डिप्रेशनवर बोलू काही...

डॉ. हमीद दाभोलकर
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

दिवसेंदिवस स्पर्धा, ताणतणाव, एकाकीपणातून डिप्रेशन किंवा उदासीनतेच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने डिप्रेशनकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आजच्या (ता. ७ एप्रिल) आरोग्य दिनानिमित्त त्यावर मनमोकळी चर्चा व्हावी, असे सांगितले आहे. या आजाराविषयी...

दिवसेंदिवस स्पर्धा, ताणतणाव, एकाकीपणातून डिप्रेशन किंवा उदासीनतेच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने डिप्रेशनकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आजच्या (ता. ७ एप्रिल) आरोग्य दिनानिमित्त त्यावर मनमोकळी चर्चा व्हावी, असे सांगितले आहे. या आजाराविषयी...

आपल्या मनाला वाटणारे डिप्रेशन म्हणजेच उदासीनता ही काही फार उत्साहाने दुसऱ्याशी बोलली जाणारी गोष्ट नाही; पण खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच या वर्षीच्या आरोग्यदिनी ‘आपण सगळे मिळून डिप्रेशनवर बोलूयात...’ असे आवाहन केले आहे. डिप्रेशनवर बोलणे कशासाठी महत्त्वाचे आहे? हे समजून घ्यायचे असेल, तर सुरवात अस्वस्थ करणाऱ्या आकडेवारीपासून करायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते डिप्रेशनचा आजार हा सन २०२० पर्यंत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आजार होणार आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जगभरात डिप्रेशनसारख्या मानसिक आजारावर वेळीच मदत न मिळाल्याने जवळजवळ दहा लाखांपेक्षा अधिक लोक आत्महत्या करतात. एका बाजूला ही आकडेवारी आणि दुसऱ्या बाजूला समाजात डिप्रेशनविषयीचे अज्ञान, गैरसमज आणि उपचारांच्या सुविधांची सार्वत्रिक अनुपलब्धता पाहिली तर डिप्रेशनविषयी बोलण्याची गरज स्वयंस्पष्ट होते.  

समाजात गंमतशीर अंतर्विरोध आहे. आपल्या बहुतांश प्राचीन साहित्यात माणसाच्या मनाची महती सांगितलेली आहे. वेद-पुराणे यांच्यापासून ते रामदास स्वामींचे, ‘मनाचे श्‍लोक’, ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ या सर्व गोष्टी मनावर विजय मिळवण्याच्या असंख्य युक्‍त्या सांगतात. प्रत्यक्षात मनाचे आरोग्य आणि त्याचे उपचार याविषयी समाजात टोकाचे अज्ञान आणि अंधश्रद्धा दिसतात. बहुतांश मानसिक आजारांप्रमाणे डिप्रेशनचा आजार हा जैव-मनो-सामाजिक कारणांमुळे होतो. जैविक कारणांमध्ये मेंदूतील काही रसायने कमी होणे, तसेच अनुवंशिकता हेही कारण असते. मानसिक कारणांमध्ये हळवा किंवा उतावळा स्वभाव अशी कारणे असू शकतात. सामाजिक कारणांमध्ये गरिबी, व्यसन, पुरुषप्रधान समाज व्यवस्था अशी अनेकविध कारणे आहेत. हा आजार झालेल्या व्यक्तीच्या मनावर एक काळा पडदा पडल्यासारखे होते. तिला दैनंदिन जीवनात सगळ्या घटनांमधील नकारार्थी गोष्टीच समोर येऊ लागतात. स्वत:विषयी नकारार्थी विचार येणे, आत्मविश्वास कमी होणे, हे होतेच; पण आजूबाजूच्या जगाविषयी आणि भविष्याविषयीदेखील नकारार्थी विचार येऊ लागतात. आयुष्य अत्यंत ताणदायक झाले, असे वाटून हे विचार टोकाला गेले तर जगू नये, असेदेखील वाटू लागते. 

शारीरिक आजाराचीच उपमा द्यायची, तर डिप्रेशन बहुतांश वेळा मनाच्या सर्दी खोकल्यासारखे असते. जसे सर्दी खोकल्यावर वेळीच उपचार केला नाहीत, तर तो बळावतो. तसेच डिप्रेशनवर वेळीच उपचार केला नाही तर ते बळावते. डिप्रेशनवर अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत, हे अनेकांना माहीतच नसते. सौम्य प्रकारचे डिप्रेशन तर केवळ चांगल्या समुपदेशनाने, कोणत्याही गोळ्या आणि औषधे न घेता बरे होते. मध्यम आणि तीव्र स्वरूपाचे डिप्रेशन बरे करण्यासाठी समुपदेशनाबरोबर मेंदूतील रासायनिक असंतुलन दुरुस्त करणारी औषधेच लागतात. औषधांविषयीच्या गैरसमजातून आपण ती घेणे टाळता कामा नये.

स्वत:च्या आणि जवळच्या लोकांच्या आयुष्यातील डिप्रेशनची लक्षणे ओळखणे अजिबात अवघड नाही. थोडी संवेदनशीलता आणि थोडे प्रशिक्षण यांच्या मदतीने आपण ते सहज सध्या करू शकतो. ‘परिवर्तन संस्थे’ने ‘टाटा ट्रस्ट’च्या सहकार्याने राबवलेल्या जन-मन-स्वास्थ्य प्रकल्पांतर्गत सरकारी आरोग्य यंत्रणेचा भाग असलेल्या आशाताईंपासून ते दहावी उत्तीर्ण कोणत्याही व्यक्तीला डिप्रेशनचे निदान कसे करायचे? रुग्णाला उपचारासाठी कसे तयार करायचे? याचे प्रशिक्षण देता येऊ शकते. यामधील निष्कर्षांनुसार ज्या समाजात मनोविकारतज्ज्ञांचा तुडवडा आहे, तिथे अशा स्वरूपाचे भावनिक प्रथमोपचार देणारे समुपदेशक मोलाची भूमिका पार पडू शकतात. दीपिका पदुकोन ही आजची अत्यंत यशस्वी अभिनेत्री यशाच्या शिखरावर असताना तिला डिप्रेशनचा त्रास होऊ लागला आणि त्यासाठी योग्य उपचार घेऊन ती बरी झाली. आज ती जाहीररीत्या स्वत:च्या डिप्रेशनविषयी बोलते आणि समाजात जनजागृतीचे काम करते. आपणदेखील डिप्रेशनविषयी सजग होणे आणि बोलणे महत्त्वाचे आहे.

Web Title: editorial artical