esakal | भाष्य : निकोप आंतरशाखीय संवादाकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Interdisciplinary Dialogue

भाष्य : निकोप आंतरशाखीय संवादाकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महासाथीच्या काळात आपल्याला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत, त्यातील एक म्हणजे आरोग्यपूर्ण आंतरशाखीय संवादांची! जैव दहशतवादाच्या या काळात आपल्याला ‘जंतू’सोबत ‘शारीर’ घटकांचं समग्र आकलनही करावे लागणार आहे.

कोविड साथीने जगभरात आरोग्य आणीबाणी झाली आहे. सुमारे वर्षभराची वैधता असणाऱ्या लशी येऊनही परिस्थितीत मोठा फरक पडलेला नाही. नव्या स्ट्रेन्सच्या बातम्या सर्वसामान्यांना धडकी भरवताहेत, तर तज्ज्ञांच्या एकूणच भूमिकांबद्दल शंका निर्माण करत आहेत. खरंतर वैद्यकात बाह्य जंतू आणि मानवी शरीर असे दोन घटक आहेत. पण ‘शरीरविचार’ प्रधान म्हणवणारा पक्ष आजवर तुलनेने लंगडाच राहिला आणि केवळ सूक्ष्मजीवशास्त्राचा व आनुषंगिक औषधांचाच झपाट्याने ‘विकास’(!) होत गेला. महागडी नवनवी प्रतिजैविके विकसित होण्यात औषधनिर्माण कंपन्यांचे अर्थकारणही दडलेले होतेच. पण सध्याच्या साथीच्या काळात केवळ ‘अँटिव्हायरल’च्या पलीकडे जात, ‘जंतू-शरीर आंतरक्रिया’ विषयाची नव्याने मांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. आयुर्वेदातील समग्र शारीर आकलन, पारंपारिक विभाजनवादी (रिडक्शनिस्ट) भूमिकेला छेद देत ‘सिस्टिम्स बायोलॉजी’सारख्या शास्त्राची ‘समग्र आकलनाची भूमिका’ या प्रकाशात हे आंतरविद्याशाखीय अध्ययन व्हायला हवे.

जंतुजन्य (?)आजारांच्या इतिहासात लुई पाश्चरने सर्वप्रथम सूक्ष्मदर्शकाखाली जंतू पाहिला. त्याचवेळी त्याचे समकालीन क्लाइड बर्नाडशी (आधुनिक शरीरक्रिया शास्त्राचा पिता) मतभेद होते. क्लाइड म्हणायचा, की शरीराला अर्थात ‘होस्ट’ला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. वैद्यकशास्त्राच्या इतिहासातील हा प्रसिद्ध वाद होता.वैद्यकीय इतिहासकार नोंदवतात, की पाश्चरचे अखेरचे शब्द होते, ‘द मायक्रोब इज नथिंग, टेरेन इज इव्हरीथिंग!’ नंतर सारेच सूक्ष्मजीव (जिवाणू, बुरशी, विषाणू) घातक नसतात, तर काही शरीरोपकारीदेखील असतात, हे ध्यानात आले आणि १८८९च्या दरम्यान सूक्ष्मजीव असं म्हणण्याऐवजी ‘पॅथॉजेंन’ अर्थात ‘विकृतीनिर्माणक्षम जंतू’असा शब्द वापरला जाऊ लागला. मग लक्षात आले, की बरेच संसर्ग सरसकट सगळ्यांना होत नाहीयेत, तर प्रतिकारशक्ती दुर्बल असणारांनाच होताहेत. त्यासाठी ‘संधिसाधू संक्रमण’ ही संज्ञा वापरली गेली. पुढे जंतूंची विकृतीनिर्मिती क्षमता नक्की कशातून येते, अर्थात ‘विरुलेन्स घटक’चा विचार (उदा. करोना विषाणूचे कवचातील एक प्रोटीन) केंद्रस्थानी आला. त्याला बांधून ठेवणे वा निष्प्रभ करणे हे तत्त्व वापरून लसी बनवणे शक्य झाले. लसींमुळे घटसर्प, धनुर्वात, पोलिओ यासारखे दुर्धर आजार हद्दपार होऊ शकले; पण त्याचवेळी मलेरिया किंवा क्षयाच्या जंतूंमधील ‘विरुलेन्स’ घटक न समजू शकल्याने त्याची लसनिर्मिती होऊ शकली नाही. एचआयव्ही विषाणूसाठीही लस बनवण्याचे सुमारे तीन दशकांचे प्रयत्न यशस्वी नाहीत. भूमिकांचा लंबक कधी ‘जंतू’ तर कधी ‘शरीर’ असा दोलायमान राहिला. सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधन विभाजनवादी भूमिकेतून होत असून समग्र भूमिकेची गरज आहे हे ध्यानात घेत २०१५मध्ये डॅनी अलटमनने त्या जंतूंसाठी ‘पॅथॉजेन’ या शब्दाऐवजी समग्र असा ‘पर्सेप्टोजेन’ हा शब्द सुचवला.

कोविडच्या स्टिरॉइडचा वापर झालेल्या व रक्तशर्करा वाढलेल्या रुग्णांत आज काळी बुरशी या दु:साध्य बुरशी संसर्गाने आता थैमान घालायला सुरवात केली आहे. यात पुन्हा ‘होस्ट फॅक्टर’ च महत्त्वाचा ठरतो, कारण बुरशी सगळ्याच कोविड रुग्णांत आढळत नाहीये! २०१४च्या ‘नेचर’ मधल्या एका शोधनिबंधात ‘अस्पेरगीलस फ्युमिगेट्स’ नावाची बुरशी बाकी सर्वांसाठी निरुपद्रवी असते; पण ‘केवळ रक्ताचा कर्करोग’ असणाऱ्या रुग्णांच्या फुफ्फुसात तीव्र आजार निर्माण करू शकते, असे लेखक लक्षात आणून देतो. आपापल्या कोषातून बाहेर न येणाऱ्या या ‘सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ’ आणि ‘इम्युनोलॉजिस्ट’ना चिमटा काढत लेखक म्हणतो की, हे दोन शास्त्रज्ञ वेगवेगळ्या परिषदांना जातात, वेगवेगळ्या नियतकालिकांत लिहितात आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून अनुदान मिळवतात! त्यामुळं साथरोग तर दूरच; साध्या संसर्गजन्य रोगासाठीदेखील आंतरशाखीय, बहुरेखीय आकलन गरजेचे आहे. 

विभाजनवादी आणि समग्रतावादी

‘शरीर महत्त्वाचं की जंतू’ अशा सरसकट एकरेषीय विभागणीत हशील नाही हे ध्यानात घेत न्यूयॉर्कस्थित प्रा. आर्टरो कासादिवॉल यांनी शरीर व जंतू या दोन्हींचा समावेश करणारी ‘डॅमेज रिस्पॉन्स फ्रेमवर्क’ ही मांडणी गेल्या दशकात केली. संसर्गजन्य आजाराची घटना ‘नवनिर्मिती’ असून जंतू व शरीर याच्या परस्पर प्रतिक्रियांतून निर्माण होते, असे मांडले. केवळ जंतूला महत्त्व न देता शारीर घटकांचा समावेश करत संशोधने मांडली जात आहेत. तरीही या देशातील वैद्यकीय अर्थकारण व चिकित्सा व्यवहार या स्तरावर अजूनही ‘जंतुपक्ष’च मांड ठोकून आहे. ‘रेमडेसेवीर या ‘विषाणू प्रतिबंधक कायद्याच्या प्रसिद्ध उदाहरणावरून हे ध्यानात येईल. कोविडसंबधीच्या संशोधनात होस्ट फॅक्टरसंबंधी संशोधने तुलनेने कमीच आहेत. ‘पबमेड’ या अमेरिकी सरकारी डेटाबेसवर ‘कोविड आणि जिनोम’ शोधू गेल्यास सुमारे साडे चारहजार शोधनिबंध येतात तर ‘कोविड आणि होस्ट फॅक्टर’ शोधू गेल्यास एक-सव्वा हजारच शोधनिबंध दिसतात! 

चिकुनगुनिया, स्वाईन फ्लू, कोविड असे नवनवे आजार आले तरी आयुर्वेदिक उपचार यशस्वी ठरल्याची उदाहरणे आहेत. याचं गुपित हेच की आयुर्वेद ‘होस्ट फॅक्टर’ वर जास्त काम करतो! आज जेष्ठ मधातील ग्लायसीरिझीन किंवा अश्वगंधेतील विथॅनोन हे करोनाची वाढ थांबवते, हे सिद्ध झालंय. पण आयुर्वेदात कोरोनाची वाढ थांबवणे किंवा ‘अँटी व्हायरल’ हा विचारच मुळात केंद्रस्थानी नाही! त्याऐवजी तीन दोष आणि वीस शारीर गुण (प्रॉपर्टीज) यांचं आकलन हाच विकृतीविज्ञानाचा, चिकित्सेचा पाया आहे. जंतूजन्य आजारात आयुर्वेदात सान्निपात ज्वराचे प्रकार आले आहेत. या तापांच्या या प्रकारांची सुरवात जरी बाह्य जंतूंमुळे झाली असली तरी त्यांना औषध देत असता केवळ बाह्यजंतूकडे न पाहता त्यामुळे झालेले शरीरातील बिघाड सुधारणे हेच महत्त्वाचे आहे, असे आचार्य चरक बजावतात! तापच नव्हे तर विसर्प (नागीण) किंवा मसुरीका (कांजिण्या) किंवा कुष्ठ (त्वचारोग) अशा साऱ्याच संसर्गजन्य आजारात बाह्य कारणाला ठराविक महत्त्व देऊन पुढे चिकित्सेची दिशा ही शरीराचे आकलन व समग्र चिकित्सा अशीच आहे.

विभाजनवादी व समग्र आकलनवादी हा विज्ञानातील पुरातन मतभेद आहे. पूर्वीचे जीवशास्त्रज्ञ हे मूळचे भौतिकशास्त्रज्ञ / रसायनशास्त्रज्ञ असल्याने शरीरशास्त्रात ही विभाजनवादी भूमिका प्रबळ राहिली. शरीरातील घटकाचा तुकड्यात विचार न करता समग्र आकलनाचा भाग म्हणून त्याच्याकडे पाहण्याची भूमिका ‘सिस्टिम्स बायोलॉजी’त आहे. हा दृष्टिकोन शरीरशास्त्र- आजार-पथ्य-औषधे हे सारं त्रिदोषांत एकत्र गुंफणाऱ्या आयुर्वेदीय दृष्टिकोनाशी साधर्म्य दाखवतो. आज खरी गरज आहे ती आरोग्यपूर्ण आंतरशाखीय संवादांची! जैव दहशतवादाच्या या काळात आपल्याला जंतू सोबत ‘शारीर’ घटकांचं’ं समग्र आकलनही ताकदीने करावे लागेल, हे नक्की!

(लेखक प्राध्यापक व आयुर्वेदीय संशोधक आहेत)