अग्रलेख : खेळाचे मारेकरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

स्पर्धेत जिंकण्यासाठी उत्तेजकांचा वापर हा ‘खेळा’वरील डागच. मात्र, रशियावर बंदी घालून तो धुतला जाईल का? खरी निकड आहे ती मानवी क्षमतांचा परमोच्च कस पाहणारा ऑलिम्पिक सोहळा पूर्णत: उत्तेजकमुक्‍त करण्याची.

स्पर्धेत जिंकण्यासाठी उत्तेजकांचा वापर हा ‘खेळा’वरील डागच. मात्र, रशियावर बंदी घालून तो धुतला जाईल का? खरी निकड आहे ती मानवी क्षमतांचा परमोच्च कस पाहणारा ऑलिम्पिक सोहळा पूर्णत: उत्तेजकमुक्‍त करण्याची.

ग्रीसमधील ऑलिम्पिया नगरीत ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात झालेल्या क्रीडा महोत्सवाच्या देदीप्यमान इतिहासातून प्रेरणा घेत पिअरी द कुबेर्तिन यांनी १८९६ मध्ये आधुनिक ऑलिम्पिक सोहळ्याला पुन:प्रारंभ केला. अवघे जग खेळांच्या मैदानात एकत्र आणि एकदिलाने उतरवण्याचा त्यांचा उदात्त हेतू बव्हंशी तडीला गेलादेखील, परंतु, मानवतेच्या मूल्यांचा उद्‌घोष करणाऱ्या या क्रीडा महोत्सवात अपरंपार पैशाचा ओघ सुरू झाल्यानंतर सारेच बदलून गेले आहे. लांड्यालबाड्या, खोटेपणा, राजकारणाचे कुटिल डावपेच, भ्रष्टाचार, चापलुसी असल्या भयंकर रोगांची लागण इथेदेखील झाली, हे दुर्दैव. गेल्या सव्वाशे वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासातले डागाळलेले प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. ते प्रकरण आहे उत्तेजकांच्या वापराचे-डोपिंगचे. उत्तेजकांच्या वापरामुळे गेली अनेक वर्षे वादग्रस्त ठरलेल्या रशियनांवर जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने सोमवारी चार वर्षांची बंदी लादली.

या निर्णयाने जगभर खळबळ माजली आहे. या बंदीच्या काळात रशियन पथकाला पुढील वर्षी जपानमध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा सोहळ्याला मुकावे लागेल. २०२२च्या फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धेची दारेही त्यांच्यासाठी बंद राहतील. कुठल्याही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये रशियाचे ना राष्ट्रगीत वाजेल, ना त्यांचा ध्वज फडकेल. कुठल्याही अस्सल खेळाडूसाठी याहून अधिक मानहानिकारक असे काही नाही. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने रशियाच्या संदर्भात इतका टोकाचा निर्णय का घेतला? मुळात हा निर्णय टोकाचा आहे, की अगदीच मुळमुळीत? या बंदीमुळे निष्कलंक रशियन खेळाडूंच्या भवितव्याचे काय होणार? असे अनेक प्रश्‍न सध्या उपस्थित झाले आहेत.

रशियात खेळांमध्ये होणारा उत्तेजकांचा सर्रास वापर गेली अनेक वर्षे आधी कुजबुजीचा आणि नंतर उघड चर्चेचा विषय होता. खेळाडूंच्या उत्तेजकांच्या वापराला रशियन क्रीडा प्रशासकांचाच मूक पाठिंबा असल्याचे उघड दिसत होते. २०१५ मध्येच रशियन उत्तेजक प्रतिबंधक संस्थेला ऑलिम्पिक समितीने ‘बेदखल’ ठरवले होते. उत्तेजक चाचण्यांचे तपशील उघड करण्याच्या अटीवर रशियन संस्थेला पुन्हा एकवार गेल्या वर्षी संधी देण्यात आली. तथापि, अनेक वादग्रस्त चाचण्यांबाबत फेरफार झाल्याचा अहवाल प्राप्त होताच रशियावर चार वर्षांची बंदी जागतिक संस्थेने लादली. ‘ही बंदी म्हणजे फारच गुळमुळीत पाऊल आहे,’ अशी टीका काही देशांच्या प्रतिनिधींनी केली आहे. उत्तेजकाच्या वापरामुळे क्षमता नसलेल्या खेळाडूला यश मिळते व पर्यायाने असामान्य गुणवत्ता दाखवणाऱ्या निष्कलंक खेळाडूवर अन्याय होतो. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी रशियावर कायमचीच बंदी लादायला हवी, अशा प्रतिक्रियाही काही देशांनी नोंदवल्या आहेत.

परंतु, रशियातील सत्ताधाऱ्यांनी मात्र या बंदीचा स्वीकार फार थंडपणाने केलेला दिसतो. ‘आपल्या देशात डोपिंगची समस्या बरीच व्यापक आहे, हे मान्य करावे लागेल. परंतु, ही बंदी म्हणजे काही जगाचा अंत नव्हे. आपण आपल्या क्रीडा स्पर्धा शानदाररीत्या आयोजित करू,’ अशी टिप्पणी रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी केली, तर एकंदरीतच जगात ‘रशियाविरोधी उन्माद’ वाढत असल्याचे हे लक्षण आहे, अशी तिखट प्रतिक्रिया रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांनी नोंदवली आहे.

रशियन नेतेमंडळींचा जो युक्‍तिवाद आहे, त्यातही थोडेफार तथ्य आहेच. सारे काही निष्कपटपणाने चालले आहे, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. कारण, जागतिक उत्तेजक संस्थेच्या या बंदीमध्ये काही पळवाटा आहेत व त्यामुळे टीकेचे मोहोळ उठले आहे. पहिली पळवाट म्हणजे, या बंदीमुळे ऑलिम्पिक सहभागाला मुकणाऱ्या रशियन खेळाडूंना तटस्थ ध्वजाखाली सोहळ्यात सहभागी करून घेण्याची ऑलिम्पिक समितीची तयारी आहे. गेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये रशियन खेळाडूंनी असा सहभाग घेतला होता. या बंदीमुळे २०२२ मध्ये कतार येथे होणाऱ्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत रशियाचा संघ थेट उतरू शकणार नसला, तरी पात्रता फेऱ्यांमध्ये मात्र खेळू शकेल! या पळवाटांमुळे बंदीचा रशियावर नेमका काय परिणाम होणार, हे अस्पष्टच राहिले आहे. काहीही असले तरी आपल्या देशासाठी पदक जिंकणे, आपल्या देशाच्या राष्ट्रगीताची धून वाजण्यास कारण होणे, आपला राष्ट्रध्वज अभिमानाने मिरवणे, हे कुठल्याही खेळाडूच्या कारकिर्दीतले सर्वोच्च मानबिंदू असतात. वैयक्‍तिक यशापेक्षाही त्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. परंतु, ज्या पदकासाठी सर्वस्व पणाला लावलेले असते, ते केवळ राजकीय हातघाईपायी हातातून निसटण्यासारखे दुर्दैव नाही. रशियाच्या निरपराध खेळाडूंच्या नशिबी हेच नष्टचर्य आले आहे. या बंदीच्या पार्श्‍वभूमीवर दोन महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित होतात व त्यांची उत्तरे शोधणे क्रमप्राप्त आहे. अशा बंदीमुळे मानवी क्षमतांचा परमोच्च कस पाहणारा हा ऑलिम्पिक सोहळा पूर्णत: उत्तेजकमुक्‍त होईल काय? बंधुभावाची ग्वाही देत आयोजिल्या जाणाऱ्या या सोहळ्यात खऱ्या अर्थाने बंधुभाव दृग्गोचर होईल काय? या दोन्ही सवालांची उत्तरे आज तरी ऑलिम्पिक समितीकडे नाहीत. नजीकच्या काळात ती मिळण्याची शक्‍यता दुरापास्तच दिसते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article