इतिहास-वर्तमानाला जोडणारा दीपस्तंभ

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हौसाक्का पाटील यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
Hausakka Patil
Hausakka PatilSakal

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या हौसाक्का पाटील यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सामाजिक परिवर्तनासाठीच्या संघर्षात त्यांनी वाटा उचलला. त्यांच्या निधनाने वर्तमान आणि इतिहासाला जोडणारा एक दुवा निखळला आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पुरुषाप्रमाणेच अनेक महिलांचेदेखील मोलाचे योगदान आहे. त्या क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानींमध्ये हौसाक्का पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. हौसाक्का या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या! त्यांना स्वातंत्र्यलढ्याचे बाळकडू आपल्या पित्यापासूनच मिळाले. बालपणापासून त्यांच्या वाट्याला संघर्ष आला. वयाच्या चौथ्या वर्षी आईचे निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दुसरा विवाह न करता मुलीलाच वंशाचा दिवा मानले.

हौसाक्का बालवयातच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या. कधी येडेमच्छिंद्र, तर कधी आजोळी दुधोंडी गावी असा त्यांचा प्रवास सुरू होता. इंग्रजांचा ससेमिरा सुरूच होता. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्या अन्यायाविरुद्ध लढल्याच; पण सांगली जिल्ह्यातील वांगी येथील इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी त्या जीव धोक्‍यात घालून अपरात्री गेल्या. कराडजवळील सुर्ली घाटात इंग्रजांच्या खजिना लुटीच्या मोहिमेत त्या अग्रभागी होत्या. भवानीनगर रेल्वेस्थानकावरील इंग्रज पोलिसांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी त्यांनी वेषांतर करून मोहीम आखली. त्या मोहिमेत त्या यशस्वी झाल्या. हौसाक्का आणि त्यांच्या पथकाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

गोवा मुक्ती लढ्यातही त्या सहभागी झाल्या. मांडवी नदी पार करून त्या पणजीत पोहोचल्या. त्या निर्भीड होत्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी भाग घेतला.

स्वातंत्र्यलढ्यात संघर्ष करताना त्यांनी महिला म्हणून न्यूनगंड बाळगला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कर्तृत्वाचा बडेजाव किंवा अहंकार त्यांनी बाळगला नाही. त्यांना भेटल्यानंतर सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना एक ऊर्जा मिळत असे. हौसाक्कांच्या जीवनात अनेक संकटे आली. बालपणी मातोश्रींचे निधन झाले. वडिलांना अनेक वेळा भूमिगत राहून लढावे लागले. पती भगवंतराव पाटील यांना तुरुंगवास झाला. तत्कालिन परिस्थितीचे चटके त्यांना बसले. पण त्या संकटसमयी रडल्या नाहीत. त्या लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. इंग्रजांनी त्यांच्या परिवाराला खूप त्रास दिला; पण हौसाक्का मागे हटल्या नाहीत. त्या नाउमेद झाल्या नाहीत. संकटसमयी त्या अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढत राहिल्या. महिलादेखील हिम्मतवाद, कर्तृत्ववान, शूर आणि बुद्धिमान असतात, हे हौसाक्कांनी दाखवून दिले.

वंचितांसाठी संघर्ष

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हौसाक्कांचा लढा थांबला नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे, या आंदोलनात त्या सहभागी झाल्या. त्यामध्ये त्यांना तुरुंगवास झाला. कष्टकरी, कामकरी, शेतकरी, वंचित वर्गाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी सतत आंदोलने केली. शेतीमालाला भाव मिळावा, दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे, यासाठी त्या सतत संघर्ष करत राहिल्या. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठी त्या अखेरपर्यंत लढल्या.

महाराष्ट्रातील या आधीच्या भाजप सरकारने ब. मो. पुरंदरे यांना "महाराष्ट्र भूषण'' पुरस्कार दिला, तेव्हा हौसाक्का त्याविरोधातील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्या तत्त्वनिष्ठ होत्या. सत्यशोधकी विचारांच्या होत्या. छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा वारसा त्यांनी हिमतीने चालविला. इतिहास आणि वर्तमानाला जोडणाऱ्या त्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांनी आयुष्यभर कार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com