अन्नपदार्थ टिकतील तीन वर्षे

dr vaishali bambole
dr vaishali bambole

आपण कोणाला सकाळी शिजलेले अन्न रात्री खायला दिले तर नक्कीच चेहरा पडलेला दिसेल आणि विशेष म्हणजे, हेच अन्न वर्षभरानंतर कोणी खायला दिले तर आपण धजावणारसुद्धा नाही, मात्र आता हे सहज शक्‍य आहे. एका विशिष्ट पद्धतीने जतन केलेले अन्न एक- दोन नव्हे, तर तब्बल तीन वर्षांनंतरही आहे त्या चवीसह खाणे आता शक्‍य झाले आहे. भारतीय आहारातील ‘रेडी टू इट’ म्हणून ओळखले जाणारे इडली, ढोकळा (पांढऱ्या रंगातील) आणि उपमा हे तीन शिजलेले पदार्थ आता तीन वर्षभरानंतरही त्याच चवीने आणि आवडीने आपण खाऊ शकतो.

झटपट भूक भागविण्यासाठी अनेकजण ‘पॅकेट फूड’ला प्राधान्य देतात. मात्र, असे ‘पॅकेट फूड’ खाताना आरोग्यासाठी ते किती फायदेशीर आहे, असा विचार केला जात नाही. विशेष बाब म्हणजे, शिजलेल्या अन्नावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून ते अधिक काळ कसे टिकवता येईल यादृष्टीने मुंबई विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले आहे. यासाठी रशियन बनावटीच्या इलेक्‍ट्रॉन बीम रेडियशन तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. याकामी बीआरसीच्या बीआरआयटी (बोर्ड ऑफ रेडियशन अँड आयसोटोप टेक्‍नोलॉजी) येथील या तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. हे तंत्र गेल्या पन्नास वर्षांपासून येथे कार्यरत आहे. आजमितीस गामा रेडियशनच्या मदतीने कच्चे अन्नपदार्थ परदेशात निर्यात केले जातात. एका देशातून दुसऱ्या देशात अन्न किंवा कच्चे पदार्थ पाठवताना आंतरराष्ट्रीय मानांकनाचा प्रामुख्याने विचार होतो. म्हणून ‘रेडी टू इट’ प्रकारातील शिजलेले अन्न अधिक काळ कसे टिकवता येईल यासाठी प्रामुख्याने हे संशोधन मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या ‘बायोनॅनो लॅब’मध्ये हाती घेण्यात आले. यासाठी इडली आणि ढोकळा (पांढऱ्या रंगातील) भारतीय आहार गटातील दोन पदार्थांचे आयुर्मान दोन वर्षांनी (शेल्फ लाइफ) वाढले आहे. यासाठी विशिष्ट पॅकेजिंग सर्वांत महत्त्वाचे असते. या पॅकेजिंगसाठी पॅकेटसवर रेडियशन आणि तत्सम प्रक्रिया करण्यात आली.  ही संकल्पना पूर्णत्वास नेताना यावर मायक्रोबायोलॉजिकल, कलर, टेक्‍श्चर आणि सेन्सरी यांचे विश्‍लेषण करण्यात आले असून, त्याची पौष्टिक गुणवत्ताही तपासण्यात आली. ठरावीक काळानंतर त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. सुरवातीला इडलीचा रंग, आकार आणि चव यामध्ये काही फरक पडतो का हे तपासण्यात आले. कालबद्ध नियोजन करून आणि विशिष्ट देखरेखीखाली ते तपासण्यात आले. तीन वर्षांनंतरही इडलीचा रंग, आकार आणि चवीमध्ये कोणताही फरक पडला नाही हे विशेष. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही रासायिनक पदार्थांचा वापर केला गेलेला नाही.

खरेतर ‘रेडी टू इट’ पदार्थातील इडली, थेपला, थाळीपीठ, उपमा, ढोकळा (पांढऱ्या रंगातील) हे आपल्याला सर्वत्र उपलब्ध होतात. या शिजलेल्या पदार्थांचे आयुर्मान खूप कमी असते. मात्र अशा विशिष्ट शास्त्रीय पद्धतीने पॅकेजिंग करून आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तत्सम प्रक्रिया करून आता हे शिजलेले अन्न वर्षभर टिकू शकेल. विकसनशील देशात असे अन्न अधिक फायदेशीर ठरू शकेल. त्याच पद्धतीने हे अत्यंत कमी खर्चाचे असून परवडण्यासारखे असते. आबाल-वृद्ध, कामात व्यग्र असलेले, खर्च आणि आरोग्य या घटकांना प्राधान्य असलेल्या ग्राहकांची या पद्धतीला पसंती मिळू शकते. ही प्रक्रिया संपूर्णतः पॅकेज्डबेस्ड असल्यामुळे अन्नपदार्थाचे तापमान वाढणे, किंवा अन्न शिजवणे किंवा अधिक शिजवणे हे होत नाही. अरासायनिक पद्धत असल्यामुळे त्याच्यातील पौष्टिकता कायम राहते. हे शास्त्रीय पद्धतीने टिकवलेले अन्न असल्यामुळे कर्करुग्ण, ऑर्गन ट्रान्सप्लान्ट अशा वर्गवारीतील विशेष रुग्णांना हे अन्न अधिक सुरक्षित असू शकेल. त्याचबरोबर बचाव कार्यादरम्यान किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अन्नाची गरज भासते. अशा वेळी बचाव यंत्रणेकडे ‘टिकणाऱ्या’ अन्नाची तजवीज करता येईल.

अशा प्रकारच्या अन्नात अधिक सकस आणि त्या अन्नाचे कोणतेही दुष्परिणाम उद्‌भवणार नाही याचीही विशेष काळजी घेतली जाते. तसेच, सीमावर्ती भागात डोळ्यांत तेल ओतून किंवा थंड प्रदेशात देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना तेवढे दिवस पुरेल असे अन्न देणे ही प्राथमिकता ठरते. त्याचबरोबर अंतराळ मोहिमेत अशा सुरक्षित अन्नाची गरज भासते. त्या दृष्टिकोनातून विशिष्ट पद्धतीने जतन केलेले अन्न पुरविण्यासाठी ही पद्धत अधिक चांगली आणि आरोग्यदायी ठरू शकेल. त्यामुळे काळाची गरज म्हणून ‘इलेक्‍ट्रॉन बीम टेक्‍नॉलॉजी’च्या मदतीने अन्न सुरक्षित करणे हे जास्त फायदेकारक आणि सुरक्षित ठरू शकेल.
(लेखिका - मुंबई विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागप्रमुख आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com