भाष्य : कामगारांचे हितकर्ते राजर्षी

शाहू छत्रपती स्वतःला अगदी अभिमानाने शेतकरी किंवा मजूर कष्टकरी म्हणवून घेण्यात धन्यता मानताना आढळून येतात.
Rajashri Shahu Maharaj
Rajashri Shahu MaharajSakal

समाजातील कष्टकरी, कामगार आणि शोषित, पीडित यांच्याविषयी शाहू छत्रपतींना आंतरिक कळकळ होती. या घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी कृतीशील आदर्श घालून दिला. राजर्षी शाहूंच्या आजच्या (ता.२६) जयंतीदिनी त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा.

शाहू छत्रपती स्वतःला अगदी अभिमानाने शेतकरी किंवा मजूर कष्टकरी म्हणवून घेण्यात धन्यता मानताना आढळून येतात. कानपूर येथील अखिल भारतीय क्षत्रियांच्या सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना १९एप्रिल १९१९रोजी ते म्हणाले होते, ‘‘मी तुमच्यापैकीच आहे, मला मजूर अगर शेतकरी समजा. माझे वाडवडील हाच धंदा करीत होते. जे काम माझे पूर्वज करीत होते तेच काम करणाऱ्या लोकांचा अध्यक्ष होण्याकरीता मला आज बोलाविले आहे, याबद्दल अत्यानंद होत आहे.’’

घाम गाळून आपला जीवननिर्वाह चालविणाऱ्या वर्गाबद्दल अपार करुणा आणि जिव्हाळा असणाऱ्या शाहूराजेंच्या उक्ती आणि कृतीमध्ये नेहमीच कमालीची एकवाक्यता दिसते. राजवाड्यापेक्षा दीनदुर्बलांच्या झोपड्यांमध्ये शाहू छत्रपतींचा जीव अधिक गुंतलेला दिसतो. दरबारामधल्या मानकऱ्यांपेक्षा राबणाऱ्या मजुरांची सर्व हारांची काळजी घेणे, राबणाऱ्यांचे जीवन अधिक सुखसमाधानाचे करणे यामध्ये त्यांना अधिक स्वारस्य होते. या संदर्भात त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आणि कष्टकऱ्यांसाठी केलेले काही कायदे केवळ प्रातिनिधिक उदाहरणे म्हणून लक्षात घेता येतील.

कोल्हापूर संस्थान आणि आजूबाजूच्या प्रदेशात गुऱ्हाळामध्ये उसाचे रस काढण्यासाठी लोखंडी घाणा वापरत. अनेकदा त्यावर काम करताना मजुरांचे अपघात होत, जबर दुखापत व्हायची. काही वेळा बोटेही गमवावी लागत, म्हणून शाहू छत्रपतींनी राज्यकारभार हाती घेऊन वर्ष होण्याआधीच, २९ मे १८९५ रोजी दरबारामार्फत पुढील जाहिरात प्रसिद्ध केलेली होती. ‘‘घाण्यामध्ये हात सापडणार नाही, अगर सापडलाच तर त्यास इजा होणार नाही, अशा तऱ्हेची त्यात काही यांत्रिक युक्ती तारीख १जानेवारी १८९६च्या आत कोणी शोधून काढल्यास ज्याची युक्ती सोपी, थोडक्या खर्चात होणारी पसंत अशी ठरेल त्यास चांगले बक्षीस देण्यात येईल’’.

हाताला काम, घामाला दाम

१८९६-९७ मध्ये कोल्हापूर प्रदेशातल्या दुष्काळात ७५मैलांचे रस्ते करून घेऊन शाहू छत्रपतींनी कदाचित महाराष्ट्रातील पहिली रोजगार हमी योजना राबवणाऱ्या हातांसाठी कार्यवाही करून दुष्काळग्रस्त लेकुरवाळ्या बायाबापड्यांना मदतच केली. त्यांच्या मुलांच्या कामाच्या ठिकाणी सांभाळासाठी खास शिशुगृहे उघडण्यासही ते विसरले नव्हते. भारतात ब्रिटिश सरकारने अपघातात सापडून शारीरिक इजा झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्वरुपात नुकसानभरपाईचा सविस्तर कायदा १९२३ मध्ये लागू केला; परंतु त्याही आधी २९जून १९०१रोजीचा करवीर सरकारचा, खाणीतल्या कामगारांच्या कामाची परिस्थिती आणि वेतन पद्धती याबाबत सविस्तर माहिती मालकांनी पाठवावी म्हणून प्रसिद्ध केलेला वटहुकूम उपलब्ध आहे. त्यामध्ये खाणकामगारांच्या अपघातांची माहिती देण्याची सक्ती केलेली दिसते.

लहान-मोठ्या हॉस्पिटलमधून डॉक्टरांच्या बरोबरीने काम करणाऱ्या परिचारिका अजूनही उपेक्षित आहेत. शाहू छत्रपतींनी ४जानेवारी १९१७रोजी या परिचारिकांचा मेहनताना कसा द्यावयाचा यासंबंधी सविस्तर ठराव केलेला आढळतो. त्यामध्ये नर्सेसना थांबवून घेतल्यास जेवण व इतर वस्तू दिल्या पाहिजेत, हे जसे नमूद केले आहे, तसे परिचारिकांनी बक्षिसे घेण्यासाठी भांडण करण्याचे नाही, हेही सांगितले आहे! महात्मा फुले यांचे बिन्नीचे शिलेदार असणारे भारतातील कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे आणि शाहू छत्रपतींचा परस्पर परिचय होता की नाही, याबाबत इतिहास काही बोलत नाही; परंतु मुंबईमध्ये १८९३-९४ मध्ये झालेली हिंदू-मुस्लिम दंगल शांत करून दोन्ही धर्मांच्या लोकांमध्ये सलोखा निर्माण करण्यात लोखंडे यांचा पुढाकार होता. शाहूराजे कोल्हापूरच्या गादीवर बसल्यानंतर पुण्यात सार्वजनिक सभेने त्यांचा जो सत्कार केला, त्यास उत्तर देताना मुंबईमधील हिंदू-मुस्लिम दंगल मिटविण्यासाठी दोन्ही धर्मांच्या नेत्यांना ते कळकळीची विनंती करतात, असे अनुमान केले तर ते चुकणार नाही, असे वाटते. लोखंडे यांच्या मृत्यूनंतर म्हणजे १८९७मध्ये मुंबईच्या कामगारांचे नेतृत्व लोकहितकर्ते सी. के. बोले यांच्याकडे आले. त्यांच्या जोडीला बहुजनी आद्य शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळुसकर, हरिश्चंद्र तालचेकर, भिवाजी रामजी नरे, शिवराम वामन पाटील आदी कामगार नेते होते. त्यांच्याच सहकार्याने बोले यांनी १९०९ मध्ये ‘कामगार हितवर्धक सभे’ची स्थापना केली होती. या संस्थेशी शाहू छत्रपतींचा संबंध आला. यातील हरिश्चंद्र तालचेकर हे कोल्हापूर शाहू मिलचे मुंबईचे प्रतिनिधी होते.

शाहू छत्रपती अभ्यासू वृत्तीने युरोपमधील कामगार चळवळीवर लक्ष ठेवून होते. इंग्लंडसारख्या देशात राजेशाही कारखानदार पद्धतीला म्हणजेच भांडवलशाहीला पाठिंबा दिला असताना शाहू छत्रपती मात्र कामगारांच्या बाजूने उभे असल्याचे दिसतात. त्यांचे आणि बोले यांची मैत्री वाढल्याचेच दिसते. बोलेंच्या संयमी, संघर्षवादी नेतृत्वाखाली ‘कामगार हितवर्धक सभे’चे कार्य जोमाने सुरू होते. १० नोव्हेंबर १९१८ रोजी त्यांनी परळमध्ये कामगारांची सभा बोलावली होती. त्याला १०हजार कामगार व इतर मागासवर्गीय हजर होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कामगारांसंबंधी व्यापक विवेचन केले होते. ते पुढीलप्रमाणे- ‘‘मुंबई शहर हे व्यापार व उद्योगधंदा याबाबतीत सुप्रसिद्ध आहे. धनिकांचे भांडवल व कारखानदारांचे व्यवस्थापन चातुर्य यावरच हा व्यापार व उद्योगधंदा अवलंबून आहे, अशी आजपर्यंत इकडच्या प्रांती समजून होती.

पाश्चात्य देशात भांडवलवाले व मजूर असे दोन वर्ग आहेत. तिकडेही भांडवलदार लोकांची मजूरदार लोकांवर बेसुमार सत्ता चालते; पण आता मजूरदार लोकांनी आपले संघ बनविले आहेत. गवताच्या एकेका काडीची ताकद जास्त नसते; पण अशा अनेक काड्यांचा वेठ वळला तर त्याने हत्तीलाही बांधता येते. मजूरदार लोकांना विलायतेत मजुरी वाढवावी एवढ्याकरीताच झगडावे लागते. तेथील समाजामध्ये कोणत्याही दर्जास पोहचण्यास जन्मसिद्ध अडचणी मुळीच नाहीत. त्यामुळे ते उच्च वर्गात सहज रीतीने मिसळतात. तशी स्थिती आमच्या इकडे नाही. विलायतेत मजूरदार लोकांच्या संघांना बरेच महत्त्व आले आहे. पार्लमेंटसारख्या संस्थात व प्रधान मंडळात त्या लोकांतीलच प्रतिनिधी शिरले असून ते आपल्या वर्गाच्या हिताचे योग्य रीतीने संरक्षण करीत आहेत.’’

मजुरांच्या उन्नतीची तळमळ

पुढे ते सांगतात, ‘‘आपल्या मुलाबाळांस शिक्षण देऊन, आपले आरोग्य वाढविण्याचे प्रयत्न करून आपली उन्नती आपणच करून घेतली पाहिजे. दुसरा आपल्याकरिता काही करील, अशी अपेक्षा करणे केव्हाही कमीपणाचे आहे ही गोष्ट अहर्निशी लक्षात ठेवा’’. परळमधील यशस्वी सभेनंतर शाहू छत्रपतींच्या विनंतीनुसार बाबासाहेब बोलेंनी लोकसंघ (People`s Union) या संस्थेची स्थापना करून त्याचे कार्यवाह झाले. त्यांच्या जोडीला रामचंद्र विठ्ठल वंडेकर, परशरामराव शिंदे, दामोदर सावळाराम यंदे, भास्कर जाधव, हरिश्चंद्र तालचेरकर आदी बहुजन समाजातील नेते काम करीत होते. मागास वर्ग आणि कामगार वर्गाची आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक अशी सर्वांगीण प्रगती साधणे हाच लोकसंघाचा प्रमुख उद्देश होता.

शाहू छत्रपतींनी या लोकसंघाला ५००० रुपयांची देणगी जाहीर करून, त्यापैकी १००० रुपये बोले यांच्याकडे लगेच सुपूर्द केले होते.१९१८चा नोव्हेंबर महिना शाहू छत्रपतींचा मुंबई येथेच मुक्काम होता. ते कामगारांत मिळून-मिसळून त्यांच्याशी सुसंवाद करीत होते. याच महिन्याच्या २४ तारखेला ‘लोकसंघा’च्या स्थापनेनंतर मुंबईमध्ये ग्रँट रोडवर शाहू छत्रपतींची कामगार आणि मागासवर्गीयांना मार्गदर्शनासाठी दुसरी सभा झाली. त्यामध्ये भारतीय कामगारांना ते संघटित होण्याचे कळकळीचे आवाहन करताना दिसतात. ‘‘येथे इंग्लंडप्रमाणे मजुरांचे संघ झाले पाहिजेत व सर्वांस हक्क काय आहेत ते कळले पाहिजेत. भांडवलवाल्यांत ब्राह्मण व वैश्य वृत्तीच्या लोकांचा भरणा विशेष आहे. त्यांना दाबात ठेवल्याशिवाय मजुरांची उन्नती होणे कठीण आहे.’’ थोडक्यात, शाहू छत्रपती आणि लोकहितकर्ते बोले या उभयंतांमध्ये दिवसेंदिवस सहकार्य वाढलेलेच दिसते. शाहू छत्रपतींनी हाती घेतलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला बाबासाहेब बोले जसा मनःपूर्वक सक्रिय पाठिंबा देत होते, तसे शाहू छत्रपती बोले यांच्या कामगार-कल्याण चळवळीत प्रत्यक्ष सहभागी होत होते. त्यामधून त्यांचे कामगार वर्गासंबंधी असणारे प्रेम दिसून येत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com