गुंतागुंतीच्या आजारांवर होमिओपॅथी

स्वमग्नता, मतिमंदत्व, विकलांगता, अतिचंचलता, सेरेब्रल पाल्सी या पैकी कोणत्याही आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्याचे मोठे आव्हान वैद्यकशास्त्रांपुढे आहे.
homoeopathy
homoeopathysakal
Summary

स्वमग्नता, मतिमंदत्व, विकलांगता, अतिचंचलता, सेरेब्रल पाल्सी या पैकी कोणत्याही आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्याचे मोठे आव्हान वैद्यकशास्त्रांपुढे आहे.

- डॉ. सुनिरमल सरकार

वेगाने बदलणारी जीवनशैली ही आधुनिक काळातील गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजाराचे मूळ आहे. केवळ लक्षणे बघून रुग्णांवर उपचाराचा मार्ग न अवलंबता त्यांच्या मुळापर्यंत जाऊन चिकित्सा करणे आवश्यक ठरते. हे उपचार केवळ शारीरिक नसतात, तर ते मनावर असतात. उपचाराच्या अशा सर्वंकष पद्धतीमुळे स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी, अतिचंचलता, मतिमंदत्व, विकलांगता अशा दुर्धर आजारांवर होमिओपॅथीने उपचार करण्यात यश मिळत आहे.

स्वमग्नता, मतिमंदत्व, विकलांगता, अतिचंचलता, सेरेब्रल पाल्सी या पैकी कोणत्याही आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्याचे मोठे आव्हान वैद्यकशास्त्रांपुढे आहे. या आजाराची रुग्णांमध्ये दिसणारी लक्षणे वेगवेगळी असतात. या सगळ्यात समान धागा असतो तो म्हणजे, ही मुले इतरांसारखी सामान्य नाहीत. अशा रुग्णांवर होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार करता येतात, हा विश्वास आता निर्माण होत आहे.

स्वमग्नता, मतिमंदत्व अशा प्रकारच्या रुग्णांवर उपचार करताना लक्षणांच्या बरोबरच रुग्णाचे बारकाईने निरीक्षण करावे लागते. त्यानंतर या प्रत्येक रुग्णातील फरक अधिक स्पष्टपणे दिसू लागतो. काही मुले फक्त टाळ्या वाजवतात, काही एकटक पाहतात, काही मुले फक्त वस्तू दातात धरून चावतात, किंवा काही नजरेला नजर मिळवत नाहीत. काही रुग्णांना प्रकाश सहन होत नाही, तर काहींना अंधार सहन होत नाही. त्याचबरोबर आई-वडिलांबरोबरचे त्यांचे संबंध, त्यांची जवळीकता यांच्या देखील बारकाईने नोंदी घेतल्या जातात. त्यानंतर औषधोपचाराचा सल्ला दिला जातो.

मुलांचे संगोपन ही आई-वडिलांची जबाबदारी असते. ते जितक्या आत्मीयतेने, प्रेमाने जिवापाड प्रेम करून मुलांची वाढ करतात तसे, कितीही विश्वासातला नोकर असला तरीही तो आई-वडिलांचे प्रेम देऊ शकत नाही. आधुनिक काळात आई-वडील दोघेही कामानिमित्त बाहेर असतात. दोघांचे करिअर, घरात येणारे पैसे याला प्राधान्य असते. अशा घरातील मुलांचे बालपण कोमेजून जाते. ती एकटी पडतात. त्यातून काही मानसिक आणि शारीरिक आजाराची बीजे रोवली जातात. त्यामुळे अशा गुंतागुंतीच्या आजाराचे मूळ आधुनिक जीवनशैलीत आढळते.

बाळ स्वमग्न होण्यामागे प्रसूतीच्या वेळी होणारी एखादी दुर्घटना असू शकते. प्रसूतीसाठी झालेला उशीर, दिवस पूर्ण भरण्याआधीच झालेली प्रसूती अशा काही कारणांमधून नवजात अर्भकाच्या मेंदूला पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळत नाही. त्यातून हा आजार उद्भवण्याचा धोका असतो. होमिओपॅथीच्या औषधांमुळे रुग्णांमध्ये चांगली सुधारणा होते. अशा प्रकारच्या मेंदूशी संबंधित आजारांमध्ये होमिओपॅथीचे उपचार उपयुक्त ठरतात. स्वमग्नता असे या आजाराचे नावही दिले गेले नव्हते अशा शेकडो वर्षांपूर्वी होमिओपॅथीने अशा रुग्णांवर उपचार केले आहेत. रुग्णाचे बारकाईने निरीक्षण करून त्याला नेमके कोणते औषध देता येईल, हे निश्चित करता येते. या आजारांमागे कुटुंबातील वैद्यकीय इतिहासदेखील महत्त्वाचा असतो. त्याचीही माहिती रुग्णाच्या नातेवाईकांशी बोलताना समोर येते.

मन आणि शरीर

मानवी शरीर आणि मन हे दोन्ही घटक वेगळे नाहीत. शरीराला वेदना झाल्यानंतर मन अस्वस्थ होते. तसेच, मनावर झालेल्या आघाताचा थेट परिणाम शरीरावर ठळकपणे दिसतो. मन आणि शरीर याच्या परस्पर संबंधांचा विचार करून होमिओपॅथीमध्ये औषधोपचाराचे नियोजन केले जाते. रोग शरीराला होतो, याचाच अर्थ शरीराचे संरक्षण करणारी यंत्रणा कमकुवत झालेली असते. ही शरीरांतर्गत असलेली संरक्षण व्यवस्था सक्षम करण्याचे कार्य होमिओपॅथी करते. त्यात संतुलन केले जाते. त्यातून रुग्णाच्या क्षमता वाढतात. शरीर आणि मन लयबद्धपणे काम करू लागते, ही या पॅथीची वैशिष्ट्ये ठरली आहेत. आधुनिक काळात काही औषधांमुळे या आजाराची मुले फक्त झोपतात. झोपल्याने ती शांत होतात. पालकांना असे वाटते, की त्यांचा त्रास कमी होत आहे. पण, वस्तुस्थिती विदारक असते. मुले झोपल्याने स्थूल होतात. त्यांची शारीरिक हालचाल मंदावते. त्याचा दूरगामी परिणाम शरीरावर होतो. या आजारातही मुले आनंदी दिसली पाहिजेत. चेहरा प्रसन्न असला पाहिजे. त्यासाठी मुलांना जागे ठेवणे आवश्यक असते. अर्थात, योग्य प्रमाणात झोप महत्त्वाची असते, हे पालकांनी लक्षात घ्यावे.

उपचारांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

दिव्यांग विद्यार्थ्यांवर होमिओपॅथी उपचाराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बालकल्याण संस्थेत सुरू करण्यात आला आहे. तो दोन वर्षे राबविण्यात येणार आहे. यात राज्याच्या वेगवेगळ्या भागातील अडीचशे मुला-मुलींची नोंद झाली आहे. होमिओपॅथीची औषधे सुरू केल्यापासून दर महिन्याला डॉक्टरांचे पथक प्रत्येक रुग्णाचा पाठपुरावा करणार आहे. त्याच्यातील सुधारणांचा मागोवा घेणार आहे. त्याच्या निकषांवर पुढील औषधोपचारांचे नियोजन करण्यात येईल. हा प्रकल्प डॉ. सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली असेल. होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. संजीव डोळे प्रकल्पाचे समन्वयक आहेत. बालकल्याण संस्थेला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने समग्र चिकित्सा केंद्र (थेरपी सेंटर) कार्यान्वित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत हा प्रकल्प आहे.

(लेखक कोलकत्ता येथील होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत.)

(शब्दांकन : योगीराज प्रभुणे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com