भाष्य : समाजहिताशी नत हो विज्ञान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाष्य : समाजहिताशी नत हो विज्ञान
भाष्य : समाजहिताशी नत हो विज्ञान

भाष्य : समाजहिताशी नत हो विज्ञान

सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यात विज्ञान लक्षणीय भूमिका बजावू शकते. केंद्र सरकारच्या ‘विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालया’ने यासंदर्भात एका उपक्रमाचे सूतोवाच केले असून‘वैज्ञानिकांचे सामाजिक उत्तरदायित्व’ याविषयी मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. हे उत्तरदायित्व खरोखर रुजवता आले तर समाजास त्याचा मोठा लाभ होईल.

‘विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालया’ने ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’(सीएसआर)च्या धर्तीवर ‘वैज्ञानिक सामाजिक जबाबदारी’(एसएसआर)ची कल्पना मांडली आहे. चौदा पानी परिपत्रकात देशातील प्रत्येक शास्त्रज्ञाने वर्षातून किमान दहा दिवस योगदान देणे अपेक्षित आहे, असे म्हटले आहे. अशा ऐच्छिक व वैयक्तिक उपक्रमांना, त्यांच्या वार्षिक कामगिरीच्या मूल्यांकनामध्ये योग्य महत्त्व दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचा हेतू सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वैज्ञानिक समुदायाकडे असलेल्या क्षमतांचा वापर करणे हा आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, उपेक्षित आणि शोषित घटकांना त्यांच्या क्षमता आणि सुप्त क्षमता वाढवून सशक्त करण्यासाठी विद्यमान बौद्धिक संपदांचा योग्य वापर करण्यात यावा, याकरिता एक प्रभावी यंत्रणा निर्माण करणे, हे यामागचे एक प्रमुख ध्येय आहे.

गेल्या काही दशकांपासून समाजामध्ये विज्ञान-संवादाविषयक जाणीव विकसित होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी शास्त्रज्ञांचे अस्तित्व समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर असायचे आणि क्वचितच ते त्यांच्या प्रयोगशाळांच्या किंवा कार्यालयांच्या भिंतींच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत. आता ते दिवस गेले. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने त्यांच्यासोबत समाजाला जोडण्याचे अभूतपूर्व ‘कनेक्टिव्हिटी’चे युग आणले आहे. आता अनेक शास्त्रज्ञ समाजमाध्यमांवर, टीव्हीवर त्यांचे संशोधन किंवा वैज्ञानिक माहिती इतर शास्त्रज्ञ, तसेच सर्वसामान्य जनतेबरोबरही शेअर करताना दिसतात. ‘कोविड-१९’ साथीच्या रोगाने जगभर हाहाकार माजवला होता, तेव्हा अचूक वैज्ञानिक माहितीच्या उपलब्धतेचे महत्त्व अधोरेखित झाले, यात संशय नाही.

देशव्यापी यंत्रणेची गरज

नवा भारत हा त्याच्या उत्साही तरुण लोकसंख्येसह, महत्त्वाकांक्षा आणि वाढत्या आकांक्षांचा देश आहे. या आकांक्षांना न्याय देण्यासाठी समाज आणि विज्ञान-तंत्रज्ञान यांच्या एकत्रीकरणावर नव्याने भर देणे आवश्यक भासू लागले. ‘इंडियन सायन्स काँग्रेस,२०१७’ च्या, १०४ व्या सत्रात संस्थात्मक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्तरांवर समाज कल्याणासाठी विज्ञानाची मदत घेण्यासाठी, विज्ञान आणि समाज यांना अधिक निकट आणण्यासाठी,ते एकत्रीकरण सुलभ करण्यासाठी; तसेच संबंधितांतील समन्वयासाठी देशव्यापी यंत्रणा विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. नऊ सप्टेंबर २०१९ रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यातर्फे ‘वैज्ञानिक सामाजिक उत्तरदायित्वा’बद्दलच्या (एसएसआर)चा धोरणाचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला. उपक्रमाचे पहिले पाऊल म्हणजे मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक. त्यात मंत्रालयाने १७ व्यापक उपक्रमांची यादी केली आहे. ‘एसएसआर’चा भाग म्हणून शास्त्रज्ञ या यादीतील कार्यक्रम राबवू शकतात. कोणी या उपक्रमात भाग घ्यावा, याविषयीचा तपशीलही त्यात आहे. सार्वजनिक आणि खाजगी ज्ञान संस्था (प्रयोगशाळा, संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वैज्ञानिक संस्था), केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, त्यांचे विभाग आणि संबंधित स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱे शास्त्रज्ञ यांच्यासाठी ही योजना लागू होईल. संस्थात्मक स्तरावर, ‘एसएसआर’साठी शैक्षणिक संस्थांच्या ज्ञानवंत कार्यकर्त्यांनी दरवर्षी किमान दहा दिवस समर्पित करावेत, अशी अपेक्षा आहे.

उदाहरणादाखल काही कार्यक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे. १) विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आणि विज्ञानात करिअर करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी मॉड्यूलर किंवा पूर्ण अभ्यासक्रमांवर किंवा विशिष्ट अभ्याससूत्रावर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वैज्ञानिकांची व्याख्याने. २) शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन करणे ३) शाळांसाठी,तसेच समाजासाठी (संग्रहालये, ग्रंथालये) परस्पर संवादी प्रदर्शनांचे आयोजन. ४) प्रशिक्षण आणि कार्यशाळेद्वारे कौशल्य विकास ५) शेअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर: उपकरणे, डेटाबेस, संशोधन सुविधा, गैरमालकीचे सॉफ्टवेअर, गैरमालकीचे डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा एकमेकांना वापर करू देणे. ६) उपाय आणि तंत्रज्ञानाचे उपयोजन: स्थानिक समस्येचे तांत्रिक किंवा वैज्ञानिक उपाय (पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता आणि तत्सम) ७) नवोन्मेषकांसोबत काम करणे: ग्रामीण आणि स्थानिक नवकल्पकांना तांत्रिक सहाय्य, विशिष्ट समस्या सोडवणे. ८) वैज्ञानिक आणि तांत्रिक माहिती सोप्या आणि स्थानिक भाषेत प्रसारित करणे, यासाठी लेख आणि मुलाखतींसारखे माध्यम वापरणे. ९) उच्चस्तरीय वैज्ञानिक कौशल्ये आणि संशोधन सुविधांचे प्रशिक्षण. १०) महत्त्वपूर्ण संशोधन समस्या आणि/किंवा संशोधन कार्याचा शोध लोकप्रिय विज्ञानात रूपांतरित करणे(वृत्तपत्रे/नियतकालिकांसाठी लेख/कथा आणि सामाजिकसह इतर मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे) ११) समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी व लोकप्रिय विषयांवर टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रे, मासिके, सोशल मीडियाद्वारे वैज्ञानिक भाषणे देणे. १२) सामाजिक आव्हानांसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना मदत करणे. १३) जागृती निर्माण करून महिला आणि समाजातील दुर्बल घटकांचे विज्ञान-तंत्रज्ञानाधारे सक्षमीकरण करणे.

‘एसएसआर’च्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संस्थांची स्थापना केली जाईल. देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक ‘अँकर सायंटिफिक इन्स्टिट्यूट’ (ए.एस.आय)असेल. विज्ञान संस्थांतील कर्मचाऱ्यांना या उपक्रमाबाबत जाणीव करून देण्याचे काम ही संस्था करेल. त्याबाबत सतत संपर्क-संवाद ठेवेल. सर्व जिल्हा ‘ए.एस.आय’ संस्था संबंधित राज्य परिषदांशी जोडल्या जातील. सर्व राज्यांच्या ‘विज्ञान-तंत्रज्ञान परिषदा’ प्रोग्राम मॉनिटरिंग युनिट(पीएमयू) शी राष्ट्रीय स्तरावर जोडलेलेल्या असतील. विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने स्थापलेल्या राष्ट्रीय सल्लागार समिती या सर्वोच्च समितीमधे विज्ञान क्षेत्रातील विविध संबंधित घटकांचा समावेश आहे आणि तिचे सदस्य ‘पीएमयू’ संबंधीचे धोरण विकसित करण्यासाठी जबाबदार असतील.

वैज्ञानिकांच्या सामाजिक उत्तरदायित्वामुळे विविध सामाजिक समस्यांवरील उपाय शोधता येतील. समाजातील उपेक्षित घटकांना लाभ होईल. विज्ञानाच्या क्षेत्राचा विस्तार करणे आणि त्याचे समाजाला फायदे मिळवून देणे शक्य होईल. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले जाईल. त्यांची आवड जोपासली जाईल. विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील इतर संशोधकांसोबत प्रयोगशाळांमध्ये सहकार्य प्रस्थापित होईल. विज्ञान व तंत्रज्ञानाची संसाधने सर्वांना वापरता यावीत, यासाठी तशी संधी निर्माण होईल. कौशल्य विकास आणि वैज्ञानिक ज्ञानप्रसार यांच्यात सुधारणा करण्यासाठी प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध होतील. सूक्ष्म व लघु उद्योगांना त्यांची एकूण उत्पादकता वाढविण्यात मदत केली जाईल. ग्रामीण भागातून आलेल्या नवकल्पनांच्या पूर्ततेसाठी वैज्ञानिक सहाय्य सुलभपणे होऊ शकेल. वैज्ञानिकांच्या सहभागामुळे नि कार्यामुळे महिला, वंचित आणि दुर्बल घटक समाजाचे सक्षमीकरण होऊ शकेल. पर्यावरणासह देशाची शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करतानाच नागरिकांचे जीवन सुधारून समाजात मूलभूत परिवर्तन करण्याची क्षमता वैज्ञानिकांच्या सामाजिक उत्तरदायित्वामध्ये आहे.अर्थात कागदावरील योजनेचे चित्र आकर्षक असले तरी सर्व घटक किती जिद्दीने आणि मनापासून त्यासाठी काम करतात, यावरच या देशव्यापी योजनेचे यश अवलंबून असेल.

(लेखक ‘इस्रो’चे माजी समूह संचालक आहेत.)

Web Title: Dr Suresh Naik Writes Social Objectives Education Development Science

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top