हक्कानी यांनी आळवलेला मैत्रीचा राग

हक्कानी यांनी आळवलेला मैत्रीचा राग

‘पाकिस्तानची निर्मिती होऊन जेमतेम सात महिने उलटले होते. त्या दिवसांत कराचीनजीक अरबी समुद्रकिनाऱ्यावर एका रम्य ठिकाणी पाकिस्तानचे ‘कायदेआझम’ बॅ. महंमद अली जीना व अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत पॉल ऑलिंग यांची भेट झाली. चहा झाल्यावर ते बीचवर फेरफटका मारू लागले. जीना म्हणाले, ‘‘भारत व पाकिस्तानच्या निकट संबंधांव्यतिरिक्त दुसरा कोणताही विचार माझ्या मनात नाही. दोन्ही देशांचे संबंध अमेरिका व कॅनडासारखे हवेत.’’ हा संवाद हुसेन हक्कानी यांच्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर वाचावयास मिळतो.

हक्कानी हे पाकिस्तानच्या तीन पंतप्रधानांचे (बेनझीर भुट्टो, नवाज शरीफ, असिफ अली झरदारी) आणि परवेझ मुशर्रफ यांचे सल्लागार. तसेच, श्रीलंका व अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत, लेखक व विचारवंत. रोडावलेल्या संबंधांना दोन्ही देश जबाबदार असल्याचे या पुस्तकात नमूद करून ते अधिक तणावग्रस्त होण्यास हक्कानी पाकिस्तानला जबाबदार मानतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर ‘‘इट हॅज बिन एस्पेशियली मेड टॅंगल्ड बाय पाकिस्तान्स नियर पॅथॉलॉजिकल ऑब्सेशन वुईथ इंडिया.’’ हक्कानी यांनी दोन्ही देशांच्या संबंधांच्या इतिहासाचा संक्षिप्त; पण अचूक आढावा या पुस्तकात घेतला असून, मैत्री वाढविल्यास पाकिस्तानला कसा लाभ होईल, हे पटविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.

‘‘काश्‍मीरबाबत संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानने चालविलेला युक्तिवाद, भारताविरुद्धचा प्रचार, सार्वमताची मागणी यात आंतरराष्ट्रीय समुदायाला फारसे स्वारस्य उरलेले नाही, किंबहुना पाकिस्तानची शिष्टाई अपयशी ठरत आहे,’’ अशी टिप्पणी करून हक्कानी यांनी ते सोदाहरण स्पष्ट केले आहे.

२०१५ मध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांनी राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलताना काश्‍मीरच्या वादाचा भावनात्मक उल्लेख केला. ‘‘१९४७ नंतर काश्‍मिरी जनतेच्या तीन पिढ्यांना पोकळ आश्‍वासने व क्रूर छळ हेच पाहावयास मिळाले,’’ असे ते म्हणाले. हक्कानी म्हणतात, की शरीफ यांचे विधान पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी ठळकपणे छापले. परंतु, जगात अन्यत्र त्याचा क्वचितच उल्लेख झाला. राष्ट्रसंघाच्या १९३ सदस्य देशांपैकी काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करणारे शरीफ हे एकमेव होते. 

१९४८ मध्ये भारताने हा प्रश्‍न राष्ट्रसंघाकडे नेला, तेव्हा पाकिस्तानकडून होणाऱ्या सशस्त्र कारवाईबाबत तक्रार केली. त्या वेळी राष्ट्रसंघाच्या ५८ सदस्यांपैकी बव्हंशी सदस्य पाकिस्तानला अनुकूल होते. सुरक्षा समितीने तेव्हा ‘जम्मू काश्‍मीरमधील जनतेला स्वतःच्या भवितव्याबाबत निर्णय’ घेण्याचा अधिकार असून, सार्वमत घेण्याबाबत ठराव केला. समितीने तो १९५७ मध्ये संमत केला, तेव्हा सदस्यसंख्या ८२ झाली होती. काश्‍मीरप्रकरणी काहीही प्रगती झाली नाही, याचे कारण व्यूहात्मक विचार करून तो सोडविण्याऐवजी केवळ भावनात्मक स्वरूप दिले गेले. पाकिस्तानने चीनचे माजी अध्यक्ष जियांग झमीन यांच्या सल्ल्याकडेही दुर्लक्ष केले. १९९६ मध्ये झमीन यांनी पाकिस्तान संसदेत केलेल्या भाषणात म्हटले होते, की काही प्रश्‍न सुटत नसतील, तर ते तात्पुरते बाजूला ठेवा म्हणजे, (भारताशी) संबंध प्रस्थापित करण्याआड ते येणार नाहीत. अशा बाबींकडे हक्कानी यांनी लक्ष वेधले आहे. 

१९७१च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली. तेव्हापासून त्या देशाने दहशतवादाला प्रोत्साहन दिले. वस्तुतः कारगिलच्या युद्धापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी संबंध सुधारण्यासाठी ‘बसशिष्टाई’ केली. अशा काही संधी पाकिस्तानने सोडल्या. दहशतवादापासून पाकिस्तानला परावृत्त करण्यासाठी अमेरिकेने अनेकदा कानपिचक्‍या दिल्या, याचाही उल्लेख पुस्तकात आढळतो. उदा. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री असताना हिलरी क्‍लिंटन यांनी ऑक्‍टोबर २०११मध्ये पाकिस्तानला दिलेल्या भेटीत तेथील नेत्यांना सुनावले होते, की परसात साप पाळायचे व त्यांनी फक्त शेजाऱ्याला (भारताला) दंश करावा, अशी अपेक्षा ठेवायची, हे शक्‍य नाही. तत्पूर्वी, दोन दशके आधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जेम्स बेकर (तृतीय) यांनी पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याचा इशारा दिला होता. 

‘‘भारत व पाकिस्तानदरम्यान मित्रत्वाची आशा कमी होत आहे, म्हणूनच जनता, व्यापार, सांस्कृतिक संबंध आदी पातळीवर वेगाने देवाणघेवाण वाढविण्याची गरज आहे,’’ असे हक्कानी सुचवितात. ‘‘दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत, तरी अणुयुद्ध हा पर्याय ठरू शकत नाही,’’ असे त्यांनी नमूद केले आहे. ‘‘पाकिस्तानात अभ्यासक्रमातून भारताविषयी द्वेष निर्माण करण्याचे काम कित्येक वर्षे चालू आहे. तसेच, अलीकडच्या काळात भारतातही भगव्या शक्ती अखंड भारताचा उल्लेख करीत असतात. दाऊद इब्राहिम, मसूद अजहर, हाफिज सईद या दहशतवाद्यांना पाकिस्तानात मिळणारे अभय व आश्रय, याबाबत भारतात संताप व्यक्त केला जातो.’’ याचा उल्लेख हक्कानी यांनी केला आहे. ‘‘जीना म्हणाले, तसे भारत-पाकिस्तानचे संबंध हे अमेरिका व कॅनडा यांच्याप्रमाणे होणे अशक्‍य असले, तरी दोन्ही देशांनी निव्वळ मित्र म्हणून का असू नये,’’ असा सवाल त्यांनी केला आहे.

पाच प्रकरणांत विभागलेले हे पुस्तक भारत-पाकिस्तान संबंधांचे अभ्यासक, इतिहासकार, विद्यार्थी व सामान्य वाचक आदींना उपयुक्त ठरावे. 

इंडिया व्हर्सेस पाकिस्तान- काश्‍मीर, टेररिझम, एन-बॉम्ब- व्हाय कान्ट वुई बी जस्ट फ्रेंड्‌स, लेखक - हुसेन हक्कानी
प्रकाशक - जुगरनॉट बुक्‍स, दिल्ली.
पाने - १७५, किंमत ः २९९ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com