अग्रलेख : मैं नहीं माखन खाऊं...

Dahihandi
Dahihandi

श्रावणातल्या हिरव्यागार कुंद हवेत अवचित अष्टमी उगवते आणि सारी सृष्टी जणू कृष्णभक्‍तीत सावळी सावळी होऊन जाते. जणू गोकुळातली गोपिकाच ती. त्याच सुमाराला शरद ऋतू आपले चांदणवैभव घेऊन उंबरठ्यावर येऊन उभा राहतो खरा; पण दारावरले श्रावणातले मेघ त्याला अजिबात आत सोडत नाहीत. बरीच हुज्जत घातल्यावर शरदाच्या ऋतूला घरात येण्याची परवानगी मिळते. आषाढाचा धटिंगणपणा सोसून श्रावणात थोडीशी विसावलेली सृष्टी शरदाच्या चांदण्याने मात्र मोहरून जाते. शारदीय चांदणे शिवाऱ्यातल्या कोवळ्या अंकुरांवर अस्तित्वाचा मंत्र फुंकरते.

दाण्यादाण्यांत जीव भरते. म्हणून तर ते चांदणे हवे! पण, औंदा पर्जन्य थोडा लांबला. एरवीपेक्षा त्याने जरा जास्तच धसमुसळेपणा केला. बेभान पुराच्या थैमानाने घायाळ झालेल्या सृष्टीने आता कृष्णभक्‍तीत रमावे तरी कसे? अंगदेहावरले हिरवे वस्त्र कसेबसे सावरणारी सृष्टी यंदा जन्माष्टमी आली, तरी पुरती भानावर आलेली नाही. जन्माष्टमीनंतरचा दिवस गोपाळकाल्याचा. गावोगावचे गोविंदा या दिवसाची वाट पाहत असतात. वाड्या-वस्त्यांमध्ये टांगलेल्या दहीदूधलोण्याच्या हंड्या देहांचे मनोरे लावून वाजतगाजत फोडावेत, ‘ढाक्‍कुमाकुम ढाक्‍कुमाकुम’च्या तालावर दिलखेच गाणी म्हणत दहीपोह्यांचा प्रसाद खावा, हा शतकानुशतकांचा परिपाठ. फुटक्‍या मटक्‍याची खापर घरातल्या फडताळात आणून ठेवली, की वर्षभर मायंदाळ दुधदुभते राहते म्हणतात. पण, यंदाच्या पुरात घरासोबत फडताळसुद्धा वाहून गेले. खापर ठेवावी तरी कुठे?

गोकुळाष्टमी आणि नवमीचा गोपाळकाला तसा देशभर साजरा होत असतो. पण, आपल्या महाराष्ट्रात त्याचे कवतिक काही औरच. त्यातला निरागसभाव लोपत गेला आणि या सुंदर परंपरेला कालौघात विपरीत रूप मिळाले. ‘ढाक्‍कुमाकुम’चा मस्त ताल डीजेच्या ‘डेसिबल’वान आवाजीत घुसमटत गेला. गोपिकांचे मनमुराद नृत्यगीत पडद्याआड गेले आणि त्याला ‘आयटेम साँग’ची व्यावसायिक कळा आली. सेलिब्रिटींचा महागडा वावर वाढला. दोन पैशांचा जिथे हिशेब नव्हता, तिथे लाखा लाखांचे बजेट आले.

गर्दी तिथे पुढारी, हे लोकशाहीतले समीकरणच. साहजिकच, गोविंदांच्या गर्दीत पुढारी शिरले. पाठोपाठ पुरस्कर्त्यांच्या गलेलठ्ठ थैल्या आल्या. बघता बघता गोपाळकाल्याचा भाबडा सण न उरता, त्याचा ‘इव्हेंट’ झाला.

गोपाळकाल्याची सांस्कृतिक महत्ता केव्हाच नामशेष झाली, उरला होता तो धंदेवाईक गोंधळ. पण, नुकत्याच आलेल्या पूरसंकटाने तर यंदा हा ‘इव्हेंट’ही झाकोळून गेला आहे.

मुंबई महानगरीत एरवी गोविंदाच्या सणाची मातब्बरी असते. गिरगावपासून वसईपर्यंत आणि माझगावपासून ठाण्यापर्यंत ठिकठिकाणी दहीहंड्या लटकत असतात. पाच ते पंचवीस लाखांची बक्षिसे असलेल्या या हंड्या फोडण्यासाठी अनेक मंडळांची गोविंदा पथके जिवाच्या कराराने मनोरे लावतात. वर्ष-सहा महिने गोविंदांचा सराव सुरू असतो. काही गोविंदांचे जायबंदी होणे तर नित्याचेच आहे. परंतु, आता न्यायालयाच्या आदेशानंतर गोविंदा आयोजनावर निर्बंध आले आहेत. गोविंदांचा विमा उतरण्यापासून मनोरे लावताना घ्यावयाच्या काळजीपर्यंत अनेक गोष्टींचा त्यात अंतर्भाव आहे. या निर्बंधांमुळे सणाची मजा थोडी कमी झाल्यासारखी वाटली, तरी त्याची आवश्‍यकता सर्वांनाच पटावी. सणाची मौज अपघात क्षणार्धात नष्ट करतात.

याखेरीज महागाई, आर्थिक मंदीचे घोंघावणारे वारे, बेरोजगारी अशा अनेक संकटांशी सामना करीत लोक गोविंदा, गणेशोत्सव किंवा नवरात्रीसारखे सार्वजनिक सण साजरे करीत असतात. गोपाळकाल्याच्या दिवशी मुंबईत कोट्यवधींची उलाढाल होत असते. परंतु, गेली दोनेक वर्षे त्यालाही हळूहळू आळा बसू लागला आहे. मुंबईत तब्बल नऊशे गोविंदा मंडळे आहेत. त्यातली काही छोटेखानी आहेत, तर काही मातब्बर पुढाऱ्यांच्या ताब्यातली. या मातब्बर दहीहंड्यांचा रुबाब काही वेगळाच असतो. यंदा नानाविध संकटांमुळे गोविंदाचा उत्साह नेहमीसारखा दिसत नाही, हे मान्य करावे लागेल. अर्थात, त्यामागे काही परिस्थितीजन्य कारणे आहेत. मूलत: हा चाकरमान्यांचा सण.

नोकरीधंदा सांभाळून साजरा करण्याचा दिवस. परंतु, यंदा मंदीच्या झटक्‍यामुळे नोकरीधंदा सावरणेच मुश्‍कील होत चालले आहे. त्याचाही परिणाम गोविंदांच्या उत्साहावर होताना दिसतो. यंदा तर महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची दखल घेऊन बहुसंख्य गोविंदांनी आपापल्या हंड्या रद्द करून जमा झालेला निधी पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. काही गोविंदा आयोजकांनी आपली दहीहंडी कायम ठेवली असली, तरी बक्षिसाची रक्‍कम घटवून तो निधी पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे. गोविंदा आयोजक आणि पथकांचे हे समाजभान निश्‍चितच स्तुत्य म्हणावे लागेल. हेच भान गणेशोत्सव आणि नवरात्री मंडळांनीही दाखवले तर सार्वजनिक समारंभांचे प्रयोजनच अधोरेखित होईल. दहीहंडीचा उत्सव आणि उत्साह यंदा थोडा उणावला असला, तरी त्यातून उभा राहणारा सार्वजनिक निधी सत्कारणी लागलेला पाहणे केव्हाही समाधानकारक मानायला हवे. गोकुळावर संकट आले तर खुद्द तो वृंदावनीचा नवनीतचोरदेखील ‘मैं नहीं माखन खाऊं’ असेच म्हणेल. मुखीचा घास काढून सवंगड्यांना देणारा तो नंदलाल पडला साक्षात देव! आपण तर मर्त्य माणसे. महापुरातून सावरणाऱ्या पूरग्रस्तांपुढे केलेला मदतीचा हात हे देवाचेच हात मानायला हवेत. तसे घडल्यास यंदाचा गोपाळकाला खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com