सुरक्षा उपायांच्या पक्क्या ‘रस्त्या’कडे

डॉ. सुनील धापटे
Friday, 1 February 2019

रस्ता सुरक्षा हा विषय केवळ सप्ताहापुरता न राहता नित्य जागृतीचा व्हायला हवा. उपाययोजनांमध्ये रस्त्यावरील मानसशास्त्राचा विचार आवश्‍यक आहे. दर तासाला १७ व्यक्ती रस्ते अपघातात दगावणे, हे वास्तव भयावह असून ते बदलण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे.

रस्ता सुरक्षा हा विषय केवळ सप्ताहापुरता न राहता नित्य जागृतीचा व्हायला हवा. उपाययोजनांमध्ये रस्त्यावरील मानसशास्त्राचा विचार आवश्‍यक आहे. दर तासाला १७ व्यक्ती रस्ते अपघातात दगावणे, हे वास्तव भयावह असून ते बदलण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे.

दर वर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह आला, की अपघातांना आळा कसा घालता येईल, याची चर्चा होते. ‘केंद्रीय मार्ग परिवहन व महामार्ग विभागा’च्या वतीने हा सप्ताह पाळला जातो आणि त्यानिमित्त विविध उपक्रम पार पडतात. यंदा चार ते दहा फेब्रुवारीदरम्यान हा सप्ताह साजरा होत आहे. पण, रस्ता सुरक्षा हा विषय तेवढ्यापुरता सीमित नाही. वाढते अपघात आणि रस्ता सुरक्षा यांविषयी ठराविकच मुद्दे पुन्हापुन्हा विचारात घेतले जातात. वास्तविक हा एक गंभीर प्रश्‍न असून, त्याच्या खोलात जाऊन विचार व्हायला हवा. अपघातात एखादी व्यक्ती दगावते, तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात होतो. २०१८ मध्ये देशात चार लाख ६४ हजार अपघात झाले आणि एक लाख ४७ हजार व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. दर तासाला १७ माणसे रस्ता अपघातात बळी पडतात, असे यावरून दिसते. हे भयावह आहे.

वेगवेगळ्या संशोधन अहवालांनुसार, ७० टक्‍क्‍यांहून अधिक अपघात वाहनचालकांच्या चुकीने घडतात. वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर, अमली पदार्थांचे सेवन, अवाजवी वेग, लक्ष विचलित होणे, वाहतूक नियमांचा भंग, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे ही अपघातांची महत्त्वाची कारणे सांगितली जातात. त्यांच्या मुळाशी जायला हवे. आपल्याकडे सर्वसाधारणत: दोन प्रकारचे वाहनचालक आहेत. व्यक्तिगत वाहन चालविणारे चालक व व्यावसायिक वाहन चालविणारे चालक. यातील व्यक्तिगत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकाला ‘ड्रायव्हर’ म्हणून संबोधले तर राग येतो. समाजामध्ये ‘ ड्रायव्हर’ या पदाची काय प्रतिष्ठा आहे, हे यावरून स्पष्ट होईल. ड्रायव्हर म्हणून किंवा व्यावसायिक वाहनचालक म्हणून, (सन्माननीय अपवाद वगळता) किती जण मनापासून व्यवसाय करतात? मुळात आमच्या समाजामध्ये व्यावसायिक वाहनचालक कोण होतो? ट्रक, बस, टेंपो, रिक्षा, टॅक्‍सी ही वाहने चालविण्यास कोण तयार होतो? ज्यांना उपजीविकेसाठी दुसरा व्यवसाय उपलब्ध नाही, शिक्षणाचा अभाव आहे, अशी माणसे पोटापाण्यासाठी व्यावसायिक वाहनचालक बनलेले असतात. त्यामागे अगतिकता असते. म्हणजे ज्या समाजात वाहनचालकाला प्रतिष्ठा नाही, एक प्रकारचे दुय्यमत्व आहे, त्याच समाजात वाहनचालकाकडून रस्ता सुरक्षिततेची अपेक्षा केली जाते. वाहनचालकाला जर आदर, प्रतिष्ठा मिळाली, तर तोही आपल्यावरील जबाबदारी ओळखून काम करेल. वास्तविक त्याने स्वतःला व इतरांनी त्याला कमी लेखणे चूक आहे. सध्याच्या रहदारीचा विचार करता वाहनचालकाकडे एकाग्रता, चिकाटी, संयम, असे अनेक गुण अपेक्षित असतात. वाहन चालविणे कौशल्याचे काम आहे.चालक सतत ताणाला सामोरा जात असतो आणि जोखीमही उचलतो. हे सगळे लक्षात घेऊन त्याचा मोबदला ठरायला हवा. त्याच्यासाठी प्रशिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. व्यावसायिक वाहनचालक म्हणून व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा आत्मसन्मान वाढेल, स्वत:च्या कामाबद्दल अभिमान वाटेल, याचं बाळकडू वाहन चालवायला शिकतानाच द्यावं लागेल. वाहन चालविण्याची परीक्षा अत्यंत काटेकोरपणे व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून घ्यावी लागेल. व्यावसायिक वाहनचालकांप्रती अंमलबजावणी यंत्रणांचा दृष्टिकोन विधायक व मानवी असायला हवा. या सर्व बाबी ‘मोटार वाहन कायद्या’त आहेतच; गरज आहे काटेकोर अंमलबजावणीची. व्यक्तिगत वाहन चालविणाऱ्यांमध्ये जवळपास ७०% वाहनचालक सुयोग्य व भरवश्‍याची सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वाहन चालवितात. वेळेची कमतरता, कामाची घाई, रस्त्यावरील स्थिती-परिस्थितीमुळे आलेला बेदरकारपणा यामुळे वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होते. वाहन चालविण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या गांभीर्याचा अभाव यांच्यामध्ये जाणवतो. कदाचित तंत्रज्ञानामुळे वाहन चालविण्यामध्ये आलेल्या सहजतेचा परिणाम होतो व त्यामुळे वाहन चालविताना निष्काळजीपणा वाढतो व त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते.  प्रत्येक वर्षी मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडून आपण किती कोटी महसूल वसूल केला, याची आकडेवारी हिरीरीने जाहीर केली जाते. अशा यंत्रणांचा गोळा झालेला महसूल आणि अपघातामुळे समाजाचे होणारे आर्थिक नुकसान विचारात घेतले (यामध्ये बळी गेलेल्या माणसांचे मूल्य विचारात घेतलेले नाही. कारण व्यक्तीचे मूल्य करणे शक्‍य नाही) तर, अपघातांमुळे समाजाचे होणारे नुकसान कितीतरी पटींनी जास्त होईल. विनापरवाना, विनाविमा संरक्षण वाहन चालविले, तर कारवाई करणे एवढ्यापुरताच नियम अंमलबजावणीचा विचार होतो. नव्हे, यासाठी विभागाकडून लक्ष्यांक (टार्गेट) दिला जातो. अमुक इतके ‘विनापरवान्या’चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, असे आदेश दिले जातात. वास्तविक हा दृष्टिकोनच मुळात चूक नव्हे काय? आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विनापरवाना एखादी व्यक्ती वाहन चालविते, ही आपल्यादृष्टीने नामुष्कीची गोष्ट नाही का? परंतु, केवळ पाच-पन्नास रुपयांच्या दंडावर सुखी असलेल्या व लक्ष्य पूर्ण केल्याच्या आनंदात राहणाऱ्या यंत्रणांचा वचक तरी कसा राहणार? गरज आहे ती हा वचक निर्माण करण्याची. अपघातांचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन. नियम पाळण्यापेक्षा मोडण्यात पुरुषार्थ आहे, असे काहींना वाटते! पण, बऱ्याचदा अपुऱ्या किंवा चुकीच्या वाहतूक सुविधांमुळे नियमांचे उल्लंघन होते व अपघाताची परिस्थिती उद्‌भवते.रस्त्यांची स्थिती, चौकांची स्थिती, पदपथ, रस्त्यावरील इतर घटकांचे अतिक्रमण, सदोष सिग्नल, वाहनतळांची कमतरता या गोष्टींमुळे वाहनचालकाची स्थिती चक्रव्यूहातील अभिमन्यूसारखी होते. अपुऱ्या आणि चुकीच्या वाहतूकविषयक सुविधांमुळे ते रस्त्यावर धारातीर्थी पडतात. ही स्थिती विचारात घेता वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करावे लागणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्र व राज्य सरकार या सर्वांचा सहभाग घेऊन रस्ता सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करावे लागणार आहे.  समाजात आदराचे स्थान असलेला वाहनचालक, मोटार वाहन कायद्याची योग्य अंमलबजावणी, परिपूर्ण व निर्दोष सुविधा आणि रस्ता वाहतूकसंबंधित सर्व यंत्रणांचा समन्वय, यांद्वारे अपघातांची संख्या कमी करता येईल.  रस्ता खरे तर समाजाचा आरसा असतो. नियम धुडकावण्याची वृत्ती, दुसऱ्याच्या मार्गात खोडा घालणे, त्याला मागे टाकून कसे पुढे जाता याईल, याचा विचार करणे, छोट्या गोष्टींमध्ये अहंकार डोकावणे या प्रवृत्ती समाजात असतील, तर रस्त्यावरही त्या असणार. रस्त्यावरच्या मानसशास्त्राचा विचार उपाययोजनांसाठी आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr sunil dhapte write road safety article in editorial