मन मंदिरा... : प्रश्न उद्योग क्षेत्रातील जोडप्यांचे

Couple
Couple

उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण जोडप्यांवर अंतर्गत नि बाह्य ताण असतात.  त्यांना यशस्वीपणे तोंड देता आलं नाही आणि नेमकं मला आयुष्यात कशानं समाधान, सुख मिळणार आहे, हे कळलं नाही की सहजीवनात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुटेपर्यंत ताणलं जाऊ शकतं. दोघंही अस्वस्थतेच्या आजाराचे बळी ठरू शकतात.

समस्यांचे स्वरूप पाहूया. -
१) दोघांवरही अतिशय ताण आहे. दोघांचीही एकाग्रता, आत्मविश्वास कमी झालाय. कामात लक्ष लागत नाही.  २. शारीरिक तक्रारी. अशक्तपणा वाढतो आहे. आयुष्यातला आनंद नाहीसा झाल्यासारखं वाटतंय. ३. दोघांतील संवाद संपल्यासारखाच आहे. मूळचे आनंदी स्वभाव चिडचिडे झालेत. थकव्यामुळे लैंगिक संबंध जवळजवळ नाहीतच. कधी जवळ आलेच तर त्यात एकसुरीपणा जाणवतो. ३. शनिवार, रविवार सुट्टी असते. पण पूर्वी दोघंही एकत्रितपणे नियोजन करून निवांतपणा उपभोगायचे तो आनंद संपलाय. उणीदुणी काढण्यातच वेळ जातो. आपण किती टोकाचं बोलतोय ह्याचं भान हरवायला लागलंय. ५. भरपूर कमाई असल्यामुळे गरज नसताना भरपूर वस्तू आल्यात; पण तरीही अतृप्तीच जाणवते आहे. ६. मुख्य म्हणजे ऑफिसमधील, करिअरमधील ताणतणाव २४ तास दोघांना वेढून राहिला होता आणि त्यात दोघांच्याही स्वस्थतेला ग्रहण लागलंय.

निकोप दृष्टिकोन जोपासायला शिकणं, चंगळवादाला लगाम घालणं, सर्व बाबतीत कुठे थांबायचं हे कळणं, करियरइतकंच स्वत:तल्या व इतरांमधल्या माणूसपणाला महत्त्व देणं ह्या गोष्टी शिकणं दोघांसाठी आवश्यक ठरतं. नेमकं काय आणि का घडतंय ह्या सर्वांच्या बाबतीत, ते पाहूया.
१. खासगी उद्योग क्षेत्रातील व्यक्ती उद्दिष्टलक्ष्यी असतात. उद्दिष्ट (टार्गेट) पूर्ण करणे, सतत ऑफिस डोक्यात ठेवावं लागणे ह्यामुळे कुटुंबियांसाठी आणि समाजात मिसळण्यासाठी पुरेसा वेळ देत येत नाही.
२.निवांतपणा अनुभवणं, मनोरंजन ह्यासाठी वेळ देता येत नाही.
३. स्पर्धा आणि असुरक्षितता ह्यामुळे ताण असतो.
४. जेवणाच्या, झोपेच्या वेळा नीट न पाळता आल्याने शरीरातील जैविक घड्याळ बिघडते.
५. हळुहळू अस्वस्थतेचा आणि नैराश्याचा आजार पाय पसरायला लागतो. भरपूर संपन्नता असूनही स्वास्थ्य नाहीसं होऊ लागतं. व्यसनं वाढीस लागतात. ह्यावर उपाय आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रथम एक गोष्ट मान्य करुया. ह्या क्षेत्रातील बाह्य परिस्थिती अशीच राहणार किंवा बिकट होत जाणार. त्याला तोंड देण्यासाठी आपण आतून शांत, कणखर, स्वस्थ व्हायला हवं. कसं ?
१''बाह्य’ वातावरण कसंही असो, आपण ‘आतलं’ वातावरण बदलायला हवं. त्यासाठी काही गोष्टी शिकाव्यात. बदलायला हव्यात. थोडक्यात मेंदूचं (मनाचं) रिप्रोग्रॅमिंग करायला हवं.
२. तणाव नियोजनाच्या पद्धती शिकून घ्यायला हव्यात. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, अनुवांशिक गुण, स्वभाव, मासिक जडणघडण वेगळी असते. त्यामुळे तणाव नियोजनाच्या पद्धतीही वेगळ्या असू शकतात.
३.आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवंय? पुरेसा पैसा हवाच, वैभवही हवं, पण फक्त पैसा की पैशाबरोबरच स्वास्थ्य, मन:शांती? पैशानं सुखसोयी मिळतील, पण आनंद ही मनाची अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागेल. एका मर्यादेनंतर भोगलालसा, चंगळवाद फक्त दुःख निर्माण करतात, हे लक्षात ठेवावं.
४. ताण समजून घेणं व त्यांची नोंद करणं महत्त्वाचं - आपल्यावर सध्या कुठले ताण आहेत? कुठल्या गोष्टींची काळजी वाटत रहाते? कसली भीती वाटते? कशामुळे राग येतो? तो ताब्यात राहतो का? कशामुळे वाईट वाटतं ? कुठला अपराधगंड वाटत राहतो का? शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे, अशा अनेक गोष्टींची नोंद करावी. हे एक प्रकारचे भावनांचे ऑडिट असेल. तज्ज्ञांच्या सहाय्याने त्यावरचे उपाय शोधावेत. तज्ज्ञांशी बोलल्यामुळे ताणाचा निचरा व्हायला मदत होईल.
५. स्वयंसूचना व creative visualization ची तंत्रे शिकून घ्यावीत. तज्ज्ञांकडून ‘स्विच ऑन स्विच ऑफ’ची तंत्रे शिकून घ्यावीत ज्यायोगे ऑफिस व वैयक्तिक आयुष्य ह्यात सीमारेषा आखता येईल. ऑफिसचे ताण वैयक्तिक आयुष्यापासून दूर ठेवता येतील. योग्य मार्गदर्शनाने आणि प्रयत्नांनी हे साध्य होऊ शकतं.
६. आपल्या आयुष्यातली इतर माणसं, मित्र आणि विशेष करून जोडीदार, त्यांच्याबरोबरची नाती महत्त्वाची आहेत, हे समजून घ्यावे. जोडीदार नोकरी करत असेल तर त्याच्या मन:स्थितीचा विचार आपण करायला हवा. त्याची काळजी करायला हवी. त्याचे ताण समजून घावेत. रात्री कितीही उशीर झाला तरी मायेचा स्पर्श आणि  जिव्हाळ्याचं बोलणं, मन मोकळं करणं हे नियमित करायला हवं. त्यातूनच दोघांनाही ताकद मिळेल. कर्तृत्वाची शिखरं पादाक्रांत करताना ‘आतला’ मी आनंदी, स्वस्थ, कणखर रहाणं खूप महत्त्वाचं. प्रयत्नांनी ते शक्य आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com