येणे परिमळें तोषावे

- डॉ. नवनाथ रासकर
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी ‘श्री ज्ञानेश्‍वरी’च्या समारोपानंतर विश्‍वात्म देवाकडे पसायदान मागितले, ते स्वतःसाठी नव्हे, तर जगातील प्राणिमात्रांसाठी. जगातले खलत्व संपून मैत्रीची स्थापना होवो, असे ते म्हणतात. माउलींचा तो अधिकार होता. विश्‍वात्म देवाशी ते एकरूप झाले होते. हा देव कोणी आकारसंपन्न व्यक्तिमत्त्व नसते, तर ते आपलीच विश्‍वरूप जाणीव असते. म्हणून तर संत तुकाराम महाराज ‘अणुरेणुया थोकडा । तुका आकाशाएवढा ।।’ असे म्हणतात. हे आपल्या जाणिवेचे उन्नयन असते. संतांचा तो अनुभव असतो, पण त्यासाठी साधनापथावरून चालावे लागते. ते त्यांनी केले म्हणून देवरूप झाले. देव म्हणजे ‘सद्‌गुणांचा पुतळा’.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी ‘श्री ज्ञानेश्‍वरी’च्या समारोपानंतर विश्‍वात्म देवाकडे पसायदान मागितले, ते स्वतःसाठी नव्हे, तर जगातील प्राणिमात्रांसाठी. जगातले खलत्व संपून मैत्रीची स्थापना होवो, असे ते म्हणतात. माउलींचा तो अधिकार होता. विश्‍वात्म देवाशी ते एकरूप झाले होते. हा देव कोणी आकारसंपन्न व्यक्तिमत्त्व नसते, तर ते आपलीच विश्‍वरूप जाणीव असते. म्हणून तर संत तुकाराम महाराज ‘अणुरेणुया थोकडा । तुका आकाशाएवढा ।।’ असे म्हणतात. हे आपल्या जाणिवेचे उन्नयन असते. संतांचा तो अनुभव असतो, पण त्यासाठी साधनापथावरून चालावे लागते. ते त्यांनी केले म्हणून देवरूप झाले. देव म्हणजे ‘सद्‌गुणांचा पुतळा’. अशा देवांशी संतांचा संवाद होता. आपण सगळे झगमगाटी दुनियेत रमणारी सामान्य माणसे होत. ज्याची आणि आपली ओळख नाही, अशा विश्‍वात्म जाणिवेकडे आपण कसे आणि काय मागणार? आपण माणसे देवापुढे आपल्या व्यथा घेऊन जातो व त्याच्यापुढे ठेवून परत संसाराला लागतो. त्यामागे श्रद्धा, तळमळ नसते. प्राचीन ऋषींनी ‘तमसो मा ज्योतिर्गमय ।’ अशी प्रार्थना करून विश्‍वतत्त्वाशी संवाद साधला. ‘सर्वेत्र सुखीनः सन्तु...’ अशी आळवणी केली. त्यामागे आयुष्यभराची साधना होती. त्यातून बनलेले शील आणि तळमळ होती. असे काही नसताना मी पामर कसले पसायदान नि कोणाकडे मागणार? 

गेले वर्षभर ‘सकाळ’ने ‘परिमळ’ सदरातून ज्ञानयज्ञ केला. त्याचा वाटेकरी होण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आले. वाचकांनी वेगवेगळ्या मार्गाने त्याला भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे लिहीत गेलो. समर्थ रामदास म्हणतात, ‘शहाणे करून सोडावे। सकळ जन ।।’ त्याप्रमाणे मला जे माहीत होते, ते मांडत राहिलो. आपण ते निमूटपणे घेत राहिलात. नीती, सद्‌गुण या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधत राहिलो. हा संवाद निकोप, निरामय झाला असे मी समजतो. सॉक्रेटीस, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टॉलस्टाय इत्यादींनी जग चांगले व्हावे यासाठी आपले जीवन समर्पित केले. मूल्यांना आपल्या जगण्यातून नवचैतन्य बहाल केले. मूल्ये अस्तित्वात नसतात. ती जगून, जीवनरूपी भट्टीतून तावून सुलाखून आकाराला येतात. तीच भावी पिढ्यांना मार्गदीप ठरतात. तेच दीप आपल्यापुढे आणण्याचा अट्टहास केला. परिमळ म्हणजे सुगंध, दरवळ. ज्यातून संस्कार होतो, जगण्याचा सूर गवसतो. तेच मूल्य म्हणून माणसाला हवे असते. म्हणून तो ‘परिमळ’, जो हवाहवासा वाटतो. आपण सर्व वाचक ‘देव’ आहात, आपल्यापुढे व्यथा नव्हे, नैवेद्य ठेवला आहे. तो मूल्यांचा आहे. हा नैवेद्य माझ्या कुवतीप्रमाणे केला आहे. तो करताना ‘बुडती हे जन, न देखवे डोळा’ ही संवेदनशीलता त्यात ओतली आहे. तरीही तो कडू-गोड-खारट-करपट असा कसाही असेल, तेव्हा वाचकदेवा हा नैवेद्य शबरीचा भोळा भाव समजून संतोष पावावे. 

Web Title: editorial artical dr. navnath raskar