गिरकी गिरकी, चेंडूची फिरकी !

- माधव गाडगीळ (निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ)
शनिवार, 7 जानेवारी 2017

खेळाडूचा वंश, रंग, जात-जमात, कुटुंबाची गरिबी-श्रीमंती हे सारे गैरमहत्त्वाचे असते. समान संधी मिळवून देणारे क्रीडा क्षेत्र दिवसेंदिवस भरभराटीला येते आहे  हे छान आहे. 
 

खेळाडूचा वंश, रंग, जात-जमात, कुटुंबाची गरिबी-श्रीमंती हे सारे गैरमहत्त्वाचे असते. समान संधी मिळवून देणारे क्रीडा क्षेत्र दिवसेंदिवस भरभराटीला येते आहे  हे छान आहे. 
 

क्रिकेटवेड्या भारतात आपल्याला क्रिकेट शिकवणाऱ्या इंग्लंडलाच सपशेल धुतल्याचा जल्लोष चाललाय. दोन नावं गाजताहेत; रविचंद्रन अश्‍विन आणि विराट कोहली. फिरकी गोलंदाज अश्‍विन जगातला यंदाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून नावाजला जातोय. भारत फिरकी गोलंदाजीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे; तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वी याची मुहूर्तमेढ रोवली ती आपल्या महाराष्ट्रातल्या बाळू यांनी. मुरब्बी क्रिकेटपटू विजय मर्चंटनी लिहिलंय की, भारतीय क्रिकेटसाठी प्रतिष्ठा प्रथम कमावली फलंदाज रणजितसिंहांनी आणि गोलंदाज बाळू पालवणकरांनी. रणजितसिंह होता नवानगराचा महाराजा, तर बाळू एका गरीब दलित कुटुंबात जन्मला होता. भारतीयांनी रणजीची आठवण ठेवली आहे, पण बाळूला पार विसरले आहेत.    
आपण सगळेच क्रिकेट, फुटबॉल, टेनिस असे चेंडूंचे खेळ खेळतो, त्यांचे सामने पाहण्याचा आनंद लुटतो. पण मला मोह होतोय एका प्राण्यांच्या दुनियेतल्या चेंडूंच्या खेळाचे वर्णन इथे करायचा. होय, प्राण्यांची, आणि तीही आपल्या लेखी क्षुद्र किड्या-मकोड्यांची एक अजब कुळी चक्क चेंडूंचे खेळ खेळते. या अफलातून शेणभुंगेऱ्यांच्या लीला बघताना मला गदिमा आठवायचे: बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू । झाडे, वेली, पशू, पाखरे आणि शेणभुंगेरू! निलगिरीतल्या मदुमलाई अभयारण्यात पाळीव हत्तींचा एक मोठा तळ होता. शेणभुंगेऱ्यांची एक दांडगट जात हत्तींच्या लिदीवर जगते. अर्थातच या परिसरात त्यांची चंगळ होती. या शेणभुंगेऱ्यांचे खेळ पाहताना मला फुटबॉल बघण्याइतकीच मजा यायची. ताजी लीद पडली की त्या वासाने शेणभुंगेऱ्यांच्या जोड्या त्या लिदीकडे उडत पोचायच्या; लिदीचे आपल्या आकाराच्या दहा-वीसपट मोठे गरगरीत चेंडू बनवायला लागायच्या. तो चेंडू जिथे भुसभुशीत जमीन सापडेल तिथवर गडगडत न्यायचा, मग एक खड्डा खणून पुरायचा, पुरल्यावर जोडीने त्यात घुसायचे, तिथे आपला मधुचंद्र साजरा करायचा, मग त्या लिदीत अंडी घालायची, स्वतः लीद खात राहायची, पिल्ले बाहेर आल्यावर ती लीद खात वाढत असताना त्यांना सांभाळायचे, ती मोठी झाल्यावर सगळ्यांनी बाहेर यायचे आणि पुनःश्‍च हरि ओम. पण हे इतके सोपे नव्हते. झकास गरगरीत आयता तयार चेंडू चोरायला इतर जोड्या सज्ज असायच्या. तेव्हा शक्‍य तेवढ्या वेगाने तो चेंडू पुरण्याच्या जागेपर्यंत पोचवायला हवा, वाटमारी करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांना चुकवायला हवे, जरूर पडली तर त्यांच्याशी झुंजायला हवे. शेणभुंगेऱ्यांच्या जगात फुटबॉलच्या सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांच्या गोलापर्यंत चेंडू पोचवण्याच्या चुरशीच्या वरताण चुरस चालू असायची! 

प्राणिसृष्टी जशी अफाट वैविध्याने नटली आहे, तशीच मानवसृष्टीही. सारे मानवप्राणी बिलकुलच एका साच्यातून काढलेले नाहीत. माणसामाणसांत काही ना काही फरक असतात, त्यांचे गुणदोष कमी-जास्त प्रमाणात असतात. तेव्हा समतेला मर्यादा आहेत. मग या मर्यादा ओळखून आपण कशासाठी झटायला हवे? सर्वांना वंश, जात-जमात, स्त्री-पुरुष, सधन-निर्धन या भेदांपलीकडे जाऊन आपापल्या गुणांचे चीज करून घ्यायला समान संधी मिळवून द्यायला. क्रीडा क्षेत्राची महती ही की मानवी कर्तृत्वाच्या दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा क्रीडाविश्‍वात अशा समान संधीला अधिक वाव आहे.

बाळू पालवणकर याचे एक ठसठशीत उदाहरण आहेच. १८७५ मध्ये जन्मलेल्या बाळूला चरितार्थासाठी वयाच्या सोळाव्या वर्षी महिना चार रुपये पगारावर तेव्हाच्या केवळ युरोपीयांसाठी राखीव पूना क्‍लबात क्रिकेटच्या मैदानाची निगा राखण्याची नोकरी पत्करायला लागली. तिथे फावल्या वेळात नेटवर गोलंदाजी करत फिरकीत तो इतका पारंगत झाला की इंग्रज चमूच्या कप्तानाने तासभर आधी येऊन, बाद केले की दर वेळी आठ आणे भत्ता देऊन स्वतःच्या सरावासाठी गोलंदाजी करण्याचे काम त्याच्यावर सोपवले. त्याची कीर्ती पसरल्यावर त्याला हिंदू जिमखान्याच्या चमूत खेळायला बोलावले गेले. त्याच्या कर्तबगारीच्या जोरावर हिंदू संघाने १९०५ मध्ये प्रथमच मुंबई इलाख्यातली स्पर्धा जिंकली. मग बाळूला आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही भाग घ्यायची संधी मिळाली. १९११ च्या अखिल भारतीय चमूच्या इंग्लंडच्या दौऱ्यात त्यांनी पहिल्या श्रेणीच्या सामन्यात सरासरी १९ धावा देत ७५ जणांना बाद करत सर्वांहून सरस कामगिरी करून दाखवली. तरीही कप्तान बनवायचे सोडाच, बाकीचे खेळाडू त्याला आपल्या पंक्तीत जेवूही द्यायचे नाहीत. या वृत्तीची निर्भर्त्सना करत, लोकमान्य टिळकांनी सनातन्यांच्या विरोधाला न जुमानता बाळूचा जाहीर सत्कार केला. 

जेसी ओवेन्स या काळ्या अमेरिकी क्रीडापटूला अशाच कोतेपणाला सामोरे जावे लागले होते. १९३६ च्या बर्लिनच्या ऑलिंपिक स्पर्धांत त्याने आधीच्या जागतिक उच्चांकांना पार मागे टाकत १०० व २०० मीटर दौड व लांब उडीतील सुवर्णपदके पटकावली. त्याच्या बक्षीस समारंभाला जर्मनीचा वंशद्वेषी हुकूमशहा हिटलर जाणून-बुजून गैरहजर राहिला. अमेरिकी अध्यक्षांनीही जेसीचा सन्मान केला नाही. सुदैवाने आज हे पालटले आहे. जेसी ओवेन्ससारखेच कर्तृत्व दाखवणाऱ्या कृष्णवंशीय उसेन बोल्टचा आज जगभर उदो-उदो होतो आहे. दुसऱ्या बाजूने आनुवंशिक ‘डीएनए’च्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की, मानववंशांत रंग, चेहरामोहरा, अंगयष्टी यांत जे फरक आहेत ते अगदी वरवरचे आहेत, अगदी थोड्या जनुकांपुरते मर्यादित आहेत. बुद्धिक्षमता, रोगांना प्रतिरोधशक्ती यांसारख्या इतर सर्व गुणधर्म ठरवणाऱ्या जनुकांतले वैविध्य वंश अथवा जातिविशिष्ट नाही; सरासरीत सगळे एकाच पातळीवर आहेत. तेव्हा विज्ञान, आजचे क्रीडा विश्‍व बजावते आहे:

हल्ला करण्या तर दंभावर 
- शूरांनो या त्वरा करा रे! 
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे,
विज्ञानाच्या सुराबरोबर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial artical madhav gadgil