाढाल सुमारे ३३ अब्ज डॉलर आहे. न्युरालिंक यात दररोज कोट्यवधी डॉलरची भर घालत आहे. दहा-बारा वर्षात हा उद्योग बलाढ्य उद्योगांना मागे सारून ट्रिलीयन डॉलरचा उद्योग होईल.

संयुक्त राष्ट्रांची वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थाने काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये न्युरोटेक्नॉलॉजीचे भविष्यातील फायदे आणि तोटे तसेच त्याचे मानवी सामाजिक वर्तनावरील परिणाम यावर जागतिक परिषद घेतली. यामध्ये जगातील हजारो तत्त्वज्ञानी न्युरोटेक्नॉलॉजीवर जागतिक आचारसंहिता (कोड ऑफ कंडक्ट) तयार करण्याची मागणी केली म्हणजे याचे भविष्यातील दुरुपयोग रोखता येतील.

युवाल नोवा हरारी म्हणतात की, भविष्यात, कोणत्याही इतर वस्तूपेक्षा मग ते मोबाईल असो, कार असो किंवा सॉफ्टवेअर असो; मानवी मेंदूवर नियंत्रण ठेवणाऱ्या उत्पादनांना जगात खूप मागणी असेल. २०५०नंतर हाच उद्योग जगातील सर्वात बलाढ्य असेल. कदाचित न्युरालिंकपण हेच ओळखून असेल. आज आपण अनेकदा एखाद्याला सहज बोलून जातो, ‘तुझा मेंदू गहाण ठेवला आहेस का?’

कदाचित भविष्यात हे खरेही होईल!

(लेखक विज्ञान संशोधक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com