दिसामाजी काहीतरी ते लिहावे...

विश्‍वास सहस्रबुद्धे
बुधवार, 28 डिसेंबर 2016

आजवर मानवाला अनेक शोध लागले. चाकाच्या निमित्ताने गतीचा, अग्नीच्या निमित्ताने ऊर्जेचा, शेतीच्या निमित्ताने अन्नोत्पादनाचा, अशी अनेक उदाहरणे देता येतील. लेखनकला हा एक अत्यंत महत्त्वाचा शोध होय. लिहिण्यावाचून फार अडते असे नव्हे. दुर्दैवाने आजही लिहिता-वाचता न येणारे अनेक लोक आढळतात. पण ते लिहायला-वाचायला शिकले तर त्यांच्या आयुष्यात जणू क्रांती घडून येते. माणसाच्या विकासामागे बुद्धीचे वरदान हे निःसंशय प्रमुख कारण आहे. बुद्धीचाच एक पैलू स्मरणशक्ती. लेखनकला अवगत होण्याआधी माणसाचा भर अर्थातच स्मरणशक्तीवर होता.

आजवर मानवाला अनेक शोध लागले. चाकाच्या निमित्ताने गतीचा, अग्नीच्या निमित्ताने ऊर्जेचा, शेतीच्या निमित्ताने अन्नोत्पादनाचा, अशी अनेक उदाहरणे देता येतील. लेखनकला हा एक अत्यंत महत्त्वाचा शोध होय. लिहिण्यावाचून फार अडते असे नव्हे. दुर्दैवाने आजही लिहिता-वाचता न येणारे अनेक लोक आढळतात. पण ते लिहायला-वाचायला शिकले तर त्यांच्या आयुष्यात जणू क्रांती घडून येते. माणसाच्या विकासामागे बुद्धीचे वरदान हे निःसंशय प्रमुख कारण आहे. बुद्धीचाच एक पैलू स्मरणशक्ती. लेखनकला अवगत होण्याआधी माणसाचा भर अर्थातच स्मरणशक्तीवर होता. पण लिहिण्याच्या तंत्राचा शोध लागल्यामुळे त्याला ज्ञानाचा साठा आणि देवाणघेवाण करणे शक्‍य झाले. प्रगल्भ बुद्धीला लेखनकलेची जोड मिळाल्याने स्मरणशक्तीवरचे त्याचे अवलंबित्व खूपच कमी झाले. ज्याप्रमाणे संगणकाच्या हार्ड डिस्कवरचा माहितीचा (डेटा) भार जास्त झाला तर संगणक मंद होतो, तसेच आपल्या मेंदूचेही होत असणार. त्यामुळे त्यामध्ये साठविलेल्या माहितीचा भार लिखित नोंदींमध्ये ट्रान्स्फर केला, तर तो नक्कीच जास्त क्षमतेने काम करू शकतो. शिवाय वयानुरूप स्मरणशक्ती क्षीण होत जाते, हा आपणा सर्वांचाच अनुभव आहे. लेखनकलेमुळे विस्मरणाच्या मर्यादेवर मात करता येते.

हे लेखनकलेचे व्यावहारिक उपयोग. पण माणसाचे जगणे व्यवहारापलीकडेही असते, नव्हे काय? कलानिर्मिती, व्यक्त होणे यांसारख्या गोष्टी माणसाच्या आयुष्यात मूल्यवृद्धी घडवून आणतात. सावरकरांनी तुरुंगात असताना भिंतीवर कोळशाने कविता लिहिल्या. नाझी भस्मासुराच्या हातून छळछावण्यांमध्ये ज्यांनी मरणप्राय अत्याचार सहन केले, त्यांनी आपले अनुभव ग्रंथित केले. यामुळे त्यांच्या मनावरील आघातांवर फुंकर मारली गेली. व्यक्त होण्याने, कटू भावनांचे विरेचन होऊन पुनःश्‍च एकदा मानसिक आरोग्य प्राप्त होते. म्हणूनच की काय समर्थ रामदासांनी म्हटले, ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे.’ याच उक्तीचा सार्थ उत्तरार्ध ‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे...’ असा आहे. लिहिणे आणि वाचणे हातात हात घालून जाते.

आता माझेच घ्या. मी एक सर्वसाधारण माणूस. पण ‘परिमळ’ या सदराने मला लिहिते केले. लिहिण्यामुळे आपल्यासारख्या रसिक वाचकांशी नाते जडले. गेले वर्षभर डोक्‍याला सतत भुंगा असायचा - पुढचा लेखांक कोणत्या विषयावर लिहू... ही मनाला लागलेली कळ हवीहवीशी असायची. मग कधीतरी एकदम मनात विषय अंकुरायचा. मग बसून लॅपटॉपवर लिहायला सुरवात. मनातील विचारांचा ओघ शब्दांमध्ये उतरायचा. अंतरात सुखद आणि कृतकृत्यतेची लहर दाटून यायची. सिंहगड चढून आल्यावर येते तशी. बुधवारी परिचित, अपरिचित वाचकांचे फोन, एसएमएस यायचे. फारच श्रीमंत करणारा अनुभव होता. या सदरातील आजचा लेखांक शेवटचा. आपणा सर्वांस नववर्षाच्या शुभेच्छा! फिर मिलेंगे!

Web Title: editorial artical vishwas sahastrabuddhe