अग्रलेख : निर्भय लेखणीचे धनी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

‘टक्‍केटोणपे खात तावून सुलाखून निघालेला शहाणा माणूस घट्टपणे आपली मृत्यूकडे होणारी वाटचाल सुरूच ठेवतो...’ अशा आशयाच्या वाक्‍याने ओल्गा तोकारचूक यांची ‘ड्राइव युअर प्लाऊ ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ ही कादंबरी सुरू होते. वरवर पाहता ती एक मर्डर मिस्टरी आहे; पण ओल्गा तोकारचूक यांनी त्यातही आपली बंडखोरी दाखवलीच आहे

‘टक्‍केटोणपे खात तावून सुलाखून निघालेला शहाणा माणूस घट्टपणे आपली मृत्यूकडे होणारी वाटचाल सुरूच ठेवतो...’ अशा आशयाच्या वाक्‍याने ओल्गा तोकारचूक यांची ‘ड्राइव युअर प्लाऊ ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ ही कादंबरी सुरू होते. वरवर पाहता ती एक मर्डर मिस्टरी आहे; पण ओल्गा तोकारचूक यांनी त्यातही आपली बंडखोरी दाखवलीच आहे. गमतीदार घटनांची मालिका, पानापानांतून ठिबकणारी सडेतोड स्त्रीवादी भूमिका आणि खोचक राजकीय टिप्पण्या यामुळे हे पुस्तक लक्ष वेधून घेते. ओल्गा यांच्या ‘फ्लाइट्‌स’ या कादंबरीला गेल्या वर्षी ‘मॅन बुकर’ पुरस्कार मिळाला होता.

विशेष म्हणजे, त्याच वर्षीचा नोबेल पुरस्कार परवा (गुरुवारी) जाहीर झाला, तोदेखील त्यांच्याच कपाटात गेला. कुठल्याही लेखकाला हेवा वाटेल, असे हे योगायोग. ओल्गा तोकारचूक हे पोलंडमधल्या साहित्य वर्तुळातले मोठे नाव. खरेतर थोडे दबक्‍या आवाजात घेतले जाणारे. कारण फटकळ लेखणीच्या या बाईंनी उजव्या विचारसरणीच्या राज्यकर्त्यांना झोडण्याची एकही संधी कधी सोडली नाही. ‘वसाहतवादाच्या नावाखाली पोलिश राज्यकर्त्यांनी काही कमी अमानुष प्रकार केलेले नाहीत, इतिहास साक्षी आहे,’ असे त्यांनी ठणकावून एका प्रदीर्घ मुलाखतीत सांगितले होते, तेव्हा त्यांच्या देशात केवढा गहजब माजला होता! स्वतःच्याच देशबांधवांना आपल्या पायाखाली काय जळते आहे, याची जाणीव करून देणारा कुठलाही साहित्यिक किंवा कलावंत लोकप्रिय असण्याची शक्‍यता नसते; पण ओल्गा तोकारचूक हे रसायनच वेगळे. त्यांची पुस्तके चांगली खपतातच; पण टीकाही ओढवून घेतात.

‘ड्राइव्ह युअर प्लाऊ...’ या पुस्तकावर आधारित एक चित्रपटदेखील दोन वर्षांपूर्वी येऊन गेला होता, त्यालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसन्मान मिळाले होते. ‘खुनी कोण?’ छापाची कादंबरी लिहिणे त्यांना कठीण नव्हते; पण ‘निव्वळ खुनी कोण, याचे उत्तर शोधण्यासाठी इतका वेळ आणि कागद का खर्ची घालावा?’ असा निरुत्तर करणारा सवाल त्या करतात. ओल्गा यांची ‘नोबेल’साठी झालेली निवड काही वेगळे सांगू पाहते आहे, हे मात्र खरे.

गेल्या वर्षीचे ‘नोबेल’ ओल्गा यांना मिळाले, तर यंदाचा नोबेल पुरस्कार पीटर हाण्डके या ऑस्ट्रियन लेखकमहाशयांना जाहीर झाला आहे. हा निर्णय मात्र जगभर बराच ‘बोचलेला’ दिसतो आहे. तब्बल ऐंशीच्या वर पुस्तके लिहून प्रसिद्ध पावलेल्या हाण्डके यांनी नव्वदीच्या दशकात सर्बियातील अन्यायाचे उघड समर्थन केले होते. सर्बियन वांशिक भडक्‍यांमध्ये ‘नको त्या’ पक्षाची बाजू घेतल्याखातर हाण्डके यांना प्रखर टीकेला सामोरे जावे लागले. त्यांनी ज्यांचे समर्थन केले, ते सर्बियन नेते स्लोबोदान मिलोसेविक आणि रादोवान कारात्झिक यांच्यावर पुढे संयुक्‍त राष्ट्रांनी खटला चालवून त्यांना शिक्षाही ठोठावली. अशा बुद्धिभ्रष्ट माणसाला पुरस्कार देऊन नोबेल समितीला काय साध्य करायचे आहे, असा सवाल वैचारिकांच्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात विचारला जातो आहे. विशेषतः अल्बेनिया, कोसोवो आणि बोस्निया येथे हाण्डके यांच्या लिखाणाकडे तिरस्कारानेच पाहिले जाते. इतके की, ‘यंदा पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यावर चक्‍क उमासा आला,’ अशी जळजळीत प्रतिक्रिया अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी अधिकृतरीत्या नोंदवली आहे. अशाच आशयाच्या तिखट प्रतिक्रिया समाजमाध्यमांमध्ये उमटताहेत.

या प्रतिक्रियांनादेखील एक बाजू आहेच. पीटर हाण्डके यांना जाहीर झालेल्या पुरस्काराला इतका विरोध होण्याचे कारण काय, हे माहीत करून घेण्यासाठी युगोस्लावियाच्या वांशिक समस्येची तोंडओळख करून घ्यावी लागेल. आधुनिक जगातला तो एक प्रचंड नरसंहार होता. किंबहुना सर्बियन युद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे पूर्व युरोपने भोगलेले सर्वांत विध्वंसक असे नष्टचर्य मानले जाते. वास्तविक हे युद्ध पारंपरिक अर्थाने युद्ध नव्हते. अनेक सशस्त्र उठावांचे ते एकत्रित रूप मानावे लागेल. दुसऱ्या महायुद्धात सहा प्रजासत्ताकांच्या फेडरेशनच्या रूपात एका सूत्रात बांधल्या गेलेल्या युगोस्लावियाची नव्वदीच्या दशकात पडझड झाली. वांशिक दंगली आणि युद्धांचा भडका उडाला होता. त्या भडक्‍यात सगळेच होरपळले. पीटर हाण्डके यांनी सर्बियन जनतेची तुलना जर्मनीतल्या यहुद्यांशी केली होती. वांशिक दंगलीच्या होरपळीच्या आठवणी अजूनही तेथील जनतेच्या आठवणीत ताज्या आहेत. 

ओल्गा तोकारचूक आणि पीटर हाण्डके यांना ओळीने दोन नोबेल पुरस्कार देण्यामागे नोबेल पुरस्कार समितीचा हेतू स्पष्ट दिसतो. जवळपास सगळ्याच जगात सध्या उजव्या विचारसरणीच्या शासकांचा शिक्‍का चालताना दिसतो. देश, प्रांत, भाषा, धर्म अशा किती तरी परीच्या अस्मितांचे उष्ण प्रवाह जागतिक नकाशावर वाहताना दिसतात. वैचारिकांची गळचेपी सर्वत्रच होताना दिसते. म्हणूनच विरोधी विचारसरणीबाबतची सहिष्णुता आटताना दिसते. माणूस अधिक ‘ग्लोबल’ होत चालला आहे, की अधिक प्रांतवादी? आणि तसे असेल तर का? या सवालांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक वैचारिक, शास्त्रवेत्ते धडपडत असताना निर्भयपणे शासकांचा दंभस्फोट करणाऱ्या तुरळक वैचारिकांच्या पाठीशी उभे राहणे हे सुजाणांचे कर्तव्य ठरते. बहुसंख्यांच्या उन्मादी कोलाहलात एक निर्भय क्षीण आवाजसुद्धा सत्याचा अंकुर जिवंत ठेवतो, त्या क्षीण आवाजात लाव्हारसाची उष्णता असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article