भाष्य : महत्त्व ‘व्यवहार पाठां’चे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School Students

मुलांवर गृहपाठ, अभ्यासाचा ताण आणि त्याच्याबरोबर शाळा, समाज, पालक यांच्या अपेक्षांचे ओझे थोपवले जाते.

भाष्य : महत्त्व ‘व्यवहार पाठां’चे

मुलांवर गृहपाठ, अभ्यासाचा ताण आणि त्याच्याबरोबर शाळा, समाज, पालक यांच्या अपेक्षांचे ओझे थोपवले जाते. तथापि, दैनंदिन जगण्यासाठी आवश्‍यक अनेक बाबींची त्यांना ओळख, माहिती आणि उपयुक्तता पटवून देणेही गरजेचे असते. नेमके त्याकडे दुर्लक्ष करून बालमन आपण कोमेजून टाकतो.

ब्रिटनमध्ये काही वर्षांपूर्वी एका तीन-साडेतीन वर्षांच्या मुलीसमोर तिची गरोदर आई घरातील जिन्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. या तीन वर्षांच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ॲम्ब्युलन्सला फोन केला. तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला. ॲम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी काही मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती. बोलणे संपते न संपते तोपर्यंत ॲम्ब्युलन्स दारात हजर झाली. जगातील अतिशय गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्येही एखाद्या अपघातानंतर सरासरी आठव्या मिनिटाला ॲम्ब्युलन्स येते. संपूर्ण ब्रिटनमध्ये मुलीच्या प्रसंगावधनाचे आणि धाडसाचे कौतुक झाले. या एका फोन कॉलमुळे ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा केल्या. प्रश्न हा नाही की, त्या मुलीला ॲम्ब्युलन्स ऑपरेटरबरोबर बोलता कसे आले. तर प्रश्न हा आहे की एवढ्या छोट्या मुलीला आई पडल्यावर प्रसंगावधान राखून ॲम्ब्युलन्सला फोन करायचा असतो हे कसे समजले? ॲम्ब्युलन्सचा नंबर कुठून मिळाला? या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गृहपाठात!

ब्रिटनमध्ये मूल तीन वर्षांचे झाले की त्याला शाळेत प्रवेश मिळतो. आई-वडील दोघेही नोकरीला असतील तर सहा तास रोज मूल शाळेत थांबू शकते. या तीन वर्षांच्या मुलांना ना पाढे शिकवतात ना वर्णमाला शिकवतात, ना अभ्यासाचे ओझे देतात. याउलट त्यांना मोठ्यांशी कसे बोलायचे, वाहतुकीचे नियम कसे पाळायचे, गाडीमध्ये बसल्यावर सीटबेल्ट कसा लावायचा, आपली खोली कशी नीटनेटकी ठेवायची, खोटे बोलायचे नाही अशा अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवतात. दररोज मुलांना शाळेत काय शिकवले जाते ते पालकांना सांगितले जाते. फक्त सांगितलेच जात नाही तर सायंकाळी घरी एकत्र जेवण करताना यावर चर्चेलाही प्रोत्साहित करतात. ज्यामुळे मुलांना शाळेत शिकवलेले व्यवस्थित लक्षात राहील. हाच मुलांचा गृहपाठ असतो. फक्त नियमच नाही तर रोजच्या जीवनात घरामध्ये प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, क्लीनर किंवा कचरा गोळा करणारे लोक, हॉस्पिटलमधील डॉक्टर, ॲम्ब्युलन्स, अग्निशमन सेवा अगदी गॅरेजमध्ये जे लोक काम करतात त्यांचा आपल्याला कसा उपयोग होतो याचे प्रात्यक्षिकही देतात.

वर्षातील काही दिवस हे लोक शाळेत येवून मुलांसमोर प्रात्यक्षिक दाखवतात. असेच एके दिवशी या मुलीच्या शाळेतसुद्धा ॲम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक होते. तिला त्या दिवशी जे वर्गात सांगितले आणि दाखवले त्याची चर्चा त्यांनी त्या रात्री जेवताना आई-वडिलांबरोबर गृहपाठ म्हणून केली. तोच गृहपाठ त्या मुलीने लक्षात ठेवून आईचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचवला. पुढे जाऊन ब्रिटनभर त्याची चर्चा झाली आणि ब्रिटन सरकारने शिक्षणपद्धतीत अजून सुधारणा करून अधिकाधिक प्रात्यक्षिक आणि निरीक्षण आधारित केले. यामुळे ब्रिटनमधील सर्वच शाळांमध्ये वर्षातील काही दिवस गॅरेज मेकॅनिकपासून ते शेतकरी आणि त्यांची जनावरे इथपासून ते हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्स, डॉक्टरपर्यंत सर्वांना बोलावून त्यांच्याकडून मुलांना प्रात्यक्षिक आधारित शिक्षण दिले जाते. त्यांचा गृहपाठ रात्रीच्या जेवणावेळी पालकांकडून पक्का करून घेतला जातो. आम्ही कुठे आहोत, हा प्रश्न आम्हाला पडतो का?

मुलांवर ओझे अपेक्षांचे

गेले दोन दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची चर्चा होत आहे, पण या बालमनावरील ओझ्याचे काय? फक्त शाळाच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाठाच्या ओझ्यात दडपताहेत का? याला पालकही जबाबदार नाहीत का? माझ्या मुलाला शाळेत गेले की आकडे वाचायला आणि लिहायला आलेच पाहिजे, मुलांना ABCD आलीच पाहिजे, सर्व खेळ आलेच पाहिजेत, याहूनही पुढे जाऊन त्यांने गाणे गायले आणि वाद्य वाजवले पाहिजे, असा सगळा अट्टाहास का? बालवयात मुलांनी मातीत खेळावे, झाडावर चढावे, नदी-विहिरीत पोहावे, रात्री आई-वडिलांबरोबर शाळेतील गमती जमतीच्या गोष्टी कराव्यात असे अपेक्षित असते. तथापि, त्याऐवजी इतरांच्या मुलांसारखे त्यांना स्टेजवर नाचवत, त्याची इच्छा नसताना शाळेचा नियम म्हणून गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला लावतो, नाटकात भाग घ्यायला सांगतो. हार्मोनियम, तबल्याच्या क्लासलाही पाठवतो. गणित, इंग्लिशच्या क्लासला जबरदस्तीने पाठवतो. यातून काही शिल्लक राहिल्यास सर्रास शाळा कोवळ्या जीवांवर नवनवीन प्रोजेक्टचा मारा करतात.

आज पर्यावरणाचा, उद्या चित्रकलेचा, परवा कॉम्पुटरचा असे रोज नवनवीन प्रोजेक्ट त्या बालबुद्धीत अक्षरशः इंजेक्शनसारखे घुसवले जाताहेत. त्या जीवाला त्याचा त्रास होतो, हे पालकांना आणि शिक्षकांना का समजत नाही? सात वर्षांची मुलं सकाळी सातला घरातून निघतात रात्री सातला घरी येतात. मनाने आणि शरीराने थकलेली असतात. पुन्हा गृहपाठाच्या ओझ्याने आणि सकाळी पुन्हा लवकर उठण्याच्या चिंतेने झोपी जातात. गृहपाठ नेहमी अवघड इंग्लिश आणि किचकट गणितांचेच का असतात? हे दोनच विषय आयुष्यात सर्वकाही शिकवतात का? युरोप-अमेरिकेतल्या सगळ्यांच्या मुलांना कुठे चांगले गणित येते. जपान-जर्मनीच्या मुलांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येते. आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा-बारा वयांत कॉम्पुटरचे कोडिंग काय असते हे माहीत होते.

स्पर्धांची गरज आहे का?

मग आमच्याच मुलांना हे सगळे लहान वयात यायला हवे हा अट्टाहास का? गृहपाठ नेहमी लेखनाचा आणि घोकंपट्टीचाच का असतो? तो आई-वडिलांबरोबर, आजी-आजोबांबरोबर चर्चा करायचा का नसतो? वर्गातील चार मुलांना एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले तर शाळेच्या मुख्याध्यपकाला त्याचे का टेन्शन येते? ते का पालकांना बोलावून मुलांची तक्रार करतात? माझ्या शाळेची मुलं सगळ्याच विषयात, सगळ्याच खेळात, सगळ्याच अभ्यासेतर उपक्रमात इतर शाळेच्या पुढे असलीच पाहिजेत हा शाळांचाही अट्टाहास का? या अट्टहासातूनच बालमनावर गृहपाठाचे ओझे थोपवले जाते. याला शाळा जेवढ्या जबाबदार; तेवढेच स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पालकही आहेत. शाळा आणि पालक या दोघांच्या संगनमताने गृहपाठाचा गुन्हा दररोज मुलांच्या माथी मारला जातो. एक दिवस गृहपाठ नसला तरी पालक अस्वस्थ होतात. मुलाच्या वर्गातील दहा जणांना विचारून खात्री करून घेतात की, खरेच आज गृहपाठ नाही ना!

आम्ही शालेय अभ्यासक्रमात नवनवीन प्रयोग करतो, नवीन धोरणे आणतो, पण स्पर्धेचे काय? खरेच या बालकांना लहान वयात या स्पर्धांची गरज आहे का? माझे मूल सर्वच विषयात, सर्वच खेळात, सर्वच कलेत सर्वगुणसंपन्न पाहिजे हा पालकांचा अट्टाहास आणि शाळेची मुलं सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्याचा अतिमहत्त्वाकांक्षीपणा या कोवळ्या बालमानांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मूलभूत स्पर्धाविरहित सुधारणांसाठी नाहीतर भविष्यात फक्त पुस्तकाच्या पानावरच ॲम्बुलन्सचे चित्र पाहिलेल्या आणि घरात लॅपटॉपवर कोडिंगचा गृहपाठ करणाऱ्या चार-पाच वर्षांच्या कोवळ्या जिवाच्या अभागी मातेने घरातील चकचकीत फरशीवरून पाय घसरून जीव गमावलेला असेल.

(लेखक मेडिकल सायन्स डिव्हिजन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ब्रिटन येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

Web Title: Dr Nanasaheb Thorat Writes Importance Study Education Students

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..