मन मंदिरा... : उत्सव अंतरंगातला

एकटं राहून शांत होण्याचा प्रयत्न किंवा एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न ह्या सगळयात जगणं सुसह्य आणि आनंदी करणं हे प्राथमिक ध्येय असावं.
मन मंदिरा... : उत्सव अंतरंगातला

पुन्हा एकदा दिवाळी आनंदाची झाली. मधला कोरोनाचा काळ अतिशय तणावपूर्ण होता. सगळ्यांसाठीच. अनेकांनी आर्थिक नुकसानीपासून जवळच्यांच्या मृत्यूपर्यंत अनेक दुःख भोगली.. पण कालप्रवाहात अशा नैसर्गिक आपत्ती अपरिहार्य असतात.. हे ही दिवस जातील. This shall to pass हे जगताना कायम लक्षात ठेवावं लागतं. आणि खरंच तसं होतंही. आपल्याला भूतकाळ विसरून वर्तमानकाळातील आनंदाचे क्षण अनुभवायचे असतात. म्हणूनच मानवी जीवनात उत्सवाचं स्थान फार महत्वाचं आहे. सार्वजनिक जीवनासाठी आणि वैयक्तिक जीवनासाठीही. आपण सर्वजण आनंद आणि मन:शांती ह्या दोन शब्दांसाठी ह्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर काही काळासाठी आलो आहोत. प्रत्येकासाठी येथील अस्तित्वाचा कालावधी वेगवेगळा आहे. पण सर्वं धडपड ह्या दोन शब्दांतून अनुस्यूत होणारी मन:स्थिती प्राप्त करण्याचीच असते.

एकटं राहून शांत होण्याचा प्रयत्न किंवा एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न ह्या सगळयात जगणं सुसह्य आणि आनंदी करणं हे प्राथमिक ध्येय असावं. उत्सवासाठी एकत्र येऊन, आनंद साजरा करणं हे आपलं बाह्य वातावरण ऊर्जामय करण्यासाठी असलं, तरी शेवटी प्रयत्न आपलं आंतरिक वातावरण आनंदी आणि शांत करण्याचाच असतो. उत्सव साजरे करण्याचे, त्यात मनापासून सहभागी होण्याचे, अनेक मानसिक, सामाजिक फायदे आहेत.

१. एकटी व्यक्ती आनंदी असेल त्यापेक्षा एकत्र येऊन समूह मन (कुटुंब किंवा समाज ) आनंदी असतं. त्याने प्रत्येक व्यक्तीच्या ऊर्जेत, आनंदात वाढ होते. आपल्याबरोबर अनेक जण आनंदी आहेत हे पाहण्यात, अनुभवण्यातही आनंद द्विगुणित होतो. तेवढ्यापुरतं काही काळासाठी एका आनंदाच्या गावात आपण रहातोय, असं वाटतं. २. समूहाची म्हणून एक ऊर्जा, एक आत्मविश्वास आणि त्यातून उत्सवाची ध्येयप्राप्ती हे खूप समाधान देणारं असतं.. ३. उत्सवा`मध्ये आपण पाचही इंद्रियांनी आनंद घेतो. आनंद निर्माण होण्यासाठी सारं शरीर सहभागी होतं अन् मनही.

मन स्वस्थ असेल तर आपण सगळं एन्जॉय करू शकतो हे तितकंच खरं. त्यासाठी मनाची धाटणी, विचार करण्याची पद्धत सकारात्मक लागते. ती प्रयत्नानं बनवता येते. अस्वस्थतेचे विचार थांबवता येत नाहीत. त्यांना पाहून, महत्त्व न देता सोडून द्यावं लागतं. मग तो विचार सुखाचा असो, दु:खाचा असो, भूतकाळाशी संबंधित असो वा भविष्याशी. बहुतेक नकारात्मक विचार हे NAT (Negative Automatic Thoughts) असतात. ते आपोआप उद्भवतात. त्याचं दायित्व घेण्याची गरज नसते. कारण आपण ते विचार तार्किकता वापरून केलेले नसतात. आपण मात्र हे वास्तव लक्षात न घेता त्या विचारांना उत्तर देतो. त्यांच्याशी भांडतो. त्यांच्यामुळे भीती वाटवून घेतो किंवा रागावतो. मग मन अस्वस्थ होत जातं. अतिविचार, अतिकाळजी ह्यातून सुटका हवी असेल तर साक्षीभावाची कला साधायला हवी.

सकारात्मकतेच्या सरावासाठीः १) काही प्रश्न स्वत:ला रोज सकाळी विचारूया- माझ्या आयुष्यात सध्या काय चांगलं चाललंय? आजचा दिवस आनंदी जावा, ह्यासाठी मी काय काय करू शकतो ? मी अशा काही गोष्टी आज करू शकतो, का की ज्यायोगे मला आनंद मिळेल आणि दुसऱ्यालाही मदत होईल? २. आसपास जे घडतंय त्यात चांगलं काय घडतंय, हे वेचण्याची,पाहण्याची मनाला सवय लावणं. ३. आयुष्यात जे चांगलं घडेल त्याचं मनापासून स्वागत करणं. त्याचा असोशीने आनंद घेणं. आयुष्य हा एक आनंदमय चमत्कार आहे. एकूणच सगळं यच्चयावत सजीव, निर्जीवाचं अस्तित्व ही एक वैश्विक प्रक्रिया आहे आणि त्यात आपला सहभाग आहे, याचा आनंद व्हायला हवा.

आईन्स्टाइन यांनी म्हटल्याप्रमाणे “There are two ways to live your life. One is as though nothing is a miracle. The other is as though everything is a miracle.” आपण हा आनंदमय चमत्कार मानायला हवा. ४. लहान लहान गोष्टींमध्ये, यशामध्ये भरपूर आनंद मानणं. बदलणारे निसर्गाचे रंग, वाऱ्याची मंद झुळूक, याचा आनंदानुभव घ्यावा. आपल्या आसपासची माणसं, त्यांच्या आयुष्यातले छोटे- मोठे आनंद यात सहभागी होता आलं पाहिजे. प्रत्येक क्षण साजरा करायला हवा. हे समजून घेतलं की कृतज्ञतेनं मन भरून येईल. व्यक्तीमध्ये संपूर्ण सकारात्मक परिवर्तन घडू शकतं. Neuroplasticity ची संकल्पना याला दुजोरा देते. फक्त हे करण्याची तीव्र इच्छाशक्ती हवी. हे सगळं प्रयत्नानं साधलं की मन खऱ्या अर्थाने उत्सवासाठी तयार होतं. तो उत्सव बाहेरच्या जगातला असतोच; पण मुख्य म्हणजे आपल्या एकट्याच्या आतल्या जगाचाही. बाहेरचा उत्सव काही काळापुरता असतो. पण आपला आतला उत्सव कायम, आपल्या आत सुरु राहतो, आयुष्यभर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com