esakal | संकटकाळात आश्वस्त करणारे ‘सायरन’ I Ambulance
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

संकटकाळात आश्वस्त करणारे ‘सायरन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ. प्रसाद राजहंस

देशातील ‘आपत्कालीन वैद्यकीय सेवां’चा प्रवास सुरू होऊन दोन दशके पूर्ण झाली. लक्षावधी रुग्णांचे प्राण या सेवेने आतापर्यंत वाचविले. मात्र, भविष्यात रुग्णाला वाहून हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणे इतका मर्यादित दृष्टिकोन निश्चित नसेल. वैद्यकीय मदत, पोलिस आणि अग्निशमन यंत्रणा अशा सर्व एकत्र आल्या तर आणखी उत्तम व्यवस्था उभी राहू शकते.

परदेशातून मायदेशी परतल्यानंतर एक उणीव प्रकर्षाने मनात सातत्याने जाणवतं होती, ती म्हणजे ‘आपत्कालीन वैद्यकीय सेवेची’ (इमर्जन्सी मेडिकल सर्व्हेसेस – ईएमएस). देशात १०८ या क्रमांकावर ‘ईएमएस’ ही सेवा व्हावी, ही प्रखर इच्छाशक्ती होती. त्या दृष्टीने सुरवातीला ‘पुणे हार्ट ब्रिगेड’ची स्थापना झाली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांनी यात मार्गदर्शन केले. रोटरी क्लबने त्यासाठी रुग्णवाहिका दिल्या. त्या माध्यमातून कॉल सुरू झाले. त्यानंतर १०५ हा क्रमांक इमर्जन्सी सर्व्हिससाठी त्यांनी सुरू केला. त्यानंतर तो १०५० असा झाला.

‘ईएमएस’ची मुहूर्तमेढ

‘ईएमएस’ची सुरवात पुण्यातून पाच ऑगस्ट १९९९ रोजी झाली. ती सेवा कर्वे रस्त्यावरील संजीवनी हॉस्पिटलमधून चालविली जायची. पुणेकर कॉल करायचे. त्यांना सेवाही मिळायची; पण त्यात अडचणी खूप येत होत्या. मुख्य आव्हान म्हणजे डॉक्टर रुग्णवाहिकेबरोबर जात नसत.

सुरवातीला रुग्णवाहिकेचे चालक, त्यावरील डॉक्टर आणि परिचारिका यांचे प्रशिक्षण हे मोठे आव्हान समोर होते. रुग्णवाहिकेची सेवा नेमकी कशी द्यायची, याची माहिती येथे नव्हती. थोडक्यात ‘ईएमएस’बद्दलच सगळ्याच पातळ्यांवर शास्त्रीय माहितीचा अभाव प्रकर्षाने जाणवत होता. ‘ईएमएस’मध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ ही सर्वांत मोठी समस्या होती. त्यासाठी एखाद्या विद्यापीठाकडे जाऊन याबद्दलचा अभ्यासक्रम सुरू करावा. या विषयी जनजागर होईल. हा विषय लोकांपर्यंत पोचेल, असा विचार अभ्यासक्रम सुरू करण्यामागे होता. त्यासाठी वेगवेगळ्या वैद्यकीय आणि शिक्षण संस्थांमध्ये गेलो; पण, सगळीकडून नकार मिळाला. अखेर ‘सिम्बायोसिस’ अभिमत विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी पाच मिनिटांमध्ये परवानगी दिली. हा अभ्यासक्रम नवीन आणि अद्याप दुसऱ्या कोणी सुरू केलेला नाही, या दोन निकषांवर २००१च्या दरम्यान परवानगी आणि अभ्यासक्रम सुरू झाला.

प्रवासातील टप्पे

पुण्यात २००२ ते २००५ दरम्यान ट्रॉमाचे अभ्यासक्रम, ‘स्टार ऑफ लाइफ’ हा प्रकल्प राबविला. हैदराबाद येथे २००५मध्ये ‘ईएमआरआय’ सुरू केली. त्यांच्याकडे पैसे होते, तंत्रज्ञान होते आणि रुग्णावाहिकादेखिल होत्या. पण, त्यांच्याकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नव्हेत. त्यामुळे मनुष्यबळाचा शोध घेत ‘ईएमआरआय’ पुण्यात आले. त्यांना मनुष्यबळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून मिळाले. देशातील १८ राज्यांमध्ये ‘ईएमएस’ सुरू झाली. पण, राज्यात ‘बीव्हीजी - एमईएमएस‘च्या माध्यमातून २६ जानेवारी २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने ही सेवा सुरू झाली. सुरवातील ९१७ रुग्णवाहिका होत्या.

भविष्यातील ‘ईएमएस’

राष्ट्रीय स्तरावर ‘ईएमएस’ कायद्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्यामुळे या सेवेला कायदेशीर अधिष्ठान मिळेल. तसेच, यासाठी आर्थिक तरतूद होईल. या सेवेची देशपातळीवर सुसूत्र व्यवस्था राबविता येईल.

डॉक्टरांनी रुग्णवाहिकेवर जाण्याचा काळ आता मागे पडला आहे. त्यासाठी पॅरामेडिक्सचा अभ्यासक्रम, त्याची गुणवत्ता आणि त्यांची नोंदणी यामुळे भविष्यात ‘ईएमएस’चा दर्जा आणखी वाढेल.

‘लोड अँण्ड गो’ म्हणजे घटनास्थळी रुग्णाला शक्य तितके वैद्यकीय उपचार करून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करायचे. वाटेत त्याच्या चाचण्या आणि पूरक वैद्यकीय सहाय्य करायचे, ही पद्धत भारतासाठी योग्य ठरेल.

भविष्यात रुग्ण वाहतूक इतक्या मर्यादित दृष्टिकोनातून ‘ईएमएस’कडे न पहाता त्याच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न होण्याची वेळ आता आली आहे.

हेलिकॉप्टर अँम्ब्युलन्स सेवा भविष्याची गरज आहे. ‘पीएमआरडीए’ने मंजूर केलेल्या रिंगरोडवर किंवा हाय-वेवर लँडिंगपॅडची सुविधा करणे आवश्यक आहे.

जगभरातील ‘ईएमएस’सेवा तोट्यात असते. त्यातून फायदा मिळत नाही. त्यासाठी आर्थिक पाठबळ लागते.

प्रत्येक इमारतीमध्ये ट्रेचर लिफ्ट आवश्यक आहे. भविष्यात गगनचुंबी इमारतींना परवानगीचा हा एक निकष ठेवला पाहिजे. अन्यथा रुग्णांला घरातून रुग्णवाहिकेपर्यंत कसे आणायचे, असा प्रश्न निर्माण होईल.

सरकार, खासगी संस्था, वैद्यकीय तज्ज्ञ, पॅरामेडिक्स आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांचा समन्वय नितांत गरजेचा आहे.

एखाद्या दुर्घटनेत ड्रोन्सच्या माध्यमातून अपघातग्रस्त नागरिकाचा शोध घेऊन त्याला तेथून सुखरूप बाहेर काढण्यासाठी ड्रोन्सचा प्रभावी वापर करता येईल.

(लेखक आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे प्रणेते आहेत.)

(शब्दांकन - योगीराज प्रभुणे)

loading image
go to top