अज्ञेयाचा एकांडा प्रवासी

श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतंय. या निमित्त वर्षभर जी. एं. च्या साहित्याचं जागरण विविध प्रकारे होणार आहे.
Oil Painting
Oil PaintingSakal
Summary

श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतंय. या निमित्त वर्षभर जी. एं. च्या साहित्याचं जागरण विविध प्रकारे होणार आहे.

श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतंय. या निमित्त वर्षभर जी. एं. च्या साहित्याचं जागरण विविध प्रकारे होणार आहे. जी. ए. कुटुंबीय, म. सा. प. आणि अक्षरधारा यांच्यावतीने १० व ११ जुलै रोजी पुण्यात विविध कार्यक्रम होत आहेत. त्यानिमित्त.

जी. ए. हा लेखक जाणत्या वाचकाच्या वाचनप्रवासात येतोच; पण जे फारसं वाचत नाहीत त्यांनाही जी. ए. ऐकून माहीत असतात. ग्रेस, चित्रे, कोलटकर, सारंग आणि श्याम मनोहर यांच्याप्रमाणेच! जी. ए. नावाच्या एका गारुडाच्या इंद्रजालात वाचक अडकला की तो कायमचा समजावं. पूर्णतया समजले नाहीत, तरी काही लेखक वाचायचे असतात, जितके समजतील तितके समजून घ्यायचे असतात, अशा प्रतलावरचे नि लोकविलक्षण गुणवत्तेचे काही लेखक असतात. जी. ए. त्यातले लेखक आहेत.

१० जुलै १९२३चा जी. एं. चा जन्म. एकसंबा (ता. चिकोडी) इथला. १९३९ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयातून इंग्रजी विषय घेऊन बी. ए. झाले. १९४६ मध्ये एम.ए झाल्यावर काही काळ मुंबई व इतरत्र नोकऱ्या करुन अखेर धारवाडच्या जनता महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. निवृत्तीपर्यंत त्यांचे तिथेच वास्तव्य होते. शेवटच्या काही वर्षात ते पुण्यात होते आणि तिथेच ११ डिसेंबर १९८७ ला आजाराने त्यांचा मृत्यू झाला. जी. एं. चा हा अगदी थोडक्यात जीवनपट. १९४० पासून म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षापासून त्यांचं कथालेखन सुरु झालं. सुरुवातीच्या त्यांच्या कथा ‘चित्रा’, ‘धनुर्धारी’, ‘चित्रमयजगत’ इत्यादी नियतकालिकांमधून प्रसिद्ध होऊ लागल्या. १९४२ पासून त्यांच्या कथा ‘सत्यकथे’त प्रसिद्ध होऊ लागल्या. माणूस नावाचा बेटा या त्यांच्या कथेनं विचक्षण वाचकांचं लक्ष वेधून घेतलं. ‘निळासावळा’,‘पारवा’,‘हिरवे रावे’,’रक्तचंदन’,‘काजळमाया’,‘सांजशकून’ इत्यादी आठ कथासंग्रह त्यांच्या हयातीत आणि ‘कुसुमगुंजा’, ‘आकाशफुले’ आणि ‘सोनपावले’ (१९९१) हे संग्रह त्यांच्या मृत्युनंतर प्रकाशित झाले. ६३ वर्षांच्या आयुष्यातली १९४० ते १९९१ अशी उणीपुरी पन्नास वर्ष ह्या लेखकाच्या असामान्य प्रतिभेचं दर्शन वाचकांना घडत होतं. मराठी वाचकांच्या तीन-चार पिढ्यांना जी.ए. या लेखकानं भारावून टाकलं. आजही जी.एं.च्या लेखनाचे चाहते आणि त्यांचे अभ्यासक यांना त्यांच्या कथा भारून टाकत आहेतच.

शोकात्म जीवनदृष्टी असणाऱ्या या लेखकाच्या कथांमधून घडणारं मानवी जीवनाचं दर्शन भयचकित करणारं तर आहेच; पण त्याचवेळी वाचकाच्या जाणिवेचा गाभा संपन्न करणारंही आहे. चंद्रावळ, राधी, सोडवण, भोवरे, गुंतवळ, कांकणे, तुती, कैरी, घर, बळी, रात्र झाली गोकुळी, गुलाम, प्रवासी, ऑर्फीयस, विदूषक, प्रदक्षिणा या त्यांच्या कथा म्हणजे मराठी साहित्यातली अजोड लेणी आहेत. कोरीव, भरीव आणि भव्य !

रूपककथा या कथाप्रकाराचं सामर्थ्य जोखून त्यालाही जी.एं.नी वेगळीच उंची प्राप्त करुन दिली. पारवा, रमलखुणा, सांजशकून, पिंगळावेळ इत्यादी संग्रहांत मिळून जवळजवळ ४५ रूपककथा त्यांनी लिहिल्या. प्रवासी, इस्किलार यांसारख्या त्यांच्या रूपककथा दीर्घकाळ स्मरणात राहाव्यात अश्या आहेत. आपल्या वाढत्या समजेबरोबर पुनःपुन्हा नव्याने नवे अर्थ पदरात घालणाऱ्या. नवे दर्शन घडवणाऱ्या आणि नव्याने व्याकूळ करणाऱ्या.

कुणी त्यांना दुःखाचा महाकवी म्हणून गौरवलं तर कुणी नियतीवादी, शून्यवादी, कुणी निराशावादी म्हणून निंदलं. पण दुःख हे सकारात्मक मूल्य मानणाऱ्या या लेखकानं आपल्याच चालीने चालत राहून मानवी दुःखाची, अगतिकतेची आणि मानवी संबंधांना चिकटून येणाऱ्या वेदनेच्या अस्तराची असंख्य रुपं दाखवली. “स्थलकाळात असणारी मानवी आयुष्याची सुख-दुःखे आणि त्यांच्या तळाशी असणारे अविनाशी सत्य यांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न गंभीर प्रकृतीचा कथाकार करीत असतो.” असं त्यांनी म्हटलं आहे, ते त्यांना स्वतःला तंतोतंत लागू पडतं. मुग्धाची रंगीत गोष्ट, बखर बिम्मची, ओंजळधारा आणि अमृतफळे अशी कुमार वाचकांसाठी त्यांनी लिहिलेली पुस्तकं प्रौढ वाचकांनाही तितकीच वाचनीय वाटतात. याशिवाय ‘रान,गाव,शिवार,’ ‘रानातील प्रकाश’, ‘स्वातंत्र्य आले घरा’, ‘वैऱ्याची एक रात्र’, ‘एक अरबी कहाणी’, ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ हे त्यांनी केलेले अनुवादही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ‘माणसे, अरभाट आणि चिल्लर’ हे आत्मनिवेदनात्मक पुस्तक त्यांच्या मृत्युनंतर प्रकशित झालं.

जी. एं. ना पत्र लिहिण्याचं जणू व्यसन होतं. प्रत्यक्ष भेटी टाळणारे जी.ए. पत्रांमधून मात्र भरभरून लिहित राहिले. अक्षरशः असंख्य पत्र त्यांनी लिहिली. त्यांच्या मृत्युनंतर या पत्रांचे चार खंड प्रकाशित झाले. या पत्रांमधून त्यांचं अफाट वाचन, चित्रे, संगीत आणि चित्रपट यांचे अगणित संदर्भ, प्राणी-वनस्पती यांच्याविषयीचं ज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांविषयीचं चिंतन प्रकटलं आहे. त्यामुळे त्यांना साहित्यकृतीचं मोल प्राप्त झालं आहे.

जनसंपर्क टाळणारा,सभा-संमेलनांना दूर राखून आपले लेखकपण अबाधित ठेवू इच्छिणारा हा प्रतिभावंत नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला. त्याचा आणि त्याच्या लेखनाचा एक दबदबा जनमानसात कायम राहिला. ज्येष्ठ समीक्षक हातकणंगलेकर म्हणतात तसे ‘जी. ए. हे हरतऱ्हेच्या सतरंज्या तयार करुन बाजार काबीज करण्याची इर्षा बाळगणारे लोकप्रिय कथाकार नव्हते. तर मंद दिव्याच्या प्रकाशात एकेक टाका घालून अभिजात गुणवत्तेचे गालिचे विणणारे कलावंत होते. या गालिच्यांचे मूल्य कालातीत असते.’ म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त साधून आपणच पुन्हा जी. एं. च्या साहित्याच्या झगझगीत झुंबराची नजरबंदी अनुभवायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com