भाष्य : भूतान भारतीयांसाठी ‘दुर्मीळ’

आर्थिक आणि सामरिक सक्षमतेसाठी सर्वतोपरी भारतावर अवलंबून असणारा भूतान भारतीय पर्यटकांबाबत टोकाची भूमिका का घेतो, याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.
Bhutan Country
Bhutan CountrySakal
Summary

आर्थिक आणि सामरिक सक्षमतेसाठी सर्वतोपरी भारतावर अवलंबून असणारा भूतान भारतीय पर्यटकांबाबत टोकाची भूमिका का घेतो, याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.

आर्थिक आणि सामरिक सक्षमतेसाठी सर्वतोपरी भारतावर अवलंबून असणारा भूतान भारतीय पर्यटकांबाबत टोकाची भूमिका का घेतो, याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. या निमित्ताने खरे तर भारतात पर्यटनसंस्कृती विकसित होण्याच्या गरजेवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी ठोस प्रयत्न व्हायला हवेत.

भूतान, हिमालयाच्या कुशीत वसलेला इवलासा देश. निसर्गदत्त हवामान, भौगोलिक संरचना, लोकसंख्या यामुळे ‘आशियाचे स्विझर्लंड’ अशी ओळख आणि राजकीयदृष्ट्यादेखील तटस्थ. गेल्या काही दशकांमध्ये जागतिक पातळीवर अनेक गोष्टींमुळे तो सतत चर्चेत आहे, उदा. एकूण राष्ट्रीय आनंद निर्देशांक, अमर्यादित राजेशाहीचा त्याग करून घटनात्मक लोकशाहीचा स्वीकार, सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या सेवनाबद्दल तुरुंगवासाची शिक्षा, पर्यावरण आणि शाश्वत विकास अशा धोरणांचा स्वीकार आणि अंमलबजावणी. त्यामुळे जगातील विविध स्तरावरून भूतानच्या निर्णयांचे स्वागत झाले. कोविडसारखी परिस्थिती अतिशय संवेदनशीलपणे हाताळून तेथील सरकारने भूतानच्या नागरिकांना ‘कोविड’ला बळी पडू दिले नाही. कोविडकाळात भूतानने जगभरात विखुरलेल्या भूतानी नागरिकांना विशेष विमानांनी भूतानला परत बोलाविले आणि त्यानंतर भूतानच्या सर्व सीमा बाहेरील जगासाठी सील केल्या.

फक्त भारतातून आवश्यक त्या वस्तूंची ने-आण करण्यासाठी भूतानच्या सीमा खुल्या होत्या. हे करत असताना भूतानला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले, याचे कारण भूतानच्या परकी चलनाचे मुख्य स्त्रोत आणि अर्थ व्यवस्थेचा कणा, पर्यटन हे क्षेत्रच कोलमडून पडले. अर्थात हायड्रो-इलेक्ट्रिसिटी, टिंबर, चुना-निर्मिती आणि सिमेंट या व्यवसायांमुळे देखील तेथील अर्थव्यवस्था तग धरून आहे. याची जाणीव असूनही भूतान सरकारने अचानकपणे भारतीय पर्यटकांसाठी जाचक असणाऱ्या एका अटीची घोषणा फेब्रुवारी २०२०मध्ये केली आणि एक ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी केली. ती म्हणजे, भारत, बांगलादेश आणि मालदीव या सार्क देशांतील पर्यटकांसाठी भूतानमधील मोफत प्रवेश बंद करून त्यांना येथून पुढे भूतानमध्ये जाण्यासाठी १२०० नुगुल्त्रूम (भूतानी चलन) किंवा १२०० भारतीय रुपये म्हणजेच आंतरराष्ट्रीय चलनात अंदाजे १५ अमेरिकी डॉलर एवढे पर्यटन शुल्क एका दिवसासाठी एका व्यक्तीस द्यावे लागणार आहे. हे शुल्क भारत, बांगलादेश आणि मालदीव या देशांतील नागरिकांसाठीच असणार आहे.

भूतानच्या या निर्णयावर टीका झाल्यानंतर भूतान सरकारने हे शुल्क केवळ ‘शाश्वत विकास आणि भूतानमधील पर्यावरणाचे संरक्षण यासाठी आकारलेले शुल्क’(Sustainable Development Fee and Preservation of Environment) अशी भूमिका घेतली. तसेच या तीन देशांव्यतिरिक्त जगातील इतर देशांतून भूतान मध्ये येणारा एक पर्यटक तर गेली अनेक वर्षे दिवसाकाठी २०० अमेरिकन डॉलर भरत आहे आणि त्यामुळे भूतानच्या आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यास मदत होत आहे. अर्थात एका दिवसाकाठी प्रत्येक व्यक्ती २०० डॉलर देऊन येणाऱ्या पर्यटकांना मग वेगळा खर्च करण्याची गरज नाही. या २००डॉलरपैकी ६५ डॉलर हे शाश्वत विकास शुल्कापोटी आकारले जातात. तुलनेने भारतीय पर्यटकांपेक्षा पाचपट जास्त पर्यटन शुल्क देऊन आंतरराष्ट्रीय पर्यटक भूतानमध्ये येत आहे. तेव्हा, त्यात वावगे काय? असा प्रतिप्रश्न भूतानने केला आहे. विशेष म्हणजे इतर देशातील नागरिकांना जिथे व्हिसासाठी ४० अमेरिकी डॉलर मोजावे लागतात, तिथे भारत,बांगलादेश आणि मालदीव या देशांतील नागरिकांना भूतानचा व्हिसा मोफत आहे. त्यात भूतानने बदल केलेला नाही. फेब्रुवारी २०२०मध्ये भूतान पार्लमेंटने ‘पर्यटन शुल्काचा’ घेतलेला निर्णय हा ‘शाश्वत विकासासाठी जमा होणारा निधी’ असे म्हटले तरी ती एकच बाजू सर्वसामान्यांना अवगत आहे. कारण या कठोर निर्णयापर्यंत भूतानला नेण्यासाठी आणखी काही घटना कारणीभूत आहेत, त्याचादेखील उल्लेख करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे हा निर्णय कोविडकाळ सुरू होण्यापूर्वीचा आहे हे दुर्लक्षून चालणार नाही...

१८-१९ ऑक्टोबर२०१९ रोजी ‘द भूतनीज’ या राष्ट्रीय वृत्तपत्रात मोठी बातमी झळकली. ती म्हणजे भारतीय पर्यटक असणाऱ्या १५ जणांच्या मोटारसायकलस्वार जथ्यातील एका मोटार सायकलस्वारास भूतान पोलिसांनी अटक करून त्याचा पासपोर्ट जप्त केला आहे. कारण काय तर या तरुणाने भूतान देशासाठी अतिशय पवित्र असणाऱ्या दोचू-ला पास (थीम्पू पासून २० कि मि अंतरावर) येथील हुतात्मा स्मारकावर चढून या सगळ्या घटनांचा व्हिडिओ चित्रित करून तो सामाजिक माध्यमावर टाकला. दोचू-ला चे महत्त्व भूतानसाठी ‘इंडियागेट’ आणि ‘गेट-वे-ऑफ इंडिया’ यापेक्षा कमी नाही. कारण सीमेलगत असणाऱ्या आसाममधील उल्फा आणि काही दहशतवादी व बंडखोर संघटना भूतानमध्ये घुसखोरी करून सीमेवर राहणाऱ्या निरपराध भूतानी नागरिकांना आपले सावज करीत आणि त्यात अनेक कुटुंबांचा बळी जात होता. अशा या अतिरेकी संघटनांशी झालेल्या चकमकीत १०८ भूतानी सैनिक हुतात्मा झाले आणि त्यांचे एक प्रतीक म्हणून दोचू-ला येथे हे हुतात्मा स्मारक उभे केले. या ठिकाणी भारतीय पर्यटकाने जाऊन एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केल्याचा आव आणत फोटो आणि व्हिडिओ चित्रण केले. रूढीप्रिय, परंपरावादी आणि सांस्कृतिक मूल्यांशी कोणतीही तडजोड न करता त्यांची जपणूक करणाऱ्या भूतानला ही घटना जिव्हारी लागली. परिणामी भूतानने पर्यटन शुल्काचा निर्णय घेतला. याची किंमत येथून पुढे भूतानमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांनाच मोजावी लागाणार आहे, हे तितकेच सत्य आहे.

भूतानमध्ये पर्यटक म्हणून येण्याचे प्रमाण सर्वात जास्त भारतातून आहे, याचे कारण म्हणजे भूतानमध्ये जाण्यासाठी विमान प्रवास, व्हिसा किंवा पासपोर्ट यापैकी कशाचीही आवश्यकता नाही. तसेच भूतानच्या चहुबाजूंनी भारतीय राज्यांची सीमा असल्याने सीमेवरील पर्यटकांसह इतरही राज्यांतून गेली तीन दशके दिवसाला पन्नास एक बसगाड्या भूतानमध्ये वावरताना दिसतात. ‘सार्क’चे सदस्य म्हणून बांगलादेश मालदीव येथील पर्यटकांना भूतानमध्ये मोफत प्रवेश होता. तरी ८०% पर्यटक हे भारतीय तर १५ टक्के बांगलादेशी असत. कारण १०० कि. मी.च्या आत बाहेर अंतरावर सिलीगुडी मार्गे बांगलादेश-भूतान सीमा आहे. तसेच सिल्हेट-मेघालय-असाम-जयगाव असादेखील प्रवास बांगलादेशी पर्यटक करतात.

मालदीव समुद्राच्या एका टोकाला असल्यामुळे त्यांना भूतानमध्ये येणे तसे व्यावहारिक नाही भूतानपर्यंत पोहोचणे खर्चिक पडते त्यामुळे त्यांचे प्रमाण अत्यल्प असे. परिणामी भूतानला या निर्णयापर्यंत कारणांची सुई निश्चित भारतीय पर्यटकांच्या दिशेने वळताना दिसते असे खेदाने म्हणावे लागेल. भूतान हा शांतताप्रिय आणि त्यांच्या हजारो वर्षांच्या परंपरांना जपणारा देश आहे. क्षणाक्षणाला निसर्गाचे एक आगळे वेगळे रूप, चित्र तेथे अनुभवयास येते. बौद्ध धर्मामुळे भूतानच्या नागरी समाजात भारताबद्दल अतीव आदर आहे. आर्थिक आणि सामरिक सक्षमतेसाठी (डोक्लाम) सर्वतोपरी भारतावर अवलंबून असणारा भूतान भारतीय पर्यटकांबाबत अशी टोकाची भूमिका का घेतो, याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. या निमित्ताने खरे तर भारतात पर्यटनसंस्कृती विकसित होण्याच्या गरजेवर चर्चा व्हायला हवी. त्यात सार्वजनिक शिस्तीपासून ते सौंदर्यजाणीवांपर्यंत अनेक पैलूंचा अंतर्भाव असायला हवा. हे सगळे केवळ बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठीच नाही तर भारतातील पर्यटनउद्योग विस्तारण्यासाठीदेखील आवश्यक आहे.

(लेखक ‘जेएनयू’मध्ये आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्रात प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com