मंगळ बनवू पृथ्वीसारखा

डॉ. प्रकाश तुपे (खगोलशास्त्राचे अभ्यासक)
गुरुवार, 16 मार्च 2017

सूर्यमालेतील इतर ग्रहांपेक्षा पृथ्वीचा शेजारी असलेला मंगळ हाच सजीवसृष्टीसाठी पोषक असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते. त्यामुळे या ग्रहाला पृथ्वीसारखे बनवून त्यावर मानवी वस्ती करता येईल काय, यावर त्यांचे विचारमंथन सुरू आहे. 

सूर्यमालेतील इतर ग्रहांपेक्षा पृथ्वीचा शेजारी असलेला मंगळ हाच सजीवसृष्टीसाठी पोषक असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते. त्यामुळे या ग्रहाला पृथ्वीसारखे बनवून त्यावर मानवी वस्ती करता येईल काय, यावर त्यांचे विचारमंथन सुरू आहे. 

मंगळ हा पृथ्वीचा पुत्र मानला गेलेला ग्रह असून, तो बऱ्याच अंशी पृथ्वीसारखा व पृथ्वीशेजारचा ग्रह आहे. असे असले तरी मंगळावर जीवसृष्टीचा मागमूसदेखील आढळत नाही. याला प्रमुख कारण ठरते मंगळावरचे आगळेवेगळे व अतिशय विरळ वातावरण, तसेच खूपच कमी तापमान. यामुळे मानवाला वस्ती करण्यासाठी मंगळावर सध्या तरी जाता येणार नाही. मात्र या संकटाला तोंड देण्यासाठी अमेरिकी शास्त्रज्ञांनी नामी शक्कल शोधली आहे. त्यांनी मंगळाला पृथ्वीसारखे बनविण्याची योजना नुकतीच तयार केली. वॉशिंग्टनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या ग्रहांविषयीच्या भावी योजनांच्या परिषदेत ही योजना मांडण्यात आली.

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्राचे म्हणजे ‘नासा’चे संचालक डॉ. जेम्स ग्रीन यांनी मंगळावर पृथ्वीसारखे वातावरण निर्माण करण्यासाठी मंगळाला चुंबकीय बुरखा घालण्याची कल्पना मांडली. त्यांच्या मते मंगळाचे चुंबकीय क्षेत्र ४.२ अब्ज वर्षांपूर्वी नाहीसे झाले व त्यामुळे मंगळावर सौरवात व अंतराळातील विविध प्रारणांचा मारा सुरू झाला. परिणामी मंगळाभोवतालचे वातावरण उडून जाऊ लागले व मंगळ थंड होऊ लागला. त्यातून मंगळ काहीसा निर्जीव, कोरडा ठणठणीत, विरळ वातावरणाचा ग्रह बनत गेला. ही प्रक्रिया थांबवून पुन्हा त्याचा उलट दिशेने प्रवास सुरू करण्याची योजना ‘नासा’ने मांडली. सूर्य व मंगळ यांच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण केल्यास मंगळाचे सौरवातापासून रक्षण होईल व यामुळे मंगळावरच्या वातावरणात बदल होऊन तेथील तापमान वाढू लागेल. परिणामी मंगळावर पाणीही वाहू लागून सजीवांना पोषक वातावरण निर्माण होईल. 

मंगळ हा सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा व पृथ्वीशेजारचा ग्रह आहे. तो पृथ्वीच्या निम्म्या आकाराचा आहे. मंगळावरचे वातावरण विरळ असून त्यात प्रामुख्याने ९६ टक्के कर्बद्वीप्रणीत वायू आढळतो. पृथ्वीप्रमाणेच मंगळावरचा दिवस २४ तास ४० मिनिटांचा आहे. त्याचप्रमाणे मंगळाचा आसही कललेला असल्याने पृथ्वीप्रमाणेच मंगळावर ऋतुचक्र चालू असते. या सार्धम्यामुळे मंगळवार जीवसृष्टी असावी, असे वाटत होते. मात्र मंगळावरचे तापमान खूपच कमी म्हणजे पृष्ठभागावर ते उणे ६३ अंश सेल्सिअस एवढे कमी आढळते. मंगळावरच्या वातावरणाचा दाबही पृथ्वीच्या अवघ्या एक टक्का आढळतो. मंगळाभोवती चुंबकीय क्षेत्र नसल्याने मंगळावर विविध प्रारणांचा व सौरवाताचा परिणाम होत असतो.

या सर्व घटकांमुळे मंगळावर जीवसृष्टी नाही. असे असले तरी सूर्यमालेतील इतर ग्रहांपेक्षा मंगळ हाच सजीवसृष्टीस पोषक ग्रह असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते.

मंगळावर पुरातनकाळी पाणी व उबदार वातावरण होते. मात्र कमी गुरुत्वाकर्षणामुळे मंगळाभोवतालचे वातावरण निसटून अंतराळात गेले. तसेच मंगळाची चुंबकीय शक्तीही नाहीशी झाल्याने सूर्यापासून वेगाने येणारा सौरवात मंगळावरचे वातावरण सेकंदाला १०० ग्रॅम या वेगाने उडवून देत आहे. याचमुळे मंगळ थंड व विरळ वातावरणाचा ग्रह बनला. या ग्रहाला पुन्हा पूर्वीसारखे बनवून त्यावर मानवी वस्ती करता येईल काय यावर विचारमंथन सुरू आहे. मंगळ पृथ्वीसारखा बनविण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी विविध कल्पना मांडल्या. यामध्ये तापमान ‘ग्रीन हाउस इफेक्‍ट’मुळे वाढविता येईल, असे अनेकांना वाटते. मंगळावर काळसर धूळ पसरल्यास सूर्यप्रकाशामुळे मंगळाच्या पृष्ठभागावरचे तापमान वाढू शकेल. यामुळे ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळून पाणी वाहू लागेल. काही सूक्ष्म जीवजंतूंची वाढही या वातावरणात होऊन प्राणवायू व ओझोनचे वातावरणातील प्रमाण वाढत जाईल, असे काही शास्त्रज्ञांना वाटते, तर काहींच्या मते ‘ग्रीन हाउस इफेक्‍ट’साठी फ्लू रिन कंपाउंडस, अमोनिया, मिथेन यांचा उपयोग केल्यास मंगळावरचे वातावरण उबदार बनू शकेल. मंगळावर प्राणवायू निर्माण करणारे जीवजंतू वाढविल्यास तेथील वातावरण बदलता येऊ शकेल, असे काही शास्त्रज्ञांना वाटते. मंगळावरच्या दगडधोंड्यातील कर्बद्वीप्रणीत वायू बाहेर काढता आल्यास तेथील वातावरण बदलता येऊ शकेल, असे काहींचे म्हणणे आहे. मंगळाचे तापमान वाढविण्यासाठी त्या भोवती सौरशिडे (सोलर सेल) किंवा पातळ ॲल्युमिनियमची शिडे फिरवत ठेवण्याची कल्पनाही काहींनी मांडली. या सर्व कल्पनांना मोठा अडथळा ठरतो तो म्हणजे मंगळाच्या वातावरणावर कोसळणारा सौरवात. याचसाठी ‘नासा’ने सौरवात अडविण्यासाठी चुंबकीय बुरख्याची (मॅग्नेटिक शिल्ड) कल्पना मांडली. 
‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी ‘प्लॅनेटरी सायन्स व्हिजन २०५०’ परिषदेत मंगळाच्या चुंबकीय बुरख्याची कल्पना मांडली. चुंबकीय क्षेत्र निर्माण करणारे अवकाशयान मंगळ व सूर्य यांच्यामधील एका स्थिर जागेवर ठेवण्याची योजना शास्त्रज्ञांनी मांडली. या क्षेत्रामुळे सौरवात अडविला जाऊन मंगळावरच्या वातावरणात बदल घडू शकेल. हा बदल पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने होईल, मात्र त्यासाठी काही काळ जावा लागेल. संगणकीय मॉडेलच्या आधारे ‘नासा’च्या शास्त्रज्ञांना खात्री वाटते, की काही वर्षांत मंगळाभोवती पृथ्वीच्या निम्म्या दाबाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. याच काळात तेथील तापमान चार अंशाने वाढत जाईल व मंगळाच्या ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळू लागेल. वातावरणातील कर्बद्वीप्रणीत वायू मंगळाची उष्णता रोखत असल्याने मंगळ पुन्हा उबदार होऊ लागेल. काही काळातच मंगळावर पुन्हा तळी, समुद्र निर्माण होतील. डॉ. ग्रीन यांच्या मते मंगळावर जवळजवळ १/७ भाग पाणी परतलेले दिसेल. ‘नासा’च्या शास्त्रज्ञांची ही कल्पना सध्या तरी कविकल्पनेसारखी वाटत असली, तरी संगणकीय मॉडेलद्वारे ही कल्पना तपासली गेली असल्याने, ती सत्यात उतरू शकेल. तसे झाल्यास मानवी मंगळ मोहिमांना मोठी चालना मिळू शकेल.

परिणामतः मानवाला पृथ्वीखेरीज दुसरीकडे वस्ती करण्यास जागा निर्माण होऊ शकेल, हे निश्‍चित.

Web Title: editorial artical dr. prakash tupe