या जगण्यावर... : कधी बहर कधी शिशिर 

या जगण्यावर... :  कधी बहर कधी शिशिर 

जन्मापासूनच आपल्याला कळत-नकळत जाणीव होत जाते पृथ्वीमातेची- जलावरण आणि वातावरणात लपटलेल्या शिलावरणाची आणि त्यातील वैविध्याने नटलेल्या जीवावरणाची! पृथ्वीमातेचे अस्तित्वच गूढ. ‘बिग बॅंग’ नामक स्फोटातून निर्माण झालेले अथांग विश्व. स्फोट म्हणजे विध्वंस आलाच. मात्र त्यातून निर्माण झाली स्वतःच्याच तालात स्वतःभोवती गिरक्‍या घेत घेत सूर्यदेवतेला प्रदक्षिणा घालणारी, अखंड साधनेचे प्रतीक अशी, लयबद्ध पृथ्वीमाता. या साधनेतूनच साकारत गेली जल, खडक, ऋतु अशी चक्रे. त्यापैकी  दाहकतेची जाणीव करून देणारे वसंत - ग्रीष्म, जलचक्राची अनुभूती देणारे  शरद - वर्षा, तर गारव्याने सुखावणारे हेमंत आणि शिशिर असे ऋतूंचे आविष्कार. ‘कधी बहर कधी शिशिर’ या न्यायाने कधी झाडाझुडपांची पाने झडणार, तर कधी फळाफुलांनी बहरू लागणार. ग्रीष्मात तहानलेले मृदावरण वरुणराजाच्या शिडकाव्याने रोमांचित होऊन आसमंतात मृद्‌गंध पसरवणार. अशावेळी दडून बसलेल्या सरपटणाऱ्या सजीवांची, आकाशात भरारी घेणाऱ्या रंगीबेरंगी पक्ष्यांची लगबग दिसणार, त्यानंतरच्या हेमंतात. 

जलचक्र हा ऋतू चक्रातच सामावलेला, पण स्वतःचे वेगळेपण जपणारा आविष्कार. सागरी जलपृष्ठाचे होणारे बाष्पीभवन, त्यातून निर्माण होणारे ढग, ते वाऱ्यामार्फत ते भूपृष्ठाकडे ढकलले जाणे, डोंगराच्या परिसरात त्यांचे बरसणे आणि नदीनाल्यांच्या प्रवाहातून पुनश्‍च सागरात समाविष्ट होणे असे हे अव्याहत चालणारे अविनाशी चक्र. त्याच्या प्रतीक्षेत समग्र सजीव. त्यात थोडाही अडथळा आला की त्याची झळ बसणार सर्वांनाच.

हे खरं असलं तरी सजीवांचे अस्तित्व असलेल्या शिलावरणात सामावलेले खडक चक्र, जे पूर्णत्वास जाण्यास कोठे लाखो, तर कोठे कोट्यवधी वर्षे उलटावी लागतात ते, मात्र निर्जीव भासते. कारण ज्वालामुखीच्या उद्रेकातून जन्मलेले अग्नीज खडक, वातावरणीय घटकांमुळे त्यांचे होणारे विघटन आणि त्यातून निर्माण होणारे वाळूश्‍म, तसेच रूपांतरित खडक; भूमातेच्या पोटात कोठे एकवटलेले ऊर्जास्रोत, तर कोठे लोखंड, सोन्या-चांदीसारखे धातू हे सारं मानवाला उपभोगण्यासाठी. त्यातूनच धावणार वाहने, उभ्या राहणार इमारती आणि हव्याहव्या वाटणाऱ्या भौतिक भूक भागविणारे दागदागिन्यासारखे ऐवज. शिलावरणावरचे मृदावरण म्हणजे वसुंधरेचे वस्त्र, तर भूजल दूधासमान! याच आवरणावर वेळोवेळी नांगर फिरणार, बिया पसरणार, त्यावर भूजल शिंपडणार, त्यातून अन्नधान्य, फळे, भाज्या मिळणार आणि त्यावर समग्र सस्तन जगणार. शिलावरण असो, जलावरण किंवा वातावरण. या आवरणांमध्ये गुंफलेली अशी चक्रे अव्याहतपणे फिरत आहेत म्हणून तुमचे-आमचे अस्तित्व. या चक्रांची सर्जनशीलता इतकी की त्यातून निर्माण झालेल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेताना प्रत्येकाला आपापल्यापरीने व्यक्त होण्याची ऊर्मी येणारच. म्हणूनच पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणांकडे पाहून कुसुमाग्रजांना ‘प्रेमगीत’ सुचले, तर गदिमांना सागरामध्ये समर्पित होऊन पुनश्‍च डोंगराकडे जातानाची नदी ‘माहेरवाशीण’ म्हणून भावली. मृदावरणाकडे पाहून बहिणाबाईंना पेरलेलं बियाणं मातीत निजलेलं दिसलं, तर ना. धों.ना ‘माझ्या कवितेला यावा मातीचा सुगंध’ असं व्यक्त व्हावंसं वाटलं. डॉ. नारळीकरांनाही आपल्या गहन संशोधनाचा आशय ‘आकाशाशी जडले नाते’ अशा काव्यमय शब्दांत गुंफावसा वाटला. ‘होमो सेपियन’ अर्थात मानव अस्तित्वात आला केवळ ५० हजार वर्षांपूर्वी! साहजिकच विश्वाच्या पसाऱ्यातील ‘पृथ्वी’वर तुम्ही- आम्ही अगदी नवीन आणि नगण्य! मात्र विविध चक्रांच्या लीला अनुभवायचं भाग्य पुढच्या पिढीलासुद्धा मिळत आहे. आपली वंशवेलीही आगळ्या चक्राचाच आविष्कार आहे ही जाणीव किती सुखद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com