अग्रलेख : आमचं ठरलंय, तरीही...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

राज्याच्या राजकीय रंगमंचावर सध्या दिसते आहे, तसे अविश्‍वासाचे, अनिश्‍चिततेचे चित्र यापूर्वी कधीही उभे राहिले नव्हते. सत्ताधारी गोटातच नव्हे, तर विरोधकांच्या बाबतीतही हेच चित्र आहे, त्यामुळे खरी कसोटी मतदारांचीच लागणार आहे.

राज्याच्या राजकीय रंगमंचावर सध्या दिसते आहे, तसे अविश्‍वासाचे, अनिश्‍चिततेचे चित्र यापूर्वी कधीही उभे राहिले नव्हते. सत्ताधारी गोटातच नव्हे, तर विरोधकांच्या बाबतीतही हेच चित्र आहे, त्यामुळे खरी कसोटी मतदारांचीच लागणार आहे.

अवघा महाराष्ट्र आज जना-मनात वसलेल्या गणरायांना मोठ्या धुमधडाक्‍यात निरोप देत असतानाच, विधानसभा निवडणुकीचे रणशिंगही फुंकले जात आहे. आचारसंहिता लवकरच लागू होईल आणि राजकीय धुमश्‍चक्री आणखी वेग घेईल. या पार्श्‍वभूमीवर आज महाराष्ट्राचे राजकीय चित्र नेमके कसे आहे? तर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे प्रमुख ‘आमचं ठरलंय!’ असे तारस्वरात सांगत असले, तरीही प्रत्यक्षात जागावाटपावरून त्यांच्यातील ताण वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. त्याचवेळी लोकसभेत पराभवाला सामोरे जाणे भाग पडलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार, हे स्पष्ट झाले आहे.

‘राष्ट्रवादी’चे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेऊन यासंबंधी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत लाखालाखांनी मते घेऊन मतविभागणीचे ‘श्रेय’ पदरात घेतलेल्या ‘बहुजन वंचित आघाडी’त फूट पडली असून, आता प्रकाश आंबेडकर तसेच ‘एमआयएम’चे नेते असदुद्दीन ओवेसी एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे राहतील.‍ पदार्पणातच विधानसभेच्या नऊ जागा जिंकणाऱ्या आणि लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मात्र मिठाची गुळणी घेऊन बसले आहेत. 

एकीकडे, भाजपचा ‘मेगा भरती’चा कार्यक्रम जोमाने सुरू आहे, तर त्याचवेळी हातावर ‘शिवबंधन’ बांधून घेण्यासाठीही काही जण ‘मातोश्री’वर खेटे घालत आहेत. राजकीय घडामोडींना अशारीतीने वेग आलेला असतानाच, ‘युती’ असो की ‘आघाडी’; कोणत्याच गटातील नेत्यांचा एकमेकांवर कवडीइतकाही विश्‍वास उरलेला नाही. त्यामुळे राजकीय अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. राज्याच्या राजकीय रंगमंचावर हे इतके अविश्‍वासाचे, अनिश्‍चिततेचे आणि दगलबाजीचे चित्र यापूर्वी कधीही उभे राहिले नव्हते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ना ‘युती’ होती; ना ‘आघाडी’! तेव्हा भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. त्या अल्पमतातील सरकारला वाचवण्याचे काम आधी राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देऊन आणि नंतर शिवसेनेने सत्तेत सहभागी होऊन केले होते. मात्र, तेव्हापासून सुरू असलेली युतीतील धुसफूस लोकसभेत गळामिठी मारल्यानंतरही थांबलेली नाही. लोकसभा निवडणुकीत  काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हेच भाजपच्या छावणीत निघून गेले. तेव्हापासून काँग्रेस तसेच `राष्ट्रवादी’ या दोन पक्षांना लागलेला ‘मेगा गळती’चा रोग फोफावत चालला आहे. बुधवारी तर काँग्रेसचे दोन माजी मंत्री कृपाशंकर सिंह आणि हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला.

हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी ‘कमळ’ हातात घेतले. भाजप सरकारने कृपाशंकर यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप असूनही कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले, तेव्हाच ते भाजपमध्ये जाणार, अशी चिन्हे दिसू लागली होती. लोकसभेच्या वेळी नगरची जागा सोडायला ‘राष्ट्रवादी’ने नकार दिल्याने विखे घराणे भाजपमध्ये आपल्या सर्व संस्थांसह दाखल झाले होते. तर, आता विधानसभेत इंदापूरची जागा सोडायला ‘राष्ट्रवादी’ तयार नसल्याचे सांगत हर्षवर्धन भाजपमध्ये निघून गेले आहेत. मात्र, काँग्रेस वा ‘राष्ट्रवादी’ त्याबाबत काही रणनीती आखताना दिसत नाहीत. तरुणांना संधी देण्याची संधी काँग्रेसकडे चालून आली आहे, पण तसा विचार होतोय किंवा नाही, हेच कळत नाही.

युतीतील जागावाटपाचा घोळ तर गेले काही आठवडे सुरू आहे आणि त्याचे कारण भाजपने प्रस्थापित केलेल्या राज्यभरातील वर्चस्वात आहे. दोन समविचारी पक्षांची आघाडी झाली, तरी ते आपापल्या पक्षाचा विस्तार करू पाहत असतात आणि त्यात भाजपने मारलेली बाजी हेच शिवसेनेचे मूळ दुखणे आहे. उद्धव ठाकरे कितीही गर्जना करीत असले, तरी त्यांची अगतिक देहबोली अखेरीस ते भाजप देईल त्या जागांवर समाधान मानणार, हेच सांगत आहे. लोकसभेत राज ठाकरे यांनी मोदी आणि शहा यांना लक्ष्य करून मैदान दणाणून सोडले होते. मात्र, त्यांची प्रामुख्याने शिवसेनेतून आलेली मतपेढी ही काँग्रेस वा राष्ट्रवादी यांच्याकडे वळविण्यात त्यांना यश येऊ शकले नाही. त्याचा फायदा शिवसेनेने उठविला. कारण, ‘मनसे’चे उमेदवारच रिंगणात नव्हते. आताही राज यांनी निवडणूक लढवली नाही, तर पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची खरी भिस्त ही आता बहुजन वंचित आघाडीत पडलेल्या फुटीवर असणार. मात्र, त्या फुटीचा फायदा उठविण्यासाठी या दोन्ही पक्षांना नव्याने रणनीती आखावी लागणार आहे आणि तोपावेतो या दोन्ही पक्षांतील आणखी अनेक नेते भाजप-शिवसेनेत दाखल झालेले असू शकतात. या पार्श्‍वभूमीवर यंदा खरी कसोटी आहे ती मतदारांची. या पक्षबदलूंना मतदार निवडून देतात की त्यांना त्यांची जागा दाखवतात, हे निकालांनंतरच कळेल आणि पक्षनिष्ठेचे महत्त्व राहणार की नाही, हेही समजेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article