मूळ प्रश्‍न सांस्कृतिक कुपोषणाचा

मूळ प्रश्‍न  सांस्कृतिक कुपोषणाचा

दर्जेदार चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत. चांगल्या नाटकांना नाट्यगृहे मिळत नाहीत. वेगळे विचार मांडणारी एखादी कला सर्वदूर पोचू शकत नाही. हे आणि असे अनेक प्रश्‍न सध्या  भेडसावताहेत. अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याआधी मला एक प्रश्न अधिक महत्त्वाचा म्हणून मांडणे क्रमप्राप्त वाटते- मुळात आपल्या समाजाचे सांस्कृतिक पोषण योग्य रीतीने होतेय काय ?... माझ्या मते तरी या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. किंबहुना, असे पोषण व्हावे, त्यासाठी काही प्रयत्न व्हावेत, याचेही भान बहुतांश समाजघटकांना नाही. सांस्कृतिक पोषण ही माणसाची गरज असू शकते, याचेच आकलन नसेल तर, त्यादृष्टीने चिंतन होणार तरी कसे? आज आसपास जी सांस्कृतिक उदासीनता दिसते, तिची कारणं यात आहेत.

पूर्वी सांस्कृतिक पोषणमूल्ये ही लहान वयातच शिक्षणव्यवस्थेतून आणि कुटुंबव्यवस्थेतून निदान रुजवली तरी जात होती. माणसे एकत्र राहत होती. आपल्या आसपास सांस्कृतिक वातावरण निर्माण करत होती. महत्त्वाचं म्हणजे, या सगळ्यात कुठलाही ‘व्यवहार’ नव्हता. त्यामुळे त्यातून निखळ सांस्कृतिक पोषणच घडत असे. कलेचे भान, कलेचे आस्वादन, कलेची चर्चा, कलेचा विकास आणि कलेची निर्मिती आणि प्रसार या गोष्टी त्या वेळी घडत.

काळ बदलला आणि कुटुंबव्यवस्था मोडकळीला आल्या. माणसांचे अधिवास एकेकटे झाले. माणसं एकेकटी झाली. पुढे टीव्ही आणि नंतरच्या डिजिटल क्रांतीने तर या एकटेपणात भरच घातली. समोर पाहायला-ऐकायला-अनुभवायला असलेल्या गोष्टींचे पर्यायही बदलत्या काळात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले. पण हे सारं असतानाही, हे विपुल पर्याय वापरावेत कसे? त्यांतून काय घ्यावं, किती घ्यावं? यापैकी कसलेच उत्तर आणि त्यासाठीची सांस्कृतिक समज मात्र या बदलत्या काळाने दिली नाही ! परिणामी एका सांस्कृतिक कुपोषणाच्या दिशेने आपला प्रवास होत आहे.

या सगळ्या बदलांचा पुढचा टप्पा होता तो तंत्रज्ञानाच्या क्रांतीने उपलब्ध करून दिलेले आर्थिक फायद्याचे नवे रूप. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संदर्भ (अगदी सर्जनशीलतेचाही !) आर्थिक निकषांच्या आधारे शोधला जाण्यास सुरवात झाली. मग अशावेळी कलेची जपणूक, सांस्कृतिक पोषण वगैरेसारखा आतबट्ट्याचा व्यवहार कोण आणि कशाला करतोय? साहजिकच सांस्कृतिक झीज होतच राहिली. दर्जेदार कलेची घरं ओस पडू लागली. कलेचा ध्यास नाहीसा होत गेला. 

मग प्रश्न येतो की, जर आम्हांला चांगले सिनेमे नकोच आहेत, आम्हांला जर सकस कलांच्या निर्मितीत मुळी काही रसच नाही तर, त्यांची वाढ तरी कशी  होईल?  त्यामुळे बहुतांश लोक हे सिनेमा जसा बघायला हवा, आत्मसात करायला हवा, तसा तो करतच नाहीत. त्यांना केवळ मजा म्हणून सिनेमा पाहायचाय.या कलाकृतीचा खरा आनंद कसा घेतात, हे जाणून घेण्याची इच्छाच त्यांना नाहीये. सिनेमा पाहणे ही एक जाणीवपूर्वक केलेली कृती असू शकते, हेच आज आम्हाला ठाऊक नाही. मग त्याची रसवत्ता आम्ही बिचारे अनुभवणार तरी कसे? सकस कलांचा वावर टिकावा असे वाटत असेल तर आपल्याला फ्रान्समधील समाजासारखा वैचारिकदृष्ट्या सशक्त आणि कलासक्त समाज निर्माण करावा लागेल. 

आपल्याकडे काही मोजकी मंडळी व्रतस्थपणे चांगले सिनेमे बनवत राहतात. कारण, त्यांना कलेसाठी कला करायची असते. मग ते त्यांचे सिनेमे कसे प्रदर्शित करतील, यांसारख्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नसली तरी ते कलात्मक सिनेमे बनवण्याचे थांबवत नाहीत. आर्थिक व्यवहार आतबट्ट्याचा असला तरी त्यांची कला त्यांना थांबू देत नाही. पण अशा लोकांनी सिनेमे बनवत राहावेत, त्यातून कलेचे विश्व अधिक समृद्ध होत राहावे, याबद्दल समाजात जागरूकता नाही. आपल्याकडची शिक्षणव्यवस्था आणि राज्यव्यवस्थाही दुर्दैवाने अशी काही सजगता आणू पाहत नाही. जोपर्यंत सांस्कृतिक गरज ही ‘जीवनावश्‍यक’ म्हणून आपण पाहणार नाही, तोपर्यंत हे भीषण चित्र बदलण्याची शक्‍यता नाही.  व्यक्ती म्हणून आपल्या विकासाची एक समग्र दृष्टी तयार होण्याची गरज आहे. म्हणूनच, एखाद्या चित्रपटासाठी वितरणव्यवस्था नाही, असे म्हणताना प्रेक्षकांना तो चित्रपट पाहायचा आहे काय आणि त्यांची ती तयारी आहे काय,हे प्रश्न आधी सोडवायला हवेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com