भाष्य : शेतकऱ्यांचे हितकर्ते शिवराय

Shivaji-Maharaj
Shivaji-Maharaj

स्वराज्याचा आधारस्तंभ असलेल्या शेतकऱ्यांच्या हिताविषयी छत्रपती शिवाजी महाराज सदैव दक्ष होते. शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार होऊ नये याची दक्षता घेत असतानाच, अडचणीवेळी पाठीशी उभे राहून त्यांनी शेतकऱ्यांना बळ दिले. आजच्या शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या शेतकरीविषयक धोरणांवर दृष्टिक्षेप. 

रयतेची काळजी घेतल्याशिवाय सुराज्य आकाराला येत नाही. त्यासाठी शेतकरीहिताला अग्रक्रम दिला पाहिजे. त्याला पूरक असे सरकारचे धोरण, त्याच्या रक्षणार्थ त्याचा व्यवहार आणि शेतकरीहिताचे निर्णय घेऊन राज्यकारभाराला शिस्त लावली तर रयतेचे कल्याण होते. शेतकऱ्याला शून्य व्याजाने कर्ज आणि अन्नसुरक्षेला प्राधान्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात होते. शेतमालाला रास्त मोबदला मिळाला तर कास्तकऱ्याच्या घरात सुख, समाधान आणि शांतता नांदते, हे सूत्र समोर ठेवून शिवरायांनी जनकल्याणाला अग्रक्रम देत राज्यशकट हाकले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवाजी महाराजांचा इतिहास जसा ढाल-तलवारी, लढाया, घनघोर संघर्षाचा आहे, तसाच तो समतेचा, प्रागतिक विचारांचा, महिलांच्या सन्मानाचा, धर्मनिरपेक्ष मूल्यांचाही आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी म्हणतात, की शिवाजी महाराज ‘शेतकरीहितकर्ते राजे’ होते. स्वराज्यातील आणि परराज्यांतील शेतकऱ्यांना, पिकांना इजा पोचणार नाही, याची काळजी शिवरायांनी सदैव घेतली. शेतकरी स्वराज्याचा कणा, आधारस्तंभ आहे. त्यामुळे त्यांचे हित तेच राज्याचे हित, ही त्यांची भूमिका होती. त्यामुळेच शेतकऱ्यांवर अन्याय, जुलूम, अत्याचार, जबरदस्ती करू नका. त्यांना प्रेमाने वागवा अशा सक्त सूचना शिवरायांनी दिल्या होत्या. 

शेतकऱ्यांशी कसे वागावे याबाबतच्या सूचना देताना आज्ञापत्रात शिवाजी महाराज म्हणतात, ‘‘कदाचित एखादे जे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून न्यावे. बलात्कार सर्वथैव न करावा’’. शिवाजी महाराज आपल्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना देतात, की एखादे झाड हवे असेल तर जीर्ण झाड घ्या, तेही शेतकऱ्यांची परवानगी असेल तरच घ्या. त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना द्या. बळजबरीने त्यांच्याकडून कांहीही घेऊ नका. त्यांच्यावर बलात्कार (अत्याचार, बळजबरी) करू नका.’’ 

शेतकऱ्यांविषयी संवेदनशील 
तेवीस ऑक्‍टोबर १६६२रोजी सर्जेराव जेधे यांना पाठविलेल्या पत्रात शिवाजी महाराज शेतकऱ्यांप्रति किती संवेदनशील, कनवाळू होते, हे स्पष्ट होते. मोगलांचा सरदार शाहिस्तेखान पुण्याच्या रोखाने येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत शिवाजी महाराज जेधे यांना सांगतात, ‘‘मोगल तुमच्या भागात येत असल्याची बातमी हेरांनी आणलेली आहे. त्यामुळे गावोगावच्या लेकराबाळांसह सुरक्षित ठिकाणी पाठवा. या कामात हयगय करू नका. उशीर झाला तर रयतेला त्रास होईल. याचे पाप तुमच्या माथ्यावर बसेल. रात्रीचा दिवस करून विनाविलंब शेतीवाडी करणाऱ्या सर्वांना जेथे आश्रय असेल तेथील डोंगरावर जावा. सावध राहा.’’ संकटसमयी शेतकऱ्यांना मदत करणे, हे पुण्य आहे, अशी त्यांची भावना होती. शिवाजी महाराज यांची पाप-पुण्याची संकल्पना आध्यात्मिक पातळीवरची नव्हती, तर ती भौतिक, व्यवहारवादी पातळीवरची होती. 

रयतेस त्रास न देण्याच्या सूचना 
ता. १९ मे १६७३ रोजी चिपळूण येथील आपले जुमलेदार -हवालदार यांना पाठवलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, की शेतकऱ्यांना काडीचाही त्रास देऊ नका. त्यांच्याकडून विनामोबदला गवत, भाकरी, फाटे, भाजीपाला घेऊ नका. जर तुम्ही शेतकऱ्यांना त्रास द्याल तर त्यांचा तळतळाट लागेल. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा. अन्यथा उंदीर येऊन पेटती वात घेऊन जाईल. त्यामुळे गंजीला (कडबा) आग लागेल. शेतकऱ्यांचे नुकसान होईल, जनावरांना चारा मिळणार नाही. निष्ठूर (निष्काळजी) होऊ नका.’’ शेतकऱ्यांना मदत हीच आपली (मराठ्यांची) इज्जत आहे, असे राजे जुमलेदाराला सांगतात. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांना उद्देशून शिवाजीराजे निसूर (निष्ठूर) असा शब्दप्रयोग करतात. शेतकऱ्यांशी उत्तम वर्तणुकीचाही सल्ला ते देतात. 

संकटसमयी म्हणजे दुष्काळ किंवा अतिवृष्टी असेल त्याप्रसंगी शेतकऱ्यांशी कसे वागावे, याबाबत ५ सप्टेंबर १६७६ रोजी प्रभावळीच्या रामाजी अनंत सुभेदाराला पाठवलेल्या पत्रात शिवाजीराजे म्हणतात, की गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना गोळा करा. त्यांना शेती कसावयास बैलजोडी नसेल तर बैलजोडी खरेदी करण्यास मदत करा. उदरनिर्वाहासाठी खंडी, दोन खंडी धान्य द्यावे. आपल्या राज्यात कोणीही उपाशीपोटी राहता कामा नये, हे शिवरायांचे अन्नसुरक्षा धोरणच होते. शिवाजीराजांनी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले. त्याची वसुली टप्प्याटप्प्याने म्हणजे शेतकऱ्यांना ऐपत आल्यानंतरच केली. त्यासाठी स्वराज्याच्या तिजोरीवर बोजा पडला तरी तमा बाळगली नाही. शेतकरी हितासाठी तिजोरीचा विचार न करणारे शिवाजीराजे होते. शेतकऱ्यांना कसण्यासाठी जमीन नसेल, तर त्यांना मोफत जमीन दिली. त्यावरील शेतसारा माफ केला. शेतकऱ्यांना बैलजोडी, धान्य दिले. जमीन दिली. अशा विविध मार्गांनी त्यांनी शेतकऱ्यांना आधार दिला. त्यांच्यात हिंमत निर्माण केली.

शेतमालाला रास्त भाव 
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी शेतीमाल योग्य मोबदला देऊन खरेदी केला. तो परमुलूखात नेऊन विकला. स्वराज्यात अतिरिक्त शेतीमाल असताना परमुलूखातील शेतीमाल आयात करून एतद्देशीय शेतकऱ्यांचे त्यांनी कंबरडे मोडले नाही. शिवाजी महाराज यांनी केवळ स्वराज्यातील शेतकऱ्यांचेच हित जोपासले असे नाही, तर परमुलूखातील शेतकऱ्यांचेदेखील हित जोपासले. स्वराज्यातील आणि परराज्यांतील शेतकरी, श्रमकरी, कष्टकरी यांचे हित जोपासावे. शेतकरी स्वराज्याचा आधारस्तंभ, अन्नदाता आहे. त्यामुळे त्याच्याशी मित्रभावाने वागले पाहिजे. त्याच्या व्यथा, दुःख समजून घेतले पाहिजे. शेतकरी हिताचाच निर्णय घेतला पाहिजे, अशी शिवाजीराजांची भूमिका होती. परमुलूखातील शेतकऱ्यांशी शिवरायांचे वर्तन कसे होते, याबाबत समकालीन कृष्णाजी अनंत सभासद लिहितात, ‘‘एक काडी रयतेची तसनस न व्हावी ऐसे केले. कित्येक गर्दांना मारून जाबता बसविला आणि मजलीस जाऊन तेथे खुष-खरेदी सर्व पदार्थ घेऊन चालिले. लूट नाही. असे आता पुढे पातशाहास खबर कळून बहुत संतुष्ट जाहला.’’ शिवाजीराजे दक्षिणदिग्विजयास निघाले होते. ते गोवळकोंड्याच्या कुतूबशाहीच्या मुलूखातून जात होते. तेव्हा तेथील शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस न करण्याची सूचना मावळ्यांना दिली होती. नासधूस करणाऱ्यांना शिक्षा केली. रोखीने माल खरेदी केला. कोणत्याही प्रकारची लूट केली नाही. लढायांच्या धामधुमीतही शिवरायांनी परमुलूखातील शेतकऱ्यांचेही हित जोपासले. त्यांना त्रास दिला नाही. 

शिवरायांनी शेतीत आमूलाग्र क्रांती केली. जमिनीची प्रतवारी ठरवली. मलिकंबरी पद्धतीतील त्रुटी दूर करून शेतकरी हिताचे निर्णय घेतले. गरीब शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला. शिवाजीराजे स्वतः शेतकरी होते. पुण्याजवळील भोर तालुक्‍यात शिवगंगा नदीवर दगडी बांध घालून त्यांनी (जिजाऊ-शिवरायांनी) शेती केली. शेतकऱ्यांना शेतजमिनीचे मालक केले.

वतनदारी पद्धती नष्ट करून वेतनदारी पद्धती आणली. शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार, बळजबरी करणाऱ्यांना त्यांनी कठोर शासन केले. त्यांनी शेतकऱ्यांना आत्मनिर्भर केले. शेती आणि शेतकऱ्यांना चिरडू पाहणाऱ्यांचा शिवरायांनी मुलाहिजा बाळगला नाही. ते शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. रयतेचे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी केलेल्या कारभारातून आणि धोरणांतून याचा प्रत्यय येतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com