भविष्यवेध : पृथ्वीविज्ञानाचे वाढते मोल

बिगबँग नामक महास्फोटातून निर्माण झालेल्या अथांग विश्वाच्या रचनेतील मोहमयी पृथ्वीचे वय तब्बल साडेचार अब्ज वर्षे!
Earth
EarthSakal
Summary

बिगबँग नामक महास्फोटातून निर्माण झालेल्या अथांग विश्वाच्या रचनेतील मोहमयी पृथ्वीचे वय तब्बल साडेचार अब्ज वर्षे!

पुढील काळात संशोधनाचा कल वेगवेगळ्या सेन्सर्सद्वारे खडक, माती, पाणी इत्यादींची केवळ उपलब्धताच नव्हे, तर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांच्या नोंदी, नकाशे व तक्त्यांच्या सहाय्याने आकडेवारीचे पृथ:करण आणि त्यातून निष्कर्ष काढणे याकडे राहील. त्यासाठी संगणकच नव्हे तर मोबाईल किंवा तत्सम यंत्रही पुरे होईल. कृत्रिम बुद्धिधारक आभासी मानव करण्याचीही चाहूल लागली आहे.

बिगबँग नामक महास्फोटातून निर्माण झालेल्या अथांग विश्वाच्या रचनेतील मोहमयी पृथ्वीचे वय तब्बल साडेचार अब्ज वर्षे! या दीर्घ कालखंडात पृथ्वीवरील खडक-मातीने बनलेल्या शिलावरणाचे स्वरूप बदलत गेले, त्याचबरोबर त्याला लपटलेल्या वातावरण आणि जलावरणाचेही! सागरतळ विस्तारण्याच्या प्रक्रियेतून खंड दुरावत गेले. भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखीच्या उद्रेकातून आणि खडकांची झीज होण्यातून भूरुपे बदलत गेली. या नैसर्गिक आपत्तींमध्ये भर पडत गेली, केवळ साठ हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या मानवाच्या करणीची आणि त्यातून होणाऱ्या पर्यावरणाच्या अपरिमित हानीची!

विसाव्या शतकाच्या मध्यावर मानवाने साधलेली प्रगती संथ गतीने, निसर्ग नियमांना धरून होती. मात्र आज लोकसंख्येच्या विस्फोटात, औद्योगीकरण- शहरीकरण- व्यवसायिकरणाच्या रेट्यात जेसीबी, बुलडोझर, टनेल मेकिंग अशा तंत्रज्ञानाधिष्ठित यंत्रांच्या सहाय्याने शिलावरणाचे लचके तोडले जात आहेत. भूमातेच्या पृष्ठावर, उदरात आणि सभोवताली उपलब्ध असलेल्या प्रत्येक घटकावर- खडक, मृदा, वाळू, इंधन, खनिजे, धातू, जल आणि वायुवर- ताबा मिळविण्याची मानवी वृत्ती बळावत जात आहे. त्यात भर पडणार जल, वायू आणि मृदा प्रदूषणाची. त्यातून त्यांची उपलब्धता कमी होत जाणार आणि शेताच्या बांधापासून ते देशांच्या सीमांपर्यंत संघर्ष आणि त्यातून सभोवतालच्या आवरणांवर ताबा मिळविण्याची वृत्ती बळावणार. त्यातून सौर ऊर्जा पॅनल्स, पवनचक्या, अणुऊर्जा क्षेपणास्त्रे, सागरी खारे पाणी गोडे करण्याचे प्रकल्प ठिकठिकाणी आकार घेणार. त्याचबरोबर ''टुडेज वेस्ट इज टुमॉरोज रिसोर्स’ ही संकल्पना विकसित होत पुनर्वापरावरही मानवाचे लक्ष केंद्रित होणार. कुतुहलाचा वेध घेणे ही मानवी प्रवृत्ती.

एकेकाळी अशक्य वाटणारे मानवाचे पाऊल चंद्रावर पडले. त्यातून निर्माण झालेले तंत्रज्ञान आज सूर्यमालिकेतील ग्रहांचा वेध घेण्यासाठी सज्ज झाले आहे. यानांच्या माध्यमातून मिळालेली छायाचित्रे, माती-खडकांचे नमुने इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी ''प्लॅनेटरी जिऑलॉजी'' ही शाखा विकसित होत आहे. ग्रहांच्या माहितीचा ओघ असाच राहणार आणि त्यातून प्लॅनेटॉलॉजी, ग्रह विज्ञान साकारणार यात शंका नाही. सूर्यमालिके पलीकडील अवकाशाचा, महाकाय कृष्णविवरांचा आणि त्यांच्याभोवती फिरणाऱ्या दीर्घिकांचा- वेध घेण्याच्या नादात खगोलविज्ञानही विस्तारित जाणार हेही निश्चित. अशा वेधांचा वेग इतका आहे की आजच निरुपयोगी अंतरिक्ष याने, लहान-मोठे उपग्रह यांच्या अवकाशात झालेल्या गर्दीला ''सिमेट्री ऑफ स्पेसक्राफ्ट'' असे संबोधले जात आहे. त्यात भर पडणार आहे अवकाश स्थानकांची.

अशा समस्यांच्या यादीत भर पडत आहे खनिज इंधनांचा वापर आणि औद्योगिक प्रक्रियांमुळे कार्बन डायॉक्साईड आणि इतर विघातक वायूंच्या वाढत्या उत्सर्जनाची, वातावरणातील ओझोन थराच्या क्षयाची आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक, हवामान बदलाची! या बदलांमुळे सागरी प्रवाहांच्या तापमानात होणारी वाढ, त्यातून अस्थिर झालेल्या जलचक्रामुळे कोठे अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, वणवे तर कोठे वादळांची वारंवारिता अशा घटना वाढतील. त्यामध्ये भर पडणार जमीन नापिकीची व उपासमारीची. तापमानवाढीचा असा फटका हिमशिखरे, हिमनद्यांनाही बसणार. त्यांच्या वितळण्यामुळे सागराच्या पातळीत वाढ होणार आणि किनाऱ्यालगतची केवळ शहरेच नव्हे तर वाड्यावस्त्याही धोकादायक होणार. महासागरातील उथळ परिसरातील मालदीवसारखी बेटेही जलमय होणार. त्याचबरोबर प्रवाळ आणि अन्य सागरी जीवन नष्ट होण्याच्या मार्गाला लागणार. व्यक्ती, इमारती, औद्योगिक क्षेत्रे, महामार्गांमुळे होणाऱ्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन मोजण्यासाठी कार्बन फूटप्रिंट तंत्रज्ञानाचा वापर वाढत जाईल आणि इमारती इन्सुलेट करणे अपरिहार्य होईल.

एकूणच आज पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वावर प्रभुत्व गाजविण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे जग असुरक्षित बनत आहे. हे सारं थोपविण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव, पर्यावरणासंबंधी समाजाची उदासीनता आणि भौतिकतेच्या सुखांच्या आहारी जाण्यामुळे बदलणारी जीवनशैली यामुळे आज सुरक्षित वाटणारी जागा उद्यासाठी धोकादायक होईल. यावर मार्ग काढण्यासाठी चर्चासत्रे, करार, कायदेही होत राहतील. ''जंगले वाचवा, जंगले वाढवा'' अशा घोषवाक्यांना बळ येईल, मात्र हे प्रत्यक्षात येण्याची प्रक्रिया मानवी प्रवृत्तीमुळे संथ राहील. पृथ्वी विज्ञानाच्या अभ्यासाचा गाभा म्हणजे भूपृष्ठीय सर्वेक्षण. त्यासाठी टोपोशीट्स, क्लायनोमीटर, हातोडा ही भूअभ्यासकांची साधने. १९६०च्या दशकात त्यात भर पडली हवाई आणि त्यानंतर कृत्रिम उपग्रहांनी पाठविलेल्या उपग्रह छायाचित्रांची.

दूरसंवेदनातून मिळालेल्या या प्रतिमांचा अभ्यास करताना उदय झाला भौगोलिक माहिती प्रणालीचा. आज हे तंत्रज्ञान प्रतिमा पृथक्करण आणि त्यातून निघालेल्या निष्कर्षांमुळे केवळ भूपर्यावरणच नव्हे तर शहरांचे नियोजन, शेती, संरक्षण अशा विविध क्षेत्रातही उपयुक्त ठरत आहे. अलीकडेच यात भर पडली आहे मर्यादित परिसराचे तातडीने सर्वेक्षण करण्यासाठी उपयुक्त अशा ड्रोन-तंत्रज्ञानाची. एकूणच भविष्यात दूरसंवेदन तंत्रज्ञान विकसित होत राहील. संशोधनाचा कल वेगवेगळ्या सेन्सर्सद्वारे खडक, माती, पाणी इत्यादींची केवळ उपलब्धताच नव्हे तर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांच्या नोंदी, नकाशे व तक्त्यांच्या सहाय्याने आकडेवारीचे पृथ:करण आणि त्यातून निष्कर्ष काढणे याकडे राहील. त्यासाठी संगणकच नव्हे तर मोबाईल किंवा तत्सम यंत्रही पुरे होईल. आज हे काम शास्त्रज्ञ करतात. उद्या त्यांची जागा कृत्रिम बुद्धिधारक आभासी मानव करण्याचीही चाहूल लागली आहे.

निसर्ग हीच प्रयोगशाळा

चार भिंतीत प्रयोगासाठी लागणारी अजस्त्र महागडी उपकरणे आणि यंत्रे हळूहळू कालबाह्य होतील. परिणामी ''निसर्ग हीच प्रयोगशाळा'' ही उक्ती प्रत्यक्षात येईल. अर्थात त्यानंतरही काढलेले निष्कर्ष तपासण्यासाठी प्रत्यक्ष, परंतु मर्यादित सर्वेक्षणाला पर्याय राहणार नाही. भविष्यात शिक्षण क्षेत्राला या बदलांची दखल घ्यावी लागेल. विद्यापीठ अनुदान मंडळाचा ''स्वयंम'' हा प्लॅटफॉर्म याचेच द्योतक आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या उपलब्धतेबरोबर उत्कृष्ट लेक्चरचीच नव्हे, तर प्रात्यक्षिकांचीसुद्धा सॉफ्टवेअर निर्माण होतील. त्यामुळे नवीन पिढीस आपली सोय, गती आणि आकलन शक्तीनुसार अध्ययन करता येईल. भूशास्त्र-भूगोल-पर्यावरण अशा प्रत्यक्ष निरीक्षणांवर आधारित शास्त्रांतील संकल्पना प्रभावीपणे समजावून घेता येतील. शिलावरणवातावरण-जलावरण-जीवावरण यांच्या एकत्रित अभ्यासाची गरज शालेय पातळीवरच जाणवू लागेल.

मात्र ही गरज आणि आजचे वास्तव यातील दरीची दखल घेणे आवश्यक आहे. आज पहिली ते दहावीपर्यंतच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये पृथ्वी-विज्ञान हे भूगोलाचा भाग म्हणून, तेही तुकड्यातुकड्यांमध्ये शिकविले जाते. एवढेच नव्हे तर संपूर्ण अभ्यासक्रमात पृथ्वी-विज्ञान ही संज्ञा अभावानेही दिसत नाही. तंत्रज्ञान युगाच्या पार्श्वभूमीवर अशी अनास्था अस्वस्थ करणारी आहे. केंद्र शासनात पृथ्वी- विज्ञानाचे महत्त्व जाणून त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. हे असले तरी हे विज्ञान सर्वदूर पोचले पाहिजे. भविष्यात पृथ्वी आणि त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणीय संकल्पना, मानवी अतिक्रमणातून वाढत जाणारी समस्यांची यादी, व्याप्ती आणि तीव्रता हे सारं माहितीच्या नव्हे तर ज्ञानरूपाने विद्यार्थीदशेतच रुजणे आवश्यक आहे, याची जाणीव संबंधितांना होईल तो सुदिन.

(लेखक भू-पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com