भाष्य : शाश्वत उत्तरांचे ‘डिझाइन थिंकिंग’

रोजच्या जगण्यातील प्रश्नांपासून समाज व जगापुढील जटील समस्यांपर्यंत प्रत्येक विषयावर तात्पुरते मार्ग शोधण्याऐवजी शाश्वत उपाययोजनांसाठी अलीकडे कल वाढू लागला आहे.
design thinking concept
design thinking conceptsakal

- डॉ. रवींद्र उटगीकर

रोजच्या जगण्यातील प्रश्नांपासून समाज व जगापुढील जटील समस्यांपर्यंत प्रत्येक विषयावर तात्पुरते मार्ग शोधण्याऐवजी शाश्वत उपाययोजनांसाठी अलीकडे कल वाढू लागला आहे. ‘डिझाइन थिंकिंग’ ही संकल्पना त्याचा आधार ठरू लागली आहे. आर्थिक परतावा किंवा व्यावसायिक यश नव्हे, तर मानवकल्याणाच्या गरजा आणि ग्राहकानुभूती केंद्रस्थानी असणाऱ्या या संकल्पनेचा मागोवा.

जे विचार प्रश्न जन्माला घालतात, ते त्यांवरील उत्तर देऊ शकत नाहीत.

- अल्बर्ट आइनस्टाइन

कोणताही व्यवसाय कशासाठी केला जातो? संभाव्य ग्राहकाच्या व्यक्त-अव्यक्त गरजांना प्रतिसाद देणारे एखादे उत्पादन किंवा सेवा पुरवून उत्पन्नाची निश्चिती करायची आणि त्यातून नफा कमवायचा, हे प्रत्येक उद्योग-व्यवसायाचे गणित असते. परंतु, अलीकडील काळात या व्यावसायिक उद्देशाला सामाजिक किनार लाभू लागली आहे. पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय कार्यव्यवस्थापन (एनव्हायरन्मेंटल सोशल गव्हर्नन्स – इएसजी) ही संकल्पना व्यवसाय संचालनाच्या गाभ्याशी संवेदना आणि प्रयोजन यांनाही मोलाचे स्थान देत आहे.

जास्तीत जास्त नफा (प्रॉफिट) मिळावा, या उद्देशाने पारंपरिक पदधतीच्या आणि कमी खर्चिक उत्तरांऐवजी समाज (पीपल) आणि भवताल (प्लॅनेट) यांचाही समतोल ठेवणारी उत्तरे ग्राहक पसंत करत आहे. ग्राहक, कर्मचारी यांसह सर्व घटकांच्या हिताचा विचार करणाऱ्या आणि त्यावर आधारित उत्पादने व सेवांमधून शाश्वत उपाय योजणाऱ्या या विचाराला ‘डिझाइन थिंकिंग’ म्हणून अधिकाधिक मान्यता मिळू लागली आहे.

ऐंशीच्या दशकात उत्पादन उद्योगामध्ये सर्वसमावेशी गुणवत्ता व्यवस्थापन (टोटल क्वालिटी मॅनेजमेंट) ही संकल्पना अंगीकारण्यात आली होती. गुणवत्ता सुधार प्रक्रियेत कामगारांपासून सर्वांचे विचार आणि कृती प्रतिबिंबित होण्यात त्यातून यश मिळाले होते. आता पुन्हा एकदा जग उद्योग-व्यवसाय जगत नावीन्याचा ध्यास घेत आहे. त्याला धार देण्याची आणि परिणाम साधण्याची क्षमता ‘डिझाइन थिंकिंग’मध्ये आहे.

यामधून काय साधले जाते? उत्पादनांची पारंपरिक संरचना (डिझाइन टू व्हॅल्यू - डीटीव्ही) ही उत्पादनाचे प्रयोजन आणि ग्राहकाची सोय यांवर बेतलेली असते. उत्पादनाची उपयुक्तता आणि त्याची किंमत यांची त्यात सांगड घातली जाते. परंतु संरचनेचे हे प्रारूप ग्राहकानुभूतीवर (यूजर एक्स्पीरिअन्स) नव्हे, तर व्यावसायिक गणितांवर बेतलेले असते. ‘डिझाइन थिंकिंग’मध्ये मात्र उत्पादनाच्या प्रयोजनाला ग्राहकाची जीवनशैली आणि वापरण्यातील सहजानुभव यांचीही जोड दिली जाते.

उत्पादनांचा असा विचार करण्याच्या प्रक्रियेतून (डिझाइन फॉर व्हॅल्यू अँड ग्रोथ - डी४व्हीजी) उत्पादनखर्च वाढणे संभव असते. परंतु ग्राहक अशा कंपनीशी कायमचा जोडला जाण्याची शक्यताही निर्माण होते. मॅकिन्सी या जगप्रसिद्ध सल्लासंस्थेने तयार केलेल्या;‘द बिझनेस व्हॅल्यू ऑफ डिझाइन’ या अहवालानुसार, ‘डिझाइन थिंकिंग’च्या आघाडीवर उत्तम कामगिरी करणाऱ्या उद्योगांना उत्पन्न आणि गुंतवणूकदारांसाठीचा परतावा या दोन्ही आघाड्यांवर स्पर्धकांच्या दुप्पट मजल मारता येते.

उत्पादनविकासाची ही प्रक्रिया सरधोपट वाटेने न जाणारी आणि पुनरावृत्तीक्षम अशी आहे. तीमध्ये पाच टप्प्यांत उत्पादनविकास साधला जातो.

१. ग्राहकानुभूती : यामध्ये ग्राहकाच्या गरजांचा अभ्यास केला जातो. त्यातून आपल्या उत्पादनासाठीचा संभाव्य ग्राहक आणि त्याच्या गरजा यांची नेमकी माहिती त्यांना होते.

२. गरजनिश्चिती : पहिल्या टप्प्यात संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण करून ग्राहकाची समस्या आणि त्याची गरज निश्चित केली जाते. त्यातून त्या उत्पादनाचा तोंडवळा, प्रयोजन आणि वैशिष्ट्ये ठरवण्यासाठी संकल्पकांना अधिक संधी मिळते.

३. कल्पनावकाश : ग्राहकाची गरज किंवा समस्यांच्या निराकरणासाठी कल्पनांच्या अवकाशातून हरतऱ्हेचे पर्याय समोर येऊ दिले जातात. त्यांच्या छाननीतून काही कल्पनांची अधिक विचारासाठी प्राथमिक निवड केली जाते.

४. प्रतिकृती : प्राथमिक पर्यायांच्या कमी खर्चिक प्रतिकृती तयार केल्या जातात. संकल्पकांच्या संचात आणि त्याच्या बाहेरील व्यक्तींनाही त्या देऊन चाचण्या घेतल्या जातात. त्या अनुभवाच्या आधारे, संबंधित उत्पादन स्वीकारायचे, सुधारायचे की नाकारायचे, याचा निर्णय घेतला जातो.

५. अंतिम चाचणी : प्रतिकृती चाचणीच्या टप्प्यातून पुढे आलेल्या उत्कृष्ट पर्यायांच्या आधारे विकसित केलेल्या संपूर्ण उत्पादनाची काटेकोर चाचणी व मूल्यमापन केले जाते. गरजेनुसार एक पाऊल मागे जाऊन पुन्हा आधीच्या टप्प्यांतील कसोट्या लावल्या जातात.

हे पाच टप्पे नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीप्रक्रियेला रचनात्मक स्वरूप देतात. प्रत्येक टप्प्याच्या अखेरीस काय साध्य व्हायला हवे, हे लक्ष्य त्यामुळे समोर ठेवता येते. पूर्वग्रह आणि कुहेतूंचे अडसर त्यातून अलगद दूर करता येतात. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उद्योगात डिझाइन थिंकिंगचा आधार घेतल्याची उदाहरणे अलीकडे ठळकपणे दिसू लागली आहेत. अॅपल कंपनीने २००७मध्ये मोबाइल बाजारपेठेत प्रवेश केला.

तेव्हापासून सातत्याने ग्राहकानुभूती हा निर्मितीचा केंद्रबिंदू ठेवताना ही कंपनी नवी वैशिष्ट्ये आणि नवे ग्राहक जोडत आपली श्रेणी उंचावत राहिली आहे. ‘ओरल बी’ हे याचे आणखी एक उदाहरण. आपल्या इलेक्ट्रिक टूथब्रशचे चार्जिंग प्रवासात असतानाही करण्याची सोय आणि टूथब्रशचा मंजनासाठीचा शिरोभाग बदलण्याची वेळीच नोंदणी कंपनीकडे करण्यासाठी ते फोनशी जोडण्याची सोय कंपनीने केली आहे.

या दोन्ही नव्या सोयींना ग्राहकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नेटफ्लिक्सचेही उदाहरण याच अनुषंगाने देता येईल. ही कंपनी उदयाला येत होती, तेव्हा ब्लॉकबस्टर ही भाड्याने व्हिडिओ, व्हिडिओ गेम उपलब्ध करणारी आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण करणारी अमेरिकी कंपनी या क्षेत्रात प्रस्थापित होती. परंतु नेटफ्लिक्सने ही सोय घरबसल्या उपलब्ध करून दिली आणि आता हे नाव ओव्हर द टॉप (ओटीटी) मनोरंजन क्षेत्रात शिखरावर पोचले आहे.

समाजहितासाठी डिझाइन थिंकिंग

उत्पादने वा सेवांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात सर्व संबंधित घटकांचे शाश्वत हित साधणे हा डिझाइन थिंकिंगमागील विचार आहे. संबंधित संस्था सेवाभावी असो की व्यावसायिक, ती खासगी असो की सार्वजनिक, प्रत्येकाला हा विचार आत्मसात करता येणारा आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्नांचीही मुळापासून उकल करून नवे सामाजिक रिवाज प्रस्थापित करण्याची क्षमता या प्रक्रियेत आहे.

ऑनलाइन आरोग्यसल्ला, आभासी स्वयंसेवा, दूरस्थ शिक्षण, कल्याणकारी लोकनिधी (क्राऊड फंडिंग) अशा अनेक कल्पना त्यामुळे वास्तवात आल्या आहेत. समस्यांचे निराकरण स्थानिक गरजांनुरूप करण्याची लवचिकता डिझाइन थिंकिंगची प्रक्रिया देते.

उष्णतेच्या लाटांपासून अचानक होणाऱ्या अतिवृष्टीपर्यंत आणि वादळांपासून वणव्यांपर्यंतच्या नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. आर्थिक फटका, जीवितहानी आणि पायाभूत सोयींचे नुकसान अशा स्वरूपांत ग्रामीण भागांत त्याची झळ अधिक सोसावी लागते. अशा हवामान बदलांच्या धोक्यांपासून संरक्षण कसे करायचे किंवा त्या बदलांना रोधक उपाय कसे करायचे, याचा विचार म्हणजे ‘डिझाइन थिंकिंग’च म्हणावे लागेल.

पर्यावरणरक्षण आणि ऊर्जासुरक्षा या संपूर्ण जगाच्या गरजा झाल्या आहेत. त्याजोडीला ग्रामीण विकास आणि मजुरांचे शहरांकडील स्थलांतर या भारतापुढील जटील समस्या आहेत. त्यांवरील उत्तरे शोधणे हा आपण विकसित देश होण्याचे स्वप्न साकारण्याचा मार्ग ठरू शकतो. डिझाइन थिंकिंगचा आधार घेऊन ते साध्य होऊ शकते.

शेतमालापासून विविध पर्यावरणस्नेही उत्पादने तयार करणे आणि जैवशोधन प्रकल्पांचे (बायोरिफायनरी) देशभर जाळे उभारून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा भक्कम करणे हे डिझाइन थिंकिंगद्वारे साधता येऊ शकते. आपल्या सर्वांना वैयक्तिक आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीही डिझाइन थिंकिंगची संकल्पना मोलाची साथ देऊ शकते.

साचेबद्ध विचारांच्या पलीकडे जाऊन, अन्य कोणी विचारत नसलेलेही प्रश्न विचारण्याची तयारी ठेवून आणि एखाद्या प्रश्नाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित करून आपण प्रत्येक जण हा मार्ग चोखाळू शकतो.

(लेखक प्राज इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष असून, उद्योग क्षेत्रात गेली तीन दशके कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com