सीओपीडी आणि पल्मनरी फिजिओथेरपी : जपा मोकळा श्वास

वाढत्या शहरीकरण आणि प्रदूषणाबरोबर सर्वसामान्यांमध्ये क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डीसीस (सीओपीडी)सारख्या श्वसनाच्या विकारांचे प्रमाण वाढत आहे.
Heart
HeartSakal
Summary

वाढत्या शहरीकरण आणि प्रदूषणाबरोबर सर्वसामान्यांमध्ये क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डीसीस (सीओपीडी)सारख्या श्वसनाच्या विकारांचे प्रमाण वाढत आहे.

- डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे

वाढत्या शहरीकरण आणि प्रदूषणाबरोबर सर्वसामान्यांमध्ये क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डीसीस (सीओपीडी)सारख्या श्वसनाच्या विकारांचे प्रमाण वाढत आहे. थंडीच्या दिवसात या आजारांची तीव्रता वाढते. यावरच्या उपायांची माहिती.

ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डीसीस (सीओपीडी)सारख्या श्वसनाचे विकार शंभर टक्के टाळता आले नाहीत तरी त्यांची तीव्रता आणि कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामांना अटकाव करता येतो. त्यामुळे या श्वसनविकाराविषयी जनजागृतीची गरज आहे.

‘सीओपीडी’ हा श्वसनाचा एक दीर्घकालीन आजार आहे. ज्यामध्ये लहान व मध्यम आकाराच्या श्वसननलिकांचा दाह होतो आणि त्यांना सूज येते. यामुळे श्वासनलिकेचा आकार लहान होतो आणि श्वासोच्छवासात (प्रामुख्याने उच्छवासात) अडथळा निर्माण होतो. अर्थातच फुप्फुसाची ऑक्सिजन आणि कार्बन डायॉक्साईडची देवाणघेवाण करण्याची क्षमता कमी होते.

श्वास नलिकेचा दाह होण्याची मुख्य कारणं म्हणजे धूम्रपान आणि वायुप्रदूषण. याशिवाय लहानपणापासून असणाऱ्या ॲलर्जी, काही जनुकीय आजार, घरगुती किंवा कामाच्या ठिकाणी हवेत असणारा धूर अथवा इतर विषारी घटक इत्यादी कारणांमुळे ही ‘सीओपीडी’सारखी लक्षणे दिसून येतात.

जीवनशैलीतील बदल

धूम्रपान ‘सीओपीडी’चा मुख्य कारक. त्यामुळे सिगारेट- बिडीपासून मुक्ती आवश्यकच आहे. याशिवाय वायूप्रदूषण हा शहरी भागातील एक ज्वलंत प्रश्न. यामुळे शहरांत श्वसनाच्या समस्या व आजार वाढू लागले आहेत. वाहनांचा जबाबदार वापर (वाहनातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आटोक्यात ठेवणे, सिग्नलला गाडी बंद करणे इ.) तसेच रहदारीच्या रस्त्यावर प्रदूषणरोधक मुखपट्टीचा वापर केल्याने फुप्फुसाची हानी टाळता येते. अतिगारव्याच्या वेळी (सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर) घराबाहेर पडणे टाळावे. अतिथंड हवेत शारीरिक कष्टाची कामे किंवा व्यायाम टाळावेत. शक्यतो धूळ किंवा प्रदूषणयुक्त हवेशी संपर्क टाळावा. योग्य तेवढे पाणी प्यावे व संतुलित आहार घ्यावा.

औषधोपचार

जरी उपचारांनी ‘सीओपीडी’मध्ये झालेली फुप्फुसांची हानी १००%भरून निघाली नाही, तरी लक्षणांची तीव्रता आणि फुप्फुसाच्या क्षमतेत होणारा बिघाड योग्य त्या औषधोपचारांनी आटोक्यात आणता येतो. यासाठी श्वासनलिका प्रसारण पावतील अशी औषधे (ब्रॉंकोडायलेटर) इनहेलर किंवा नेब्युलायझरवाटे रुग्णाला दिली जातात. काही रुग्णांना श्वसन नलिकेची सूज कमी करण्यासाठी स्टिरॉइड किंवा इतर काही औषधेही दिली जाऊ शकतात. मात्र ही औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

लक्षणे

  • दीर्घकालीन चालणारा खोकला

  • काम केल्यावर धाप लागणे

  • लवकर थकवा येणे

वेळीच उपाययोजना न केल्यास लक्षणांची तीव्रता वाढत जाते. थंडीच्या दिवसात हवा कोरडी होते त्यामुळे श्वास नलिका अधिक शुष्क होते. थंडीच्या दिवसात हवेत धुलीकण, परागकणांचे आणि प्रदूषकांचे प्रमाण जास्त असते. हे कण शुष्क श्वासनलिकेच्या आवरणाच्या संपर्कात आल्याने श्वासनलिका अधिक आकुंचन पावते आणि श्वास घेण्यासाठी होणारा त्रास आणि पर्यायाने लक्षणांची तीव्रता वाढते. या आजाराचे नक्की निदान हेपल्मनरी फंक्शन टेस्टद्वारे केले जाते.

पल्मनरीफिजिओथेरपी

पल्मनरी फिजिओथेरपी म्हणजेच श्वसनरोगांमध्ये दिले जाणारे भौतिकोपचार हा पल्मनरी रिहॅबिलिटेशनचा एक महत्त्वाचा भाग. ही फिजिओथेरपीची एक विशेष शाखा आहे. यामध्ये फिजिओथेरपिस्ट ‘सीओपीडी’च्या लक्षणांना अनुसुरून श्वासाचे विशेष व्यायाम किंवा व्यक्तीची कार्यक्षमता वाढवणारे इतर व्यायामप्रकार सांगतात, ज्यामुळे रुग्णाच्या लक्षणांची तीव्रता कमी होते. धाप लागणे कमी होते. रक्तातील ऑक्सिजनचा समतोल वाढतो.

अ) श्वासाचे व्यायामप्रकार -

काही विशिष्ट प्रकारच्या श्वसनक्रिया ‘सीओपीडी’मध्ये उच्छवासाला होणारा अडथळा कमी करतात. तर श्वास आत घेण्यावर भर देणारी श्वासाची प्रक्रिया फुप्फुसात जाणाऱ्या शुद्ध हवेचे प्रमाण वाढवते. अधिकाधिक शुद्ध हवा फुप्फुसात गेल्याने रक्तातील ऑक्सिजनचा समतोल सुधारतो आणि लक्षणांची तीव्रता कमी होते. फुप्फुसात साठून राहिलेला कफ काढण्यासाठीही फिजिओथेरपिस्ट काही विशिष्ट तांत्रिक पद्धतींचा वापर करतात. यामध्ये पॉश्चरल ड्रेनेज (शरीराला ठराविक स्थितीत ठेऊन गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने कफ बाहेर काढणे) सारख्या पद्धती किंवा एकपेला, फ्लटरसारखी उपकरणे यांचा वापर केला जातो. धाप आणि खोकला कमी करण्यासाठी हा कफाचा निचरा आवश्यकच. यामुळे वारंवार होणारा फुप्फुसांचा संसर्गही कमी होतो.

ब) एरोबिक व्यायामप्रकार -

फुप्फुसाच्या दीर्घकालीन आजारांमध्ये कार्यशील स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यांची आकुंचनाची क्षमता कमी होते. असे स्नायू अधिक काळ काम करत राहिल्यास थकवा जाणवतो. उपलब्ध ऑक्सिजन सतत वापरला गेल्यामुळे रक्तात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते व त्याचा परिणाम इतर अवयवांवर होऊ शकतो.

एरोबिक म्हणजे चालणे, पळणे, पोहणे, सायकल चालवणे इ.व्यायामप्रकार करून स्नायूंची क्षमता वाढवता येऊ शकते. हे व्यायाम सातत्याने केल्यास स्नायू ऑक्सिजन योग्य प्रकारे वापरू शकतात आणि म्हणून रक्तातील ऑक्सिजन ठराविक सुरक्षित पातळीच्यावर राखला जातो. यामुळे येणारा थकवा आणि धाप दोन्ही कमी होते व कार्यक्षमता वाढते. रुग्णाचे मानसिक स्वास्थ्य तसेच जीवनशैलीही सुधारते.

कोणत्याही फुप्फुसाच्या आजाराने ग्रस्त व्यक्तीला या व्यायामप्रकारांमुळे आरोग्यविषयक लाभ होत असला तरी यामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी- जास्त होते आणि म्हणूनच सुरुवातीच्या काळात तरी हे व्यायामप्रकार कार्डिओपल्मनरी फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली करावेत. फिजिओथेरपिस्ट व्यायामाच्यावेळचे शारीरिक बदल व ऑक्सिजनची पातळी याचे सतत निरीक्षण करतात आणि योग्य प्रमाणात, कोणतेही दुष्परिणाम न होऊ देता व्यायाम देतात.

‘सीओपीडी’ हा संक्रमित न होणारा आजार आहे. योग्य ते उपचार आणि बदल न केल्यास वाढत जातो. त्यामुळे श्वसनाच्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सकस आहार, नियमित औषधोपचार आणि तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या शारीरिक व्यायामामुळे रुग्णाची दैनंदिन कामे करण्याची क्षमता आणि जीवनातील सहभाग हा एखाद्या निरोगी व्यक्तीसारखा असू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com