भाष्य : भय इथले संपण्यासाठी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cancer

अन्नाचे आपल्या आरोग्यावर खूप महत्त्वाचे परिणाम होत आहेत. कर्करोगासारख्या आजारावर उपचार करून घेत असताना आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.

भाष्य : भय इथले संपण्यासाठी...

अन्नाचे आपल्या आरोग्यावर खूप महत्त्वाचे परिणाम होत आहेत. कर्करोगासारख्या आजारावर उपचार करून घेत असताना आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. त्याचे योग्य नियोजनही रोगाचा प्रसार रोखणे, अटकाव करणे यासाठी मदतकारक ठरू शकते. मात्र, याबाबत अधिक संशोधन गरजेचे आहे.

अन्न हे सजीवांच्या जीवनाचा मूलाधार आहे. त्यामुळेच अन्नाला पूर्णब्रह्म म्हटले जाते. अशा या अन्नघटकांपासून आपला आहार बनतो. शरीराच्या भरण, पोषण आणि संवर्धनासाठी योग्य आहाराची आवश्‍यकता असते. अशा या जीवनदायी आहाराबाबत शंका उत्पन्न झाली तर? अशी शंका कर्करोगाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर येत आहे. सुरुवातीच्या काळात शंकेच्या स्वरूपात असणाऱ्या धारणेने आता गंभीर रूप घेतले आहे. अर्थातच कर्करोग पीडितांची वाढणारी संख्या याला कारणीभूत आहे.

कर्करोगाची लागण शरीराच्या निरनिराळ्या अवयवांत दिसत आहे. यात फुफ्फुसे, आतडे, वृषणग्रंथी, जठर, जीभ, घसा, स्तन, जननइंद्रिये आणि रक्त यांचा समावेश आहे. आजमितीस जगभरात कर्करोग पीडितांची संख्या सुमारे दोन कोटी असून, मृत्यूचे प्रमाण एक कोटी आहे. भविष्यात या संख्येत लक्षणीय वाढ होण्याचे संकेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कर्करोग होऊ नये यासाठी काय करावे आणि कर्करोग झाल्यानंतर काय करावे? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्करोग होण्यामागची जी कारणे आहेत, त्यात आपल्या अन्नघटकांचाही समावेश आहे हे विशेष. जगभर या विषयावर संशोधन सुरू आहे. त्यातून काही दिशादर्शक बाबी समोर येत आहेत. सामान्य माणसाच्या मनात यासंबंधी अनेक प्रश्‍न निर्माण होत असतात. अधिक प्रमाणात साखर खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढतो का? कर्करोग न होण्यासाठी प्राणीजन्य पदार्थ न खाणे योग्य आहे का? ग्लूटेनमुक्त अन्न सेवनामुळे कर्करोगाचा धोका घटतो का? हे त्यातील काही प्रातिनिधिक प्रश्‍न आहेत. ग्लूटेनच्या वापरामुळे आतड्याचा कर्करोग होण्याची शक्‍यता वाढण्याचे अनुमान काढण्यात आले आहे. अतिरेकी प्रमाणात मांसाहारामुळेही अशी शक्‍यता वाढल्याचे अनुमान आहे. साखर खाण्याचा आणि कर्करोग होण्याचा संबंध प्रस्थापित झालेला दिसत नाही. कृत्रिम रंगांचा वापर हाही चिंतेचा विषय आहे. अनेकदा मान्यता नसलेली रंगद्रव्ये वापरल्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

उपवास करावा का?

कर्करोग झालेल्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांबाबत आहाराचा प्रश्‍न अधिकच बिकट होताना दिसतो. कर्करोगाच्या उपचारात रुग्णाला शारीरिक अशक्तपणा जाणवतो. तो भरून काढण्यासाठी योग्य आहाराची गरज असते. अशा वेळी योग्य आहाराबाबत प्रश्‍न निर्माण झाल्यास रुग्णाची मनःस्थिती अधिकच दोलायमान होते. अशा वेळी रुग्णाच्या मनातल्या प्रश्‍नांची संख्या खूपच मोठी आहे. त्यातील काही निवडक प्रश्‍न पुढीलप्रमाणे आहेत. आहारामध्ये पिष्टमय, प्रथिनयुक्त आणि जीवनसत्त्व पुरविणारे घटक असतात. या घटकांचे आहारातील प्रमाण किती असावे हा मुख्य प्रश्‍न आहे. हे घटक मांसाहारी, शाकाहारी का केवळ वनस्पतीजन्य पदार्थातून मिळवावेत याबद्दल स्पष्टता हवी असते.

आहारामध्ये पूरक घटक आणि कृत्रिम पोषणद्रव्ये असावीत का? सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे उपवास करावा का? वरवर सोप्या वाटणाऱ्या या प्रश्‍नांची उत्तरे मिळवणे तेवढेच अवघड आहे. याचे कारण जे अन्नघटक शरीरात जातात त्यांचा उपयोग केवळ ऊर्जा मिळविण्यापुरता मर्यादित नाही. कर्करुग्णाच्या बाबतीत हे घटक इतर अनेक परिणाम घडवू शकतात. याविषयीच्या संशोधनातून अनेक परिणामांचा उलगडा होत आहे. आपण जे अन्न खातो ते सामान्य पेशींबरोबर कर्करोगाच्या पेशींनाही मिळते. अशा वेळी कर्करोगाच्या पेशींच्या वाढीसाठी चालना देणारे ठरले तर? अन्नघटकांमुळे औषधांची परिणामकारकता कमी होते का? कर्करोगाच्या गाठीतील पेशी त्यापासून सुट्या होऊन इतरत्र जातात. दुसऱ्या ठिकाणी त्यांची वाढ होण्यास अन्नातील घटक पोषक ठरू शकतात. असे झाले तर कर्करोग पसरण्यास मदत होऊ शकते. आजकाल पूरक पोषणद्रव्यांचा वापर खूपच वाढला आहे. शरीराची क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. कर्करोगाच्या रुग्णाने अशी पोषणद्रव्ये घ्यावीत का? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यात येत आहे. कर्करोगाचा संबंध जनुकाच्या कार्याशी आहे, हे आता माहीत झाले आहे. जनुकांच्या कार्यान्वित होण्याशी त्याचप्रमाणे जनुकांच्या निष्प्रभ होण्याशी त्याचा संबंध असतो. अन्नघटकांचा याच्याशी संबंध आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

कर्करोगाचे व्यवस्थापन हे रुग्णाच्या जीवितासाठी आणि रोगाच्या नियंत्रणासाठी महत्त्वाचे असते. यामुळे यामध्ये रोगनियंत्रणाबरोबर औषधांची परिणामकारकता, औषधांचे अनिष्ट परिणाम, त्याचप्रमाणे कर्करोगाव्यतिरिक्त इतर ठिकाणी होणारे विषारी परिणाम यांचा समावेश असतो. रुग्णाने उपवास केल्यास त्याचा फायदा या घटकांवर होतो का? याचा शोध घेतला जात आहे. उपवास केल्याने कर्करोगाला प्रतिबंध त्याचप्रमाणे रासायनिक उपचारांची परिणामकारकता वाढते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. यात सुधारणा झाल्याचे दिसते. उपवासामुळे रक्तातील साखरेचे आणि इन्शुलिनचे प्रमाण कमी झालेले आढळले आहे. कर्करोगाच्या गाठींच्या वाढीचा दर घटल्याचे दिसते. उपवासामुळे एटीपी आणि एनएडीएच या शरीराला ऊर्जा देणाऱ्या रेणूंचे प्रमाण कमी होते. हे प्रमाण कमी झाल्यामुळे पेशींच्या स्वयंनाशाला आवश्‍यक प्रथिनांच्या निर्मितीला चालना मिळते. तसेच पेशींचे कार्य नियंत्रित करणाऱ्या डीएनए या रेणूच्या दुरुस्तीला वाव मिळतो. जनुकीय स्थिरता वाढते आणि रोगप्रतिकार यंत्रणा कार्यान्वित होते. उपवासामुळे रासायनिक उपचारांना अधिक प्रतिसाद मिळतो. कर्करोगमुक्त ठिकाणांवर विषारी द्रव्यांचे प्रमाण आणि परिणाम कमी होतो. कर्करोगाच्या वाढीला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. अर्थात हे सर्व निष्कर्ष प्राथमिक असून त्यासंबंधी अधिक संशोधनाची गरज आहे.

प्रतिरोधासाठी काय खावे

जागतिक पातळीवर आहारविषयक झालेल्या संशोधनाचा आढावा घेणारे ‘डायटरी रीसर्च आणि कॅन्सर’ हे डॉ. राजेश गच्चे यांचे पुस्तक नुकतेच आले आहे. आहाराचा कर्करोगाशी संबंध प्रस्थापित करणाऱ्या संशोधनाचा यात आढावा आहे. आहारातल्या कोणत्या घटकांमध्ये कर्करोगाला प्रतिरोधाची क्षमता आहे, याची माहिती यामध्ये मिळते. यातील काही पदार्थ पुढीलप्रमाणे आहेत. आले, लसूण, काजू, चक्रफूल, पालक, गव्हाचे कोंब, ज्वारी, ऑलिव्हची पाने, ऑरेगॉन द्राक्षे, वाल, सफरचंद, बेरी, हळद, सोयाबीन, लवंग आणि मसाल्याचे पदार्थ, टोमॅटो, काकडी, कांदा आणि विविध प्रकारची फळे यांचा यात समावेश आहे. ही यादी प्रातिनिधिक स्वरूपात आहे. कर्करोग न होण्यासाठी आणि कर्करोग झाल्यानंतर योग्य आहार कसा असावा, यावर जगभर संशोधन होत आहे. यातून काही ढोबळ निष्कर्ष समोर आले आहेत. जागतिक कर्करोग संशोधन निधीशी संलग्नीत्व अमेरिकन कर्करोग संशोधन संस्था याविषयी संशोधन करते. या संस्थेने आहारातील घटकांविषयी काही शिफारशी केल्या आहेत. जेवणाच्या ताटात दोनतृतीयांश भाग हा कडधान्ये, भाज्या आणि फळे यांचा असावा. मांसाहारी पदार्थ मर्यादित प्रमाणात असावेत. चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ टाळावेत. पूरक पोषणद्रव्यांचे सेवन अधिक प्रमाणात करू नये. अधिक साखर असलेली पेये, अल्कोहोल आणि खारावलेले मासे यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे अथवा टाळावे. आहार हे दुधारी शस्त्र आहे. जोपर्यंत आहाराविषयी संशोधनातून ठाम निष्कर्ष मिळत नाहीत तोपर्यंत तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आहाराचे नियोजन फायदेशीर ठरेल.

(लेखक माजी कुलगुरु व पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक आहेत.)

Web Title: Dr Pandit Vidyasagar Writes Cancer Sickness Danger

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top