मन मंदिरा... : आनंदाचे डोही, आनंद तरंग

मन मंदिरा... : आनंदाचे डोही, आनंद तरंग

“तमसो मा ज्योतिर्गमय” ह्या बृहदारण्यक उपनिषदातील प्रार्थनेतील ओळीचे सूत्र धरून जायचं तर आपल्याला सर्वार्थांनी “अंधारातून प्रकाशाकडे” जायचंय. आणि म्हणूनच सातत्यानं जीवनाच्या चांगल्या, प्रकाशमय अशा बाजूकडे आपल्याला पहायला हवं. चांगलं तेच घडेल हा दृष्टिकोन कुठल्याही परिस्थितीत, अगदी विपरीत परिस्थितीत सुद्धा ठेवायला हवा. त्यासाठी आपल्या मनाचं, विचारसरणीचं प्रोग्रॅमिंग व्हायला हवं. सातत्यानं सकारात्मक आणि फक्त सकारात्मक विचार असायला हवा. आपला आयुष्याकडे, एकूणच जगण्याकडे पहाण्याचा तसा दृष्टिकोन असेल तरच आयुष्याकडून आपल्याला भरभरून आनंद, सुख, मन:शांती आणि यश मिळत जातं. अर्थपूर्ण आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता असते.

या दृष्टिकोनात पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो - सकारात्मक विचार, सृजनात्मक विचार, विवेकी विचार, उत्साह, आनंदी रहाण्याची आस, ध्येय ठरवणे आणि त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, कुठल्याही विपरीत परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता, स्वत:ला व इतरांना प्रोत्साहित करणे, अपयश आलं तरी पुन्हा पुन्हा यशासाठी प्रयत्न करत रहाणे, स्वत:च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असणे, स्वत:तल्या कमतरतांची जाणीव असणे व त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे, विनाकारण भूतकाळात न रमता वर्तमानकाळ आणि भविष्यकाळात काय करू शकू, ह्याचा विचार करणे आणि मुख्य म्हणजे समस्यांमध्ये अडकून न रहाता तोडग्यांचा विचार करणे. पॉझीटिव्ह दृष्टिकोन रुजण्यासाठी पुढील गोष्टी करता येतील - १. आनंदी असणं ही एक वृत्ती आहे. दृष्टीकोन आहे. त्यासाठी आनंद निर्माण होणारा प्रसंगच घडायला हवा असं नाही. मी नेहमी आनंदीच राहीन हा विचार स्वत:त भिनवायला हवा. तसं झालं की आपोआपच आसपासच्या घटनांमध्ये मन आनंद शोधायला लागेल. शेजारचं किंवा घरातलं रांगतं लहान मुल प्रथमच चालायला लागताना दिसलं, कुणाला पदवी मिळाली, कुणाला नोकरी मिळाली, कुणाचं पुस्तक प्रकाशित होतंय, कुणाचं लग्न ठरलं. लहान लहान गोष्टी सतत आपल्याला आनंद देत असतात. आपण त्या आपल्याच मनात साजऱ्या करायला हव्यात.

१. सकारात्मक वृत्ती असली की आकाशातलं चांदणं, हिरवळीवर अनवाणी चालणं, अचानक आलेला पाऊस, शांतपणे क्षितिजावर विसर्जित होत असलेला सूर्य सगळ्यातच आनंद घेता येतो.

२. सकाळच्या रुटीनची आखणी करावी. त्यात शारीरिक, मानसिक व्यायाम, ध्यान ह्यांचा जरूर अंतर्भाव असावा. सेरोटोनीन आणि इतर उपयुक्त संप्रेरके स्त्रवतील. उत्साह आणि चांगल्या मूडमध्ये दिवसाची सुरवात होईल.

 ३.''कर्त्या’ची भूमिका, ‘कर्त्या’चा भाव मनात ठेवावा. म्हणजेच आपण जे काम करतोय, जी कृती करतोय त्याची जबाबदारी मनाने स्वीकारायला सुरवात करावी. आपोआप दृष्टिकोन बदलायला लागेल. मीच माझ्या भविष्याचा, आयुष्याचा शिल्पकार आहे हा भाव मनात जोपासावा.त्यानं दृष्टीकोन सकारात्मक व्हायला लागेल.

४. माझ्या ‘वाटया’ला आलेलं आयुष्य असा भाव न ठेवता, ‘माझ्यासाठी’, माझ्या ‘आनंदा’साठी निर्माण झालेली जीवन जगण्याची संधी हा भाव जगताना ठेवायला हवा. आयुष्यात येणारी विपरीत परिस्थिती किंवा संकटं मला काहीतरी ‘शिकवून’ जाण्यासाठी आहेत. मला जास्त जास्त कणखर बनवत आहेत. मला उन्नतीप्रती नेत आहेत. माझ्या आयुष्याचा ‘खेळ’ रंगतदार करत आहेत, ही भावना ठेवायला हवी. त्यासाठी साक्षीभाव, ‘माइंडफुलनेस’सारखी तंत्रे शिकून घेता येतील. मुळात ह्या जगात गांभीर्याने घ्यावी, अशी एकही गोष्ट नाहीय. हे आयुष्य म्हणजेच एक कॉस्मिक विनोद आहे असंही म्हणता येईल.

५. स्वत:चा स्वत:शी असलेला संवाद सकारात्मक असायला हवा. मी माझ्या आत एक संरक्षक भिंत निर्माण करायला हवी, ज्यायोगे इतरांनी केलेली अनाठायी टीका, अपमान, चुकीचे आरोप, वाईट हेतूनं आणलेलं दडपण इत्यादी माझ्यावर परिणाम करणार नाहीत . मी शांत, स्वस्थ, स्थिर राहीन. 

६. माझ्या आयुष्याला काहीतरी उद्दिष्ट असेल तर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हायला मदत होईल. मी माझ्यासाठी काही तातडीची तर काही दूर पल्ल्याची ध्येये ठरवायला हवीत. त्यानं मला काही प्रयोजन मिळेल.

७. आयुष्यात घडणाऱ्या घटना, भेटणारी माणसं ह्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी पहायला हव्यात. कितीही प्रतिकूल गोष्ट असेल तरी त्यात काहीतरी चांगलं असतंच. There can be a silver lining to a black cloud. फक्त पाहण्याची नजर हवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com