सुखी कुटुंबाचे घर

एखाद्या घरात गेल्यावर नेहमी खूप प्रसन्न वाटतं. तेथील माणसे खूप आनंदी असतात, फ्रेश असतात. सगळीकडे सकारात्मक ऊर्जा भरून राहिली आहे, असं वाटतं.
House
Housesakal

एखाद्या घरात गेल्यावर नेहमी  खूप प्रसन्न वाटतं. तेथील माणसे खूप आनंदी असतात, फ्रेश असतात. सगळीकडे सकारात्मक ऊर्जा भरून राहिली आहे, असं वाटतं. भले मग ते घर सांपत्तिकदृष्ट्या श्रीमंत असो वा नसो. तेथे रहाणाऱ्या व्यक्तींमध्ये आपसात खूप प्रेम, स्नेह, आदर असतो. वेगवेगळ्या वयोगटांतील, नात्यातील, पिढीतील व्यक्तींमध्ये एक छान आपलेपणा असतो. आपल्यालाही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून, वावरण्यातून मोकळेपणा आणि सकारात्मक संवेदना जाणवतात.  तेथे वारंवार जावसं वाटतं. असं कुटुंब समृद्ध असतं. या समृद्धीचे सहा सोपान असतात. प्रत्येक व्यक्तीची  सकारात्मक  मानसिकता, प्रत्येकाचं उत्तम  आरोग्य, एकमेकांमधील विश्वासावर, आदरावर, प्रेमावर आधारित नातेसंबंध, दुसऱ्याला आनंद देण्याची वृत्ती, सुख किंवा दुःख वाटून घेण्याची वृत्ती आणि अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत समाधानी रहाण्याची, एकोप्याने राहण्याची  वृत्ती. 

आता हे सगळं जमवून आणायचं असेल तर कुटुंबातील प्रत्येकासाठी काही कानमंत्र आहेत. आपण तीन पिढ्यांचे कुटुंब गृहीत धरूया. उदा. घरातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा. मधली पिढी म्हणजे नवरा-बायको व तरुण पिढी म्हणजे मुले.

१. कुटुंबसंस्थेवर विश्वास ठेवा. इतरांबरोबर आनंदाने, स्नेहबंधनाने आपण रहातो, तेव्हा सर्वांचंच व्यक्तिमत्त्व फुलू शकतं, ह्यावर विश्वास ठेवा. विपरीत परिस्थितीतून वर आलेल्या व्यक्ती, संपूर्ण कुटुंब आपण पहातो. त्यामागे व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबरच कुटुंबातील प्रेम , एकमेकांसाठी केलेला त्याग, धैयाने परिस्थितीशी दिलेली झुंज हे सगळं असतं. २. कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व, भावनिक वीण ही वेगळी असू शकते. भावनिक सहनशीलतेची पातळी वेगळी असू शकते. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे लहानसहान कारणांवरून खटके उडणार नाहीत. ३. व्यक्ती आतून स्वस्थ, शांत असते तेेव्हा आणि तेव्हाच ती स्वत:ला आणि दुसऱ्याला आनंद देऊ शकते. आपण तसे आहोत ना, हे तपासा. मोकळेपणाने बोला. आवश्यक तर तज्ज्ञांची मदत घ्या. स्वस्थतेसाठीचे व्यायाम करा. उदा. ध्यान, योगासने इत्यादी. ४. अहंकार आड येऊ देऊ नका. समोरच्या व्यक्तीलाही स्वतंत्र मतं असू शकतात हे मान्य करा. निर्णय एकत्र चर्चा करून घ्या. सर्वांची मते विचारात घ्या. एकमेकांशी बोलताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मला समोरच्याला आनंद द्यायचाय, ही भावना महत्त्वाची. ५. ज्येष्ठ पिढीने तरुणांना आवश्यक ते स्वातंत्र्य द्यावे. आमच्या वेळेला असं होतं... असा धोशा लावू नये. काळ बदलत रहातो. आपल्यालाही बदलायला हवे. नवीन पिढीनेही ज्येष्ठांच्या सगळ्याच गोष्टी, विचार टाकाऊ आहेत, असा विचार करू नये. त्यांचा योग्य आदर ठेवावा. ६. कुटुंबातील सदस्यांमध्ये मोकळा संवाद असावा. त्यासाठी नियोजित वेळी एकत्र यावे. साहित्य, संगीत इ. विषयांवर गप्पा माराव्यात. ७. काळ बदलतो आहे. तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन आयुष्यात अपरिहार्य आहे. घरातील तरुण पिढी तो करणारच. त्यांना त्या बाबतीत स्वातंत्र्य द्यायलाच हवं. पण त्याचा दुरुपयोग किंवा त्यातच वेळ काढत रहाणं, ही भावनिक समस्या किंवा अस्वस्थतेला वाट मिळवून देणं असू शकतं. अशावेळी प्रेमाने समजावून सांगणं वा तज्ज्ञांची मदत घेणं आवश्यक. ८. लग्न जमवणं हा एक महत्त्वाचा मतभेदाचा मुद्दा असतो. ह्या बाबतीत मुलगा किंवा मुलगी ह्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. फक्त निवडीसाठीचे निकष काय असावेत ह्या बाबतीत मोकळेपणाने संवाद व्हावा उदा. निर्व्यसनीपणा, चारित्र्य, इत्यादी. परंतु कुठलंही दडपण आणू नये. ९. सध्याच्या काळात मित्र किंवा मैत्रिणी असणं हे समाजव्यवस्थेचा भागच बनला आहे. त्याबाबतीत मुला, मुलींना टोकू नये. फक्त मर्यादांची व धोक्यांची जाणीव करून द्यावी. मुलामुलींनीही ही बाब समजून जबाबदारीने मैत्र जपावे. चांगला मित्र किंवा मैत्रीण हे बलस्थानही असू शकतं. १०. सासू-सून नातं हे नाजूक प्रकरण असू शकतं. पण ह्याही बाबतीत सासूबाईंनी सुनेला जास्तीत जास्त स्वातंत्र्य द्यावं. आता काळ बदलला आहे. मुली सुशिक्षित असतात, त्यांची संसाराबाबत स्वतंत्र मतं असू शकतात, हे लक्षात घ्यावं. त्याचबरोबर आपला काळ संपला, असं वाटून हताशही होऊ नये. सुनेनेही सासूला आवश्यक तो आदर द्यावा. सासू-सुनेच्या नात्यातील तणावांमुळे मुलावर विलक्षण ताण येऊ शकतो, हे दोघींनीही लक्षात घ्यावे. ११. घरात लहान मुलांसमोर कुणीच कुठलेही वादविवाद करू नयेत. अपशब्द उच्चारू नयेत. लहान मुलं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ, कणखर होणं ही काळाची गरज आहे.

जुनी पिढी आणि नवीन पिढी यांच्या दृष्टिकोनांमध्ये फरक असणारच; पण सुवर्णमध्य काढता येणं ही कला आहे. एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना, आदर, प्रेम निर्माण झालं, ‘मीपणा’ सोडता आला की ते सहज शक्य आहे. आनंद आणि मन:शांती ह्या दोन शब्दांसाठीच आपला जगण्याचा प्रवास आहे. कुटुंबाचं प्रेम हे त्या प्रवासासाठी एक बलस्थान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com