उत्कंठा एका ताऱ्याच्या जन्माची...

डॉ. प्रकाश तुपे (खगोलशास्त्राचे अभ्यासक)
गुरुवार, 12 जानेवारी 2017

ताऱ्यांच्या जन्म-मृत्यूविषयी सर्वांनाच आकर्षण वाटते. हंस समूहातील द्वैती ताऱ्यांच्या मृत्यूमधून एक नवा तारा जन्म घेणार आहे. खगोलशास्त्रात एखाद्या ताऱ्याचा मृत्यू कधी होईल, हे प्रथमच सांगितले जात असल्याने या घटनेविषयी मोठी उत्सुकता आहे.

ताऱ्यांच्या जन्म-मृत्यूविषयी सर्वांनाच आकर्षण वाटते. हंस समूहातील द्वैती ताऱ्यांच्या मृत्यूमधून एक नवा तारा जन्म घेणार आहे. खगोलशास्त्रात एखाद्या ताऱ्याचा मृत्यू कधी होईल, हे प्रथमच सांगितले जात असल्याने या घटनेविषयी मोठी उत्सुकता आहे.

आ पल्या आयुष्यात प्रथमच एक नवा तारा आकाशात जन्म घेताना आपण नुसत्या डोळ्यांनी पाहणार आहोत. दोन ताऱ्यांच्या मिलनातून एक नवा तारा जन्म घेताना दिसू शकेल, असा दावा अमेरिकी खगोलशास्त्रज्ञांनी नुकताच केला. सामान्यतः ताऱ्यांचा मृत्यू किंवा जन्माची घटना शास्त्रज्ञांना अचानकपणे व क्वचितच दिसते. ताऱ्यांचे आयुष्यमान अब्जावधी वर्षांचे असल्याने त्यांच्या जन्म व मृत्यूविषयी अगोदरच ठामपणे निदान करता येत नाही. मात्र, केल्वीन कॉलेजच्या खगोलशास्त्रज्ञांनी हंस तारकासमूहातील द्वैती ताऱ्यांच्या मृत्यूमधून एक नवा तारा (नोव्हा) जन्म घेताना २०२० मध्ये दिसू शकेल, असा दावा केला आहे. खगोलशास्त्रातील हे ऐतिहासिक संशोधन अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सहा जानेवारीच्या सभेत जाहीर करण्यात आले.

मिशिगनमधील केल्वीन कॉलेजचे प्राध्यापक लॅरी मोल्नर व त्यांचे विद्यार्थी हंस तारकासमूहातील १८०० प्रकाशवर्षे अंतरावरच्या एका द्वैती ताऱ्याची निरीक्षणे गेली काही वर्षे घेत आहेत. हे तारे एकमेकांभोवती अगदी जवळून फेऱ्या मारीत असताना त्यांना दिसले. पुढील पाच-सहा वर्षांत ते एकमेकांवर आपटून महास्फोट होईल व त्यातून निर्माण झालेल्या ताऱ्यांचे तेज दहा हजार पट वाढून, हा नवा तारा (नोव्हा) नुसत्या डोळ्यांनी पृथ्वीवासीयांना दिसू शकेल. स्फोट होण्यापूर्वी हा द्वैती तारा फक्त दुर्बिणीतून दिसू शकेल एवढ्या मंद तेजाचा, तर स्फोटानंतर तो ध्रुव ताऱ्याच्या तेजाएवढा होऊन नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल.

आकाशात दिसणारे अनेक तारे विविध कारणांमुळे त्यांचे तेज बदलताना दिसतात. हंस तारकासमूहातील डावीकडच्या भागात दिसणारा एक तारा (केआयसी ९८३२२७) तेज का बदलतो याविषयीचे संशोधन खगोलशास्त्रज्ञ करीत आहेत. तीन वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांच्या ध्यानात आले, की हंसेतील हा तारा एक नसून, दोन तारे एकमेकांभोवती वेगाने फिरत आहेत. या ताऱ्यापैकी एक आपल्या सूर्यापेक्षा चाळीसपट मोठा, तर दुसरा सूर्यापेक्षा एकतृतीयांश पट छोटा आहे. हे तारे एकमेकांभोवती अकरा तासांत फेऱ्या मारत आहेत. पृथ्वीवरून पाहताना ते एकमेकांसमोरून जाताना ग्रहण लावताना दिसत आहेत व त्यामुळे त्यांचे तेज कमी-जास्त होत आहे. या ताऱ्यांची निरीक्षणे गेली पंधरा वर्षे घेतली जात आहेत. तसेच केप्लर हवाई दुर्बिणीतूनदेखील या ताऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. ताऱ्यांच्या एकमेकांभोवती फिरण्याचा वेग वाढत असून, ते एकमेकांजवळ येत आहेत, असे या निरीक्षणातून ध्यानात आले. सध्या ते इतके जवळ आहेत, की त्यांचे बाह्य आवरण एकत्रित आल्यासारखे वाटत आहे. थोडक्‍यात शेंगदाण्याच्या एका टरफलात दोन शेंगदाणे असल्यासारखी या दोन ताऱ्यांची अवस्था आहे. प्रा. लॅरी मोल्नर यांनी २०१३ मध्ये हंस तारकासमूहातील या ताऱ्यांविषयीची गेल्या काही वर्षांपासूनची निरीक्षणे तपासली. तसेच यापूर्वीच्या १७० रात्रीतील ३२०० निरीक्षणे पाहून असे ध्यानात आले, की पूर्वीपेक्षा खूपच अधिक वेळा या ताऱ्यांची ग्रहणे होत आहेत. याचाच अर्थ असा, की तारे पूर्वीपेक्षा जास्त वेगाने व कमी काळात एकमेकांभोवती फिरत आहेत. यापूर्वी वृश्‍चिक राशीतील द्वैती तारे (व्ही-१३०९ स्कॉर्पी) याचप्रकारे एकमेकांभोवती फिरत होते. मात्र अचानकपणे त्यांचा मृत्यू एका महास्फोटात २००८ मध्ये झाल्याचे निरीक्षण पोलंडचे खगोलशास्त्रज्ञ टीलॅंडे यांनी नोंदविले होते. याच निरीक्षणाचा आधार घेऊन प्रा. लॅरी यांच्या गटाने हंस तारकासमूहातील ताऱ्यांची निरीक्षणे तपासण्यास सुरवात केली. त्यांच्या ध्यानात आले, की वृश्‍चिकेच्या ताऱ्याचा व हंस तारकासमूहातील ताऱ्याचा जीवनमार्ग सारखाच आहे. याचाच अर्थ असा, की हंस तारकासमूहातील तारादेखील याचप्रकारे आपले जीवन संपवू शकेल. हंसेतील दोन तारे वेगाने एकमेकांभोवती फिरत पुढील काही वर्षांत एकमेकांजवळ येत जातील व छोटा तारा मोठ्या ताऱ्यामध्ये मिसळून जाईल. या वेळी बाह्य भागातील वायूंचा स्फोट होऊन प्रचंड ऊर्जा निर्माण होईल. ही ऊर्जा लाल रंगाचा प्रकाश फेकीत असल्याने या स्फोटात निर्माण झालेल्या ताऱ्यास ‘तांबूस नवतारा (रेड नोव्हा)’ म्हणून ओळखले जाते. ही घटना २०२२ च्या सुमारास घडण्याची शक्‍यता मोल्नर यांनी वर्तविली आहे. पुढील पाच वर्षे शास्त्रज्ञ या द्वैती ताऱ्याची निरीक्षणे विविध तरंग लांबीवर घेऊन, ताऱ्याच्या मृत्यूची नक्की वेळ ठरवू शकतील.

खगोलशास्त्रात प्रथमच एखाद्या ताऱ्याचा मृत्यू कधी होईल, हे सांगितले जात असल्याने या संशोधनाकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. ‘रेड नोव्हा’चे जनक मानले जाणारे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व सध्या ‘कॅलटेक’मध्ये संशोधन करीत असलेले डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या मते हे संशोधन नक्कीच मोलाचे व ऐतिहासिक आहे. ताऱ्यांच्या जन्म-मृत्यूविषयी सर्वांनाच आकर्षण वाटते. आपल्या सूर्याचा व सूर्यमालेचा जन्मदेखील महास्फोटामुळेच झाला आहे. याचमुळे प्रा. मोल्नर यांच्या संशोधनाचे महत्त्व अधिक आहे.

Web Title: dr prakash tupe's article