कोकणातील ‘सत्यशोधक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satyashodhak Weekly
कोकणातील ‘सत्यशोधक’

कोकणातील ‘सत्यशोधक’

रत्नागिरी येथील `सत्यशोधक’ साप्ताहिकाचा १५० वा वर्धापनदिन पत्रकारदिनी- सहा जानेवारीला साजरा होत आहे. त्यानिमित्त या नियतकालिकाच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप.

रत्नागिरीतील चार पिढ्यांनी सांभाळलेला पत्रकारितेचा वारसा विलक्षण आहे. हरि नारायण लिमये यांनी इ.स.१८७१मध्ये स्थापन केलेल्या `सत्यशोधक’ या साप्ताहिकाचा साजरा होत असलेला दीडशेवा वर्धापनदिन ही या वाटचालीतली सुवर्णखूण. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते हे प्रामुख्याने शिक्षक, वकील, संपादक किंवा एकाच वेळी या तिन्ही भूमिका निग्रहाने पार पाडणारे होते. अशा विद्वान देशभक्तांनी सुरू केलेली नियतकालिके ही आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी पोषक वातावरण तर तयार करत होतीच, पण त्याचबरोबर स्वकीयांचे प्रबोधन साधत होती. एकाच वेळी संघर्ष, प्रबोधन आणि विकासाची दृष्टी ठेवून कार्यरत असलेल्या अशा नियतकालिकांची कर्ती-धर्ती मंडळी आणि त्यातील लेखक-वाचक देखील कृतीशील विचारवंत होते, आचारवंत होते.

गोळप (रत्नागिरी) इथल्या मराठी शाळेत त्यावेळी मास्तर म्हणून कार्यरत असलेले हरि लिमये हे त्यापैकीच एक. उत्तम गणित शिकवणारे लिमये मास्तर पुढं त्याच शाळेचे हेडमास्तर झाले. या दरम्यान त्यांनी लिहिलेल्या `त्रैराशिक संग्रह’ या पुस्तकाला प्रतिसाद लाभला. त्यांनी हेडमास्तरकी सोडून `सत्यशोधक प्रिंटिंग प्रेस’ आणि सत्यशोधक साप्ताहिक सुरू केले. ते आता लोकशिक्षक झाले. हरि लिमये यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव कृष्णाजी, पुढे त्यांचे कनिष्ठ बंधू दत्तात्रय, त्यानंतर बाळासाहेब लिमये यांनी `सत्यशोधक’ची जबाबदारी सांभाळली. विष्णू माधव ऊर्फ बाळासाहेब लिमये यांचा सरकारदरबारी वेगळाच दरारा होता. त्यामुळे टिळक आळीतील `सत्यशोधक’चे कार्यालय म्हणजे सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीचा`जनता दरबार’ असे. या साप्ताहिकासह सामाजिक कार्य करताना झालेली आर्थिक ओढाताण पाहून बाळासाहेबांच्या पत्नी इंदिराबाईंनी आपलं `स्त्रीधन’ गहाणवट ठेवून त्यांना संकटकाळात मोलाची साथ दिली.

केवळ नियतकालिक नव्हे, चळवळ

१८७१ ते १९३७ अशी ६६ वर्षे `सत्यशोधक’ने लढवय्येपणाची, चळवळीची भूमिका समर्थपणे पार पाडली. १९३५ ते १९६० पर्यंत तळकोकणात दैनिक वृत्तपत्रं नव्हती. त्यावेळी `सत्यशोधक’ आठवड्यातून दोनदा प्रकाशित होत असे.

हस्तलिखिताच्या स्वरूपात सुरूवातीचे अंक प्रकाशित झाले. पुढील काळात शिळा, खिळा आणि संगणकीय छपाई अशी प्रदीर्घ तांत्रिक परिवर्तने अनुभवली. १६ मे १९३७ ला स्वातंत्र्यवीर सावरकरांची ब्रिटिश सरकारने सुटका केल्यानंतर अवघ्या वीस मिनिटांत `सत्यशोधक’ने खास आवृत्ती प्रकाशित करून वाचकांना दिली होती, हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. पुढच्या काळात `सत्यशोधक’चे काही जहाल अग्रलेख पाहता ते सावरकरांनी लिहिलेले असावेत असे काही वाचकांचे म्हणणे आहे. राजकीय, सामाजिक विषयांबरोबरच शेती, उद्योग, व्यापार क्षेत्रातील घडामोडींचे प्रतिबिंब `सत्यशोधक’ च्या अंकांमधून दिसून येते. याशिवाय प्रचलित प्रश्नांवरील निर्भीड अग्रलेख, स्थानिक बातम्या, स्फूट लेख, बाजारभाव आणि प्रादेशिक घडामोडीही त्यात असत.

हरि लिमये, दत्तोपंत लिमये, सदूभाऊ पालकर, नारायण विष्णू शितूत (वकील), श्री. वि. लिमये, दादासाहेब महाजन, माजी खासदार श्‍यामराव पेजे आणि सध्या नितीन लिमये अशी `सत्यशोधक’च्या संपादकांची परंपरा आहे. `सत्यशोधक’ साप्ताहिक आणि छापखान्याबरोबरच १९५५ मध्ये बाळासाहेब लिमये यांनी `रत्नागिरी वृत्तसंस्था’ या नावाची वृत्तवितरण संस्था सुरू केली होती. त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील पत्रकारांना वृत्तलेखनाचे प्रशिक्षण मिळाले. ‘कोकणवासियांचा संघर्ष, त्यांच्या आशा-आकांक्षा, त्यांचे प्रश्न, बदलतं कोकण या साऱ्याचा वेध घेत वाटचाल करणार्‍या `सत्यशोधक’चा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी विशेषांकही `पत्रकार दिना’च्या निमित्ताने सहा जानेवारीला प्रकाशित होत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial Article
loading image
go to top