अग्रलेख : ओंजळीत येईल चंद्र!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

एखाद्या संस्थेची कामगिरी जेव्हा कोट्यवधींच्या हृदयात घर करते, तेव्हा अपयश पचविण्याची, नवा इतिहास रचण्याची ऊर्मी उसळून येते. चांद्रयान मोहिमेबाबतीतही तसे घडते आहे. यानिमित्ताने वैज्ञानिक प्रयोगांचे वैशिष्ट्य अधोरेखित झाले, हे महत्त्वाचे. 

एखाद्या संस्थेची कामगिरी जेव्हा कोट्यवधींच्या हृदयात घर करते, तेव्हा अपयश पचविण्याची, नवा इतिहास रचण्याची ऊर्मी उसळून येते. चांद्रयान मोहिमेबाबतीतही तसे घडते आहे. यानिमित्ताने वैज्ञानिक प्रयोगांचे वैशिष्ट्य अधोरेखित झाले, हे महत्त्वाचे.

अष्टमीच्या भल्या पहाटे शनिवारी, संपूर्ण देश डोळ्यावरची झोप झुगारून महत्त्वाकांक्षी चांद्रयान -२ अंतराळ मोहिमेच्या अंतिम यशाकडे डोळे लावून बसला होता. गेल्या २२ जुलैला देशाचे दुसरे चांद्रयान चंद्राकडे झेपावल्यापासून या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’चे पहिले प्रमुख विक्रम साराभाई यांचेच नाव दिलेले ‘विक्रम लॅंडर’ अंतराळयानापासून विलग होऊन प्रचंड वेगाने नियोजनानुसार चंद्राच्या पृष्ठभागाकडे कूच करीत होते. वेग कमी करीत जाण्याच्या शेवटच्या १५ पंधरा मिनिटांत ‘विक्रम’ एकेक टप्पा पार करीत होता, तसा बंगळूरच्या नियंत्रण कक्षात टाळ्यांचा कडकडाट होत होता. अंतिम क्षणी श्‍वास रोखले गेले... अन्‌ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पृष्ठभागापासून तो अवघे २१०० मीटर दूर असताना तांत्रिक बिघाड झाला. ठरल्याप्रमाणे ‘विक्रम’ हळूवार उतरू शकले नाही. लॅंडरशी संपर्क तुटला. त्या कुपीत बसविलेली प्रज्ञान बग्गी चंद्रावर उतरू शकली नाही. या मोहिमेवर रात्रंदिवस काम करणारे ‘इस्रो’मधील शेकडो शास्त्रज्ञ, त्यांचे प्रमुख के. सिवान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या कर्तबगारीवर विश्‍वास असणारे कोट्यवधी भारतीय हळहळले. 

तीव्र झालेली अंतराळ स्पर्धा आणि अनेकदा भारताने त्यात मारलेली मजल पाहता ही हळहळ स्वाभाविक आहे. ‘इस्रो’च्या मोहिमांमध्ये अपयशाचे प्रमाण अत्यल्प आहे, हे लक्षात घेतले तर ही भावना समजून घेता येते; परंतु, ‘चांद्रयान-२’ मोहीम फसलेली नाही. तिचे ९० ते ९५ टक्‍के उद्दिष्ट साध्य झाले आहे. मून ऑर्बिटर चंद्राभोवती घिरट्या मारत, विविध प्रकारची माहिती मिळवणार आहे. त्याने अखरेच्या क्षणी संपर्क तुटलेला ‘विक्रम’ लॅंडर शोधून काढलाही आहे. ऐतिहासिक यशाच्या जवळ पोचूनही तो शिरपेचातील मानाचा तुरा गवसला नाही, हीच खंत.

लोकजीवनातल्या लाडक्‍या चंदामामाबाबत सांगायचे तर जगाची स्पर्धा चंद्राच्या विषुववृत्तापासून दक्षिण बाजूला ध्रुवाच्या दिशेने, पृथ्वीवरील भाषेत सांगायचे तर मकरवृत्ताच्या पुढे अधिकाधिक दूरवर पोचण्याची आहे. विषुववृत्ताच्या अवतीभोवतीचा परिसर मैदानी, भरपूर सूर्यप्रकाशाचा, पर्यायाने सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांसाठी अनुकूल. याउलट, दोन्ही ध्रुवांच्या बाजूला खाचखळगे, अवघड उंचवटे,खोल विवरे, धुळीचे लोट यामुळे परिस्थिती अधिकाधिक खडतर बनत जाते. सूर्यमालेच्या निर्मितीपासून अंधारात असलेली चंद्राची दक्षिण बाजू पृथ्वीवरून दिसत नाही. खूप मोठ्या टापूवर, विशेषत: विवरांच्या तळाला कधीच सूर्यप्रकाश पडत नाही. काही टापू अतिशीत आहेत. तापमान उणे २३० अंशांपर्यंत खाली जाते. त्याच भागात गोठलेल्या अवस्थेत पाण्याची शक्‍यता आहे. अश्‍मीभूत हायड्रोजनचे साठे असल्याचा अंदाज आहे. चुंबकीय प्रभावाचे भूभाग आहेत. एटकेन नावाचे विशालकाय खोरे चंद्राच्या दक्षिण गोलार्धात आहे. हिमालयापेक्षा उंचीचे ‘इप्सिलॉन’ नावाचे पर्वतशिखर आहे. अशा कमालीच्या प्रतिकूल भागात ‘विक्रम’ उतरणार होते. याआधी हे कोणत्याही देशाला जमलेले नाही.

अलीकडेच चीनच्या ‘चँग-४’ यानाने सॉफ्ट लॅंडिंग केले ते विषुववृत्तापासून ४५ अक्षांशावर आणि ‘विक्रम’चे नियोजित लॅंडिंग होते ७० अक्षांशावर. चांद्रयान मोहिमेची ही गुंतागुंत लक्षात आल्यानेच ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना उद्देशून आम्हाला तुमचा अभिमान असल्याची, कठीण काळात देश तुमच्या पाठीशी असल्याची भावना कोट्यवधी भारतीयांनी व्यक्‍त केली. एखाद्या संस्थेची कामगिरी अशा रीतीने जेव्हा कोट्यवधींच्या हृदयात घर करते, तेव्हा अपयश पचविण्याची, चुकांपासून धडा घेत नवा इतिहास घडविण्याची ऊर्मी जन्म घेते. वैज्ञानिक प्रयोगाचेही हेच वैशिष्ट्य असते. ते यश-अपयशाच्या फूटपट्टीने मोजता येत नाहीत. आनंदाने युरेका, युरेका ओरडणारे शास्त्रज्ञ त्याआधी कित्येक वर्षे रात्रीचे दिवस करीत असतात. जे जे अज्ञात आहे त्याच्या शोधासाठी प्रयोग करीत राहणे, हे वैज्ञानिक वृत्तीचे खरे लक्षण. ‘इस्रो’च्या यशापयशाचा केवळ भारतीयत्वापुरता विचार करता येत नाही.

वैज्ञानिक मोहिमांना मानवनिर्मित सीमा नसतात. त्यात मानवजातीच्या भविष्यातील कल्याणाचा विचार असतो. अर्थात, मोहिमा राबविणारीही माणसेच असतात. त्यांनाही भावभावना असतात. ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवान यांना या दृष्टीने समजून घ्यायला हवे. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान, विविध प्रांतांतील ७४ विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या रूपाने पुढच्या पिढीचे प्रतिनिधी उपस्थित असताना अपयश आल्याने ते दु:खी होणे, पंतप्रधानांनी त्यांना जवळ घेऊन सांत्वन करणे, हा एका मोठ्या प्रवासातील छोटासा प्रसंग आहे. त्यावर सुरू असलेली उलटसुलट चर्चा माणसांचे स्वभाव म्हणून सोडून देऊ आणि आजचे क्षणिक अपयश उद्याच्या देदीप्यमान यशात परावर्तित करण्यासाठी ‘इस्रो’ला शुभेच्छा देऊया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article