यात्रा राजकारणापलीकडची... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi and Vishwajeet Kadam

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातही यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

यात्रा राजकारणापलीकडची...

- डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातही यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यात्रेत होत या यात्रा संकल्पनेचा घेतलेला धांडोळा...

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सामाजिक आणि भावनिक संयम कमी होत चालला आहे. त्याचबरोबर संवेदनादेखील आटत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये धर्म, जात-पात, पंथ, लिंग, प्रदेश, भाषा अशा विविध घटकांचा गैरवापर करून समाजात दुही माजवण्याची कारस्थाने जोर धरू लागली आहेत. विविधतेत एकता हे आपल्या भारत देशाचे बलस्थान असल्याचे आपण आतापर्यंत आवर्जून सांगत होतो. परंतु, स्वार्थ साधण्यासाठी याच विविधतेचा गैरवापर करीत फुटीची बीजे रोवण्यात येत आहेत. यातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे इथे कोणते युद्ध खेळून किंवा कोणती सीमा आखून फूट पाडण्यात येत नाही. तर हा भेद फुटीचे विचार पेरून मन, समाज, संस्कृतीमध्ये अंतर वाढवण्याचा डाव साधला जात आहे.

दुसरीकडे, आपल्याला कोणी वालीच उरला नाही, अशी भावना जनसामान्य, कष्टकरी, गोरगरीब, महिला, युवक अशा विविध वर्गांत वाढीस लागली आहे. केवळ त्यांच्या समस्या, दुःख जाणून घेण्यासाठीच नव्हे, तर एकूणच आपला समाज, देश यांच्याबाबत या घटकांच्या मनामध्ये काय भावना आहेत, याची दखल घेण्यासाठी कोणताही घटक प्रयत्नशील नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे. या स्थितीत त्यांच्यात एकाकीपणाची व उद्विग्नतेची भावना निर्माण झाली आहे. दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, धार्मिक हिंसाचार, सामाजिक, प्रादेशिक तेढ आणि द्वेषाचे वातावरण, असुरक्षितता असे अनेक प्रश्न सध्या सर्वसामान्य भारतवासीयांना भेडसावत आहेत. या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ अशा संपूर्ण भारत देशामधील सर्व घटकांना, प्रदेशांना स्पर्श करीत त्यांचा आतला आवाज जाणून घेण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज होती. म्हणूनच काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो यात्रे’चे महत्त्व अधोरेखित होत आहे. त्याकडे कोणत्याही राजकीय चष्म्यामधून पाहण्यापेक्षा अशा सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक नजरेतून बघणे गरजेचे आहे.

केवळ आणि केवळ कोणत्या निवडणुका एखाद्या समाजाचे भवितव्य ठरवू शकत नाहीत. त्याचप्रमाणे केवळ निवडणुकांच्या प्रचार रॅलीमध्ये साधलेला संवाद समाजाची खरी परिस्थिती जाणून घेण्यास पुरेसा ठरत नाही.तसेच एखादा इव्हेंट म्हणून केलेल्या रोड शोमधून समाजाचे अंतर्मन जाणून घेता येत नाही. त्यासाठी राहुल गांधी यांनी अवलंबलेल्या ‘भारत जोडो यात्रे’सारखा थेट समाजामध्ये मिसळण्याचा, थेट समाजाला भिडण्याचा आणि त्यांच्यातीलच एक होऊन समाजाची सहवेदना जाणून घेण्याचा प्रयत्न मोलाचा ठरतो.

युवक काँग्रेसच्या माध्यमातून मीदेखील महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थितीनंतर शेतकरी वर्गाशी संवाद साधण्यासाठी झंझावाती पदयात्रा काढली होती. त्यावेळी खरंतर काँग्रेसचे सरकार होते. ती यात्रादेखील कोणत्या प्रचारकी थाटाची नव्हती. तर थेट समाजामध्ये जाऊन त्यांच्या भावना समजून घेण्याचा तो प्रयत्न होता. राजकारणापलीकडची भूमिका घेत सत्ताधारी पक्षाला समाजाचा आरसा दाखवणे ही विविध राजकीय पक्ष, समाजघटकांची जबाबदारी असते. ती भूमिकाही ‘भारत जोडो यात्रा’ पार पाडत आहे. म्हणूनच की काय, विविध अ-राजकीय २००हून अधिक संस्था, संघटना, घटकांनी या यात्रेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. तसेच, त्यांचे प्रतिनिधी यात्रेमध्ये सहभागी होत आहेत.

यापैकी कित्येक घटकांचा काँग्रेस विचारधारेशी संबंध नाही. किंबहुना, काँग्रेस विचारांना त्यांनी जाहीर विरोधच केला आहे. तरीही यात्रेमध्ये ते सहभागी होत आहेत. याचाच अर्थ देशहित आणि देशभावना यांचे प्रतीक बनण्याचा ‘भारत जोडो यात्रे’चा उद्दिष्ट सफल होत आहे हे नक्की!

(लेखक आमदार आहेत.)