शिक्षण पुनर्रचनेतील मुक्त विद्यापीठाचे महत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwantrao Chavan Open University
शिक्षण पुनर्रचनेतील मुक्त विद्यापीठाचे महत्त्व

शिक्षण पुनर्रचनेतील मुक्त विद्यापीठाचे महत्त्व

- डॉ. प्रवीण घोडेस्वार

महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तीन वर्षांचा पदवी शिक्षणक्रम चार वर्षांचा करण्यासाठी नुकतीच एक समिती स्थापन केली आहे. या निमित्ताने शैक्षणिक पुनर्रचनेच्या प्रक्रियेत मुक्त विद्यापीठाला प्रतिनिधित्व असायला हवे,अशी भूमिका मांडणारा लेख.

राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तीन वर्षांचा पदवी शिक्षणक्रम चार वर्षांचा करण्यासाठी नुकतीच एक समिती स्थापन केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा(२०२०)नुसार सध्याच्या तीन वर्षांच्या शिक्षणक्रमाचे रुपांतर चार वर्षांच्या शिक्षणक्रमात करण्याची योजना आणि याबाबतचा आराखडा तयार करणे, एकसमान शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा तयार करणे, सामान्य अध्यापनशास्त्राऐवजी विधायक अध्यापनशास्त्राचा वापर करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तीकृत शिक्षणाचा आराखडा तयार करणे या चार कारणांसाठी समिती स्थापन झाली. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी समितीचे अध्यक्ष असून याच विद्यापीठाचे कुलसचिव समितीचे सदस्य सचिव आहेत.

समितीत राज्यातील विविध विद्यापीठांमधल्या आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील निरनिराळ्या विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, वरिष्ठ सल्लागार यांचा समावेश आहे. एकूण २१ सदस्य आहेत. हे सर्व तज्ज्ञ सदस्य पारंपरिक विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांशी निगडित आहेत. या समितीत ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’ला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाहीये. ते असायला हवे.

राज्यात ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ’ १९८९पासून कार्य करीत आहे. तत्कालीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातच त्यासंबंधीची तरतूद होती. त्यानुसार मुक्त विद्यापीठ स्थापन झाले. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेत वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांना शिक्षणाची संधी मिळत नाही. परिणामी असे समाजघटक उच्च शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नयेत, हा त्यामागचा मुख्य उद्देश. तसेच ज्या लोकांना नोकरी – व्यवसायामुळे महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेता येणार नाही, अशांनाही या विद्यापीठातून आपली शैक्षणिक पात्रता वाढवता येते. अशा अनेकांना हे विद्यापीठ वरदान ठरले आहे. हजारो गृहिणींनीही याचा लाभ घेत अर्धवट राहिलेले शिक्षण या विद्यापीठातून पूर्ण केलेले आहे. याचा त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात (करिअरसाठी) देखील लाभ झालेला आहे. शिवाय विद्यापीठाचे काही शिक्षणक्रम केवळ सेवांतर्गत उमेदवारांसाठीच विकसित करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड.) शिक्षणक्रम. या शिक्षणक्रमासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनाच प्रवेशअर्ज सादर करता येतो. विशिष्ट वेतनश्रेणी मिळवण्यासाठी शिक्षकांना बी.एड. पदवी उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. त्यासाठी अशा शिक्षकांना केवळ मुक्त विद्यापीठाचा पर्याय उपलब्ध आहे. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य अर्थात ३६ जिल्हे असून प्रशासकीय सोयीसाठी राज्यात आठ ठिकाणी विभागीय केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

कार्यपद्धतीमधील फरक

अन्य विद्यापीठे आणि मुक्त विद्यापीठ यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे. पारंपरिक विद्यापीठात संलग्न महाविद्यालये असतात तशी मुक्त विद्यापीठात नसतात. त्या ऐवजी याच पारंपरिक विद्यापीठांना संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांत मुक्त विद्यापीठाची अभ्यासकेंद्रे कार्यन्वित आहेत. या अभ्यास केंद्रावर अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया होत असते. इतर विद्यापीठांत संलग्न महाविद्यालयात अनेक शैक्षणिक व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडल्या जातात. मुक्त विद्यापीठात मात्र यातल्या अनेक गोष्टी विद्यापीठ मुख्यालय आणि विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर होत असतात. विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रावर आठवड्यातून ठराविक दिवस उपस्थित राहून शैक्षणिक मार्गदर्शनाचा लाभ घेतात. पारंपरिक विद्यापीठात पदवी शिक्षणक्रमासाठी संबधित विषयाच्या तज्ज्ञांनी लिहिलेल्या आणि खाजगी प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा उपयोग अध्ययन- अध्यापनासाठी करण्यात येतो.

मुक्त आणि दूरस्थ शिक्षण व्यवस्थेत मात्र विद्यार्थ्यांना सर्व विषयांवरील अध्ययन साहित्य पुरवण्यात येते. यांस ‘स्वयंअध्ययन साहित्य’ असे संबोधले जाते. हे अध्ययन साहित्य विकसित करण्याची जबाबदारी मुक्त विद्यापीठाची असते. ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’ने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असे ‘स्वयंअध्यन साहित्य’ विकसित केलेले आहे. विविध स्पर्धा परीक्षा आणि पात्रता चाचणी ( महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, टीईटी, सेट, नेट) देणारे उमदेवार मोठ्या प्रमाणात ह्या दर्जेदार अध्ययन साहित्याचा लाभ घेऊन यशस्वी होतात. यास्तव काळजीपूर्वक, काटेकोरपणे या स्वयंअध्ययन साहित्याची निर्मिती करण्यात येते. यासाठी राज्यातील तसेच देशातील त्या- त्या विषयातल्या मान्यवर प्राध्यापकांचा आणि विषय तज्ज्ञांचा सहभाग घेतला जातो. विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा, शिक्षणशास्त्र विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, संगणकशास्त्र विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, कृषी विज्ञान विद्याशाखा यांच्यामार्फत अध्ययन साहित्य विकसित करण्यात येते. सर्वसामान्य,अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणारी पुस्तके विद्यापीठाने निर्माण करून लोकांपर्यंत पोहचवली आहेत. याचा लाभ ग्रामीण महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांनी घेतला आहे. यातून त्यांनी आपल्या शेती करण्याच्या पद्धतीत बदल करून चांगले उत्पन्न घेतले आहे.

तीन वर्षांचा पदवी शिक्षणक्रम चार वर्षांचा करण्यासाठी कोण-कोणते नवे बदल करणे आवश्यक आहे, हा बदल होत असताना कोणत्या संभाव्य अडचणी येऊ शकतात, त्यावर मार्ग कसा काढता येऊ शकतो, यासारख्या अनेक मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी या समितीत मुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाने याची दखल घेऊन या समितीत ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’ला प्रतिनिधित्व द्यावे.

( लेखक ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’च्या विद्वत परिषदेचे सदस्य व मानव्यविद्याशाखेचे प्र. संचालक आहेत. लेखातील मते वैयक्तिक.)

Web Title: Dr Pravin Ghodeswar Education Open University Importance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top