सर्जनशीलतेला सलाम

Ranjitsinh-Disale
Ranjitsinh-Disale

झमगमगत्या महानगरांपासून दूरवरच्या ठिकाणी, अगदी साध्यासुध्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकही नावीन्याचा ध्यास घेऊन काय किमया घडवू शकतो, हे रणजितसिंह डिसले या शिक्षकाने दाखवून दिले. ‘युनेस्को’ आणि लंडनमधील ‘वार्की फाउंडेशन’च्या जागतिक शिक्षक पुरस्काराचे ते मानकरी ठरल्याने त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीतला हा एक सुवर्णक्षण आहेच; परंतु त्याचे तेवढेच महत्त्व नाही. एकूणच शिक्षण क्षेत्रात अनेक कारणांनी निर्माण झालेले निराशेचे मळभ दूर होण्यास, खेड्यापाड्यांतील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगले करण्यासाठी धडपडणाऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यास ही घटना कारणीभूत ठरेल. राज्याच्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माढा तालुक्‍यातील परितेवाडी गावात प्राथमिक शिक्षक असणारे डिसले हे एक ‘धडपडणारे गुरुजी’ आहेत.

‘भविष्यात काय होणार, याचे उत्तम भाकीत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते स्वतःच घडविणे’ या वचनावर श्रद्धा असलेले डिसले यांना पाठ्यपुस्तकातील पानांवर ‘क्‍यूआर कोड’ देण्याची कल्पना सुचली. विषय शिकविताना, तो वाचत असतानाच त्याला पूरक अशा दृश्‍य ‘ई-कंटेन्ट’ची जोड मिळाली तर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, हा त्यामागचा विचार. नुसती कल्पना लढवून ते थांबले नाहीत तर राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा, यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला.

सरकारनेही ही कल्पना उचलून धरल्याने हा प्रयोग अमलात आला. त्याची दखल आधी ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी घेतली आणि आता आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली. हा दहा लाख डॉलरचा, म्हणजे तब्बल सात कोटी रुपयांहून अधिक रकमेचा पुरस्कार ज्या रीतीने त्यांनी स्वीकारला, तेदेखील कौतुकास्पद आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांच्याबरोबर जे नऊ जण अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते, त्यांना या रकमेतील अर्धा भाग देणार असल्याचे डिसलेंनी सांगितले आहे. याशिवाय त्यांना मिळालेली रक्कम ते आपल्या शैक्षणिक प्रयोगांसाठी वापरणार आहेत. हे सगळे इतके सुंदर आहे, की हा पुरस्कार मिळणे म्हणजे ‘अलंकारिले कवण कवणे...’ असा प्रश्‍न पडावा.

डिसले यांनी मिळविलेले यश सकारात्मक परिवर्तनाची चाहूल देणारे आहे. जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की, नाकडोळे मुरडले जातात. शाळांत पुरेसे विषय शिक्षक, मूलभूत सुविधा, मुलींसाठी पूरक वातावरण हे चिंतेचे विषय असतात. ते सगळे असले तरी शैक्षणिक कामापेक्षा इतर बाबीच तिथे जास्त घडतात, परिणामी शिक्षण कागदावरच राहते. तथापि, गेल्या काही वर्षांत डिसलेंसारख्या तरुण शिक्षकांनी मातीशी नाते घट्ट करत ग्रामीण मुलांना पारंपरिक शिक्षणासह तंत्रज्ञानाकडे वळवत अध्यापनात आधुनिकता आणली आहे, ग्रामस्थांनीही मदत केल्याने त्यात गतिमानता आली आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात इंग्रजी माध्यमाकडे पाठ फिरवत काही जिल्हा परिषद शाळांत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तथापि, वेगवेगळ्या शिक्षणबाह्य कामांच्या भाराखाली वाकून गेलेला शिक्षकवर्ग ही चिंतेची बाब आहे.

‘सकाळ’ने याआधी केलेल्या राज्यव्यापी पाहणीत महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांच्या अवस्थेचे विदारक चित्र समोर आले होते. प्रत्येक ठिकाणी भेडसावणाऱ्या प्रश्‍नांचे स्वरूप वेगळे होते, मात्र समान समस्या म्हणजे घटणारी पटसंख्या, हे मात्र दुखणे आहे. तरीही डिसले यांच्यासारखे तळमळीचे शिक्षक जेव्हा लाभतात, तेव्हा प्रतिकूलतेवर मात करूनही गगनाला गवसणी घालता येते. एवढेच नव्हे तर, एकूण शिक्षणव्यवस्थेविषयीची मनात घट्ट रुतून बसलेली समीकरणे पुन्हा तपासून पाहणे भाग पडते. डिसले यांच्या लखलखीत कर्तृत्वामुळे हा सगळा बदल घडण्याची आशेची किरणे दिसू लागली आहेत, म्हणूनच पुरस्काराचे मोल मोठे आहे.

कुतूहलाचे इंद्रिय जागे ठेवले आणि बदल घडविण्याची तळमळ मनात असेल तर नक्कीच काही नवे, अर्थपूर्ण घडवता येते. अलीकडेच केंद्राने स्वीकारलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात उत्स्फूर्ततेला, प्रयोगशीलतेला महत्त्व दिलेले दिसते. त्या दिशेने खरोखर जायचे असेल तर त्या वाटचालीत डिसलेंसारख्या शिक्षकांची भूमिका कळीची असेल. त्यामुळे त्यांचे कौतुक करण्यावर समाधान न मानता सरकारने अशा प्रयोगांच्या पाठीशी धोरणात्मक पाठबळ उभे करावे, पायाभूत सुविधा पुरवाव्यात. सार्वत्रिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर हे आवश्‍यकच आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com